Ganesh festival celebrated with traditional fervour in Goa 
गोवा

करोनाच्या सावटातही गोव्यातील गणेशोत्सव उत्साहात

कामिल पारखे

गणपती उत्सव हा गोव्यातील लोकांचा एक प्रमुख सण. मुंबईत आणि जगाच्या कुठल्याही कानाकोपऱ्यांत राहणाऱ्या गोयंकरांना ऑगस्ट अखेरीस आपल्या घरांकडे जाण्याचे वेध लागतात ते आपल्या घरच्या गणपती उत्सवात  सहभागी होण्यासाठी. यावर्षी कोरोनामुळे जगभर लोकांच्या प्रवासावर, हिंडण्याफिरण्यावर बंधने आली आहेत. असे असले तरी मुंबई-पुण्यातील आणि इतर शहरांतील अनेक गोमंतकिय गणपती बाप्पांच्या उत्सवात सहभागी होण्यासाठी विमानाने, खास वाहने करुन, ईपास आणि आवश्यक ती सर्व वैद्यकिय कागदपत्रांची पूर्तता करुन आपापल्या घरी पोहोचली आहेत. यापैकी काही जणांना स्वतःच्या घरातच काही दिवस विलगीकरणात राहावे लागले होते. मात्र आपल्या वार्षिक धार्मिक उत्सवात हजर राहण्यासाठी हे सर्व सोपस्कार यांनी पूर्ण केले आहेत.

पुण्यातला इंग्रजी दैनिकातील अलिकडेच लग्न झालेला माझा एक पत्रकार सहकारी आपल्या बायकोच्या माहेरी गोव्यात कोरतालिम येथे गणपती उत्सवासाठी पोहोचला आहे. कोरोनामुळे पुणे-गोवा थेट विमान न मिळाल्यामुळे ते दोघे नवराबायको हैद्राबादमार्गे गोव्यात पोहोचले, पुणे-गोवा एक तासाच्या प्रवासासाठी त्यांना यावेळेस या प्रवासासाठी पूर्ण दिवस लागला. मात्र गणपती बाप्पांच्या त्यांच्या घरच्या पाच दिवसांच्या उत्सवासाठी हा विमानप्रवास. ईपास आणि वैद्यकिय चाचणी प्रमाणपत्र वगैरे करण्याची दोघांची तयारी होती. गोव्यात पणजीला १९७०च्या दशकात महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण करुन तेथेच पत्रकारितेची मी सुरुवात केलेली असल्याने त्यांचा तो गणेशोत्सवासंबंधीचा  उत्साह मी समजू शकत होतो.

महाराष्ट्रातील कोकणात ज्या पद्धतीने गणेश उत्सव साजरा होतो, तसाच गोव्यातही हा उत्सव अगदी उत्साहात होतो. गोमंतकातील शहरांत आणि गावागावांत गणपती उत्सवाची काही दिवस आधीच सुरुवात होते. गोव्यात अनेक शाळांना आणि शैक्षणिक संस्थांना गणेश  उत्सवाच्या काळात सुट्टी असते. मला आठवते कि १९७० आणि १९८०च्या  दशकांत गणपती उत्सवाच्या चारपाच दिवसांच्या काळात गोव्यातील राजधानी पणजी येथील आणि गोव्यातील इतर शहरांतील सर्व व्यवहार बंद असायचे.

देशातील इतर भागांच्या तुलनेत गोव्यात करोनाची लागण या साथीच्या सुरुवातीच्या काळात बऱ्यापैकी नियंत्रणात होती. गेल्या काही आठवड्यांत मात्र या साथीचा प्रादुर्भाव या छोट्याशा राज्यात वाढत चालला आहे. कोरोना साथीचे सावट असल्याने पणजी, म्हापसा आणि मडगाव शहरांत आणि बाजारांत गर्दीवर नियंत्रण होते. तरीदेखील सजावटीसाठी आणि इतर आवश्यक खरेदीसाठी लोक घराबाहेर पडलेच. महाराष्ट्राप्रमाणेच गोव्यातही सार्वजनिक गणेश मंडळ आहेत. मात्र यावर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक गणेश उत्सवावर आणि गौरी पूजनावर खूप मोठ्या प्रमाणात मर्यादा आल्या आहेत. तरीसुद्धा गणेशभक्तांचा उत्साह कायम राहिला आहे. दीड  दिवसांच्या, तीन दिवसांच्या आणि पाच दिवसांच्या गणपतीच्या मूर्तीच्या विसर्जनाच्या वेळी या उत्साह दिसून आला.      

गणेशोत्सवासारखे गोव्यात स्वतःचे असे काही खास धार्मिक आणि सांस्कृतिक उत्सव आहेत. गोव्यात फाल्गुन महिन्याच्या पौर्णिमेच्या आसपास म्हणजे मार्च महिन्यात ‘शिगमो’ हा सुगीचा उत्सव उत्साहाने साजरा करतात. यावर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ‘शिगमो’ उत्सव साजरा करण्यात मर्यादा आल्या. फेब्रुवारी-मार्च या महिन्यांत होणाऱ्या कार्निव्हल उत्सवाच्या बाबतीतही असेच झाले.

गोव्यात गणेशोत्सवाच्या काळात येणाऱ्या पर्यटकांची करोना साथीमुळे अनुपस्थितीमुळे येथील पर्यटन उद्योगाला मोठा फटका फटका बसला आहे. या चालू गणेशोत्सवात गणपती बाप्पांची पूजा-आरती करताना आणि प्रेमभावाने बाप्पांना निरोप देताना करोनाची साथ लवकर संपू दे, दैनंदिन जीवन पुन्हा लवकरात लवकर सुरु होऊ दे, अशीच सर्व भाविकांची प्रार्थना असणार आहे.  

संपादन: ओंकार जोशी

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Kala Academy: कला अकादमीच्या कामाचे पुन्‍हा होणार स्‍ट्रक्‍चरल ऑडिट, 'पीडब्‍ल्‍यूडी'चा मोठा निर्णय

Goa Politics: "विधानसभेत आमचे प्रश्न ऐकले नाहीत तर सत्ताधाऱ्यांना सळो की पळो करणार", विजय सरदेसाईंचा सरकारला इशारा

Goa Health Department: राज्यातील आरोग्य व्यवस्था होणार बळकट; डॉक्टर, कर्मचारी, परिचारिका भरतीस सरकारची मान्यता

Aggressive Dogs Ban: राज्यात हिंस्र कुत्र्यांच्या जातींवर बंदी; रॉटविलर, पीटबुल बाळगल्यास कारवाई होणार, CM सावंतांची माहिती

Guru Purnima 2025 Wishes: जो अंधारातही वाट दाखवतो… गुरुपौर्णिमेनिमित्त आपल्या गुरुंना पाठवा 'या' खास शुभेच्छा

SCROLL FOR NEXT