DGP Alok Kumar About Cyber Crime Safety X
गोवा

Cyber Crime: सायबर गुन्ह्