Bush fire in California forest
Bush fire in California forest Dainik Gomantak
गोवा

Goa Forest Fire : अग्निसत्र सुरूच, एकाला अटक; अभयारण्यात 11 ठिकाणी वणवा

दैनिक गोमन्तक डिजिटल

गेल्या आठवड्याभरापासून राज्यात सुरू असलेले अग्नितांडव अद्याप सुरूच आहे. म्हादई अभयारण्यात अजूनही 11 ठिकाणी सक्रिय आग आहे. ही आग शमविण्यासाठी वन विभागासह हवाई, नौदल आणि अग्निशमन दल सक्रिय असले, तरी ही आग विझविण्यात त्यांना यश आलेले नाही.

तथापि, कोपार्डे येथे जंगलाला आग लागल्याप्रकरणी एकनाथ सावंत याला अटक केली आहे. आग दुर्घटनेची पंतप्रधान कार्यालयाने दखल घेतली असून भारतीय वन सर्वेक्षण संस्थेला (एफएसआय) आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी विशेष निर्देश दिले आहेत. त्यानुसार जिल्हाधिकारी आणि पोलिस दल सक्रिय केले आहे.

सत्तरीतील म्हादई खोऱ्यात पाच मार्चला पहिल्यांदा आग सुरू झाली आणि मग या अभयारण्यातील महत्त्वाचे गड, दुर्गम डोंगराळ भाग आणि उंच कड्यांवर आग पसरली. अर्थात, बहुतांश ठिकाणी नव्याने आग लावल्याचा वन खात्याचा अंदाज आहे.

गेला आठवडाभर प्रत्येक दिवशी नवीन ठिकाणचे जंगल आगीच्या भक्ष्यस्थानी पडत होते. आग विझविण्यासाठी सुरुवातीला वन कर्मचाऱ्यांनी आपल्या परीने प्रयत्न केले. मात्र, नंतर नौदलाला पाचारण करण्यात आले.

भारतीय वन सर्वेक्षणचे वणव्याच्या तपशीलवार चौकशीचे आदेश

राणे यांनी मानले नरेंद्र मोदींचे आभार

आग दुर्घटनांचा अहवाल केंद्रीय वन, पर्यावरण आणि हवामान बदल खात्यासह पंतप्रधान कार्यालयाला पाठवला होता. या अहवालाच्या आधारे नौदल व हवाई दलाची मदत मागितली होती.

या घटनेची दखल घेत पंतप्रधान कार्यालयाने संरक्षण मंत्रालयाला तशा सूचना देत आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी सहकार्य करण्यास सांगितले होते. त्यानुसार नौदल आणि हवाई दलाची मोहीम सुरू आहे. याबद्दल वनमंत्री विश्‍वजीत राणे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले.

सलग 7 तास पाणी फवारणी

आज म्हादई अभयारण्यातील आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी हवाई दलाच्या हेलिकॉप्टरकडून सलग 7 तास पाणी फवारणी करण्यात आली. काही कारणास्तव नौदलाने तांत्रिक कारणामुळे आजही आपली मोहीम थांबवली होती.

(रविवारी) सकाळी 10 वाजता प्रथम हवाई पाहणी केल्यानंतर प्रत्यक्ष आग विझविण्याच्या मोहिमेला सुरुवात होईल, अशी माहिती वनसंरक्षक सौरभ कुमार यांनी दिली.

कर्नाटकचे वन खातेही सतर्क

म्हादई अभयारण्यात पेटलेला वणवा अनमोड घाटमार्गे कर्नाटकात पोहोचण्याची शक्यता आहे, तर दुसरीकडे चोर्ला घाटातही आगीचा वणवा कायम आहे. त्यामुळे गोव्यातील वन अधिकाऱ्यांनी कर्नाटकच्या वन अधिकाऱ्यांशी संपर्क साधून त्यांना धोक्याची सूचना दिली आहे.

कर्नाटकचा वन विभाग सतर्क झाला असून कणकुंबी रेंज येथे सुमारे 35 वन कर्मचारी तैनात केले आहेत, अशी माहिती कर्नाटक वन विभागातील अधिकाऱ्यांनी दिली.

"रोज नवनवीन ठिकाणी जंगलांना आग लागत आहे. हे सारेच संशयास्पद आहे. वन खात्याकडे आग नियंत्रणाचा कसलाच अनुभव नाही. उलट ते चुकीची माहिती पुरवत आहेत. आजही अनेक ठिकाणी जंगलांमध्ये आग लागली आहे. आग नियंत्रणासाठी स्थानिकांसह सरकारी यंत्रणेचा समन्वय हवा."

- प्रा. राजेंद्र केरकर, पर्यावरणतज्ज्ञ.

राज्यात अनेक ठिकाणी जंगलांना आग लागत असताना मुख्यमंत्री शिगमोत्सवात ढोल बडवत आहेत. राज्यातल्या 11 डोंगरांना 1,214 ठिकाणी आग लागली असताना मुख्यमंत्री वेगळ्याच विश्वात रममाण आहेत. अत्यंत बेजबाबदार आणि असंवेदनशील वनमंत्री विश्वजीत राणे यांना हटवल्यानंतर नैतिक जबाबदारी स्वीकारून मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा.

- गिरीश चोडणकर, माजी प्रदेशाध्यक्ष, काँग्रेस.

आगीच्या नव्या 17 घटना

03 बार्देश

02 डिचोली

04 सासष्टी

01 काणकोण

03 तिसवाडी

01 पेडणे

01 फोंडा

01 मडगाव

01 धारबांदोडा

कोपार्डेतील आग दुर्घटनेची चौकशी

कोपार्डे येथील रहिवासी एकनाथ सावंत याची बागायत वाघेरी डोंगराजवळ आहे. काल संध्याकाळी त्यांनी आपल्या बागायतीमधील कचऱ्याला आग लावली होती. त्यानंतर तो घरी परतला.

मात्र, ती आग पसरत काजूच्या बागेसह बाजूच्या जंगलाला लागली. ही आग आपणच लावली हे सावंत याने कबूल केले. त्यामुळे वाळपई पोलिसांनी त्याला अटक केली. आज या घटनेची माहिती मिळताच वाळपईचे मामलेदार दशरथ गावस, उपजिल्हाधिकारी प्रवीण परब यांनी घटनास्थळाची पाहणी केली. पोलिसांनी सावंत याला अटक केली असून या प्रकरणाची चौकशी सुरू आहे.

चौदा ठिकाणी आगीवर नियंत्रण

जंगलामध्ये लागलेल्या आगीच्या 23 ठिकाणांपैकी 14 ठिकाणची आग नियंत्रणात आणण्यात वन खात्याला यश आले आहे. यासाठी हवाई दलाच्या हेलिकॉप्टरने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. याशिवाय वन विभागाचे कर्मचारी झाडांच्या फांद्यांच्या साहाय्याने आग विझवत होते. यांच्या संयुक्त प्रयत्नांमधून 14 ठिकाणची आग विझविण्यात यश आले आहे.

युवकांचे कौतुक

कोपार्डेत शनिवारी लागलेली आग नियंत्रणात आणण्यासाठी युवकांनी मदतकार्य सुरू केले. गावात शिगमोत्सव सुरू असताना तो अर्धवट सोडून गावातील युवकांनी समाजकार्य केले, याबद्दल सर्वांचे कौतुक होत आहे.

याशिवाय इतर ठिकाणी लागलेली आग विझवण्यात स्थानिकांकडून सहकार्य मिळाल्याचे वन विभागाने सांगितले.

  • अग्निशमन दलाच्या मडगाव कार्यालयातील फोन बंद असल्याने लोकांची बरीच गैरसोय झाली.

  • मोले अभयारण्यातील आग विझवण्यासाठी चरण देसाई यांच्या पथकाने प्रयत्न केले.

  • कोपार्डेतील जंगलात रात्री १० नंतर पुन्हा आग भडकल्याने स्थानिकांनी ती विझविण्यासाठी डोंगराकडे धाव घेतली.

भगवान महावीर अभयारण्यालाही झळ

म्हादई अभयारण्यासह आता भगवान महावीर अभयारण्यातही आगीचा भडका उडाल्याने जैवविविधतेची अपरिमित हानी झाली आहे. येथील पशु-पक्ष्यांसह रानटी जनावरांच्या जीवालाही धोका निर्माण झाला आहे.

पण येथे वाहन नेण्यासाठी रस्ता नसल्याने जवानांसमोर अनंत अडचणी आल्या. अभयारण्यात सुर्ला-1 , सुर्ला-2 भागात मोठी आग लागली असून सुर्ला-1 खातकोण भागात आगीने रौद्ररूप धारण केल्याने अधिकाऱ्यांची त्रेधातिरपीट उडाली होती. आग विझवणे शक्य नसल्याने नौदलाच्या हॅलिकॉप्टरची मदत घेण्यात आली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mumbai Goa Highway Traffic: मुंबई-गोवा महामार्गावर वाहतूक कोंडी; झाड कोसळल्याने खोळंबा!

Goa Success Story: गणेश SSC पास हो गया! गोव्यातील वानरमारे समाजातील ठरला पहिलाच विद्यार्थी

Goa 11th Admission: अवाजवी शुल्क आकारल्यास तात्काळ कारवाई; CM सावंत यांचा विद्यालयांना इशारा

Yellow Alert In Goa: गोव्यात यलो अलर्ट, पुढील दोन दिवस महत्वाचे

Goa Drugs Case: इवल्याशा गोव्यात ड्रग्जचा सुळसुळाट; 3.8 कोटींचे अमली पदार्थ जप्त

SCROLL FOR NEXT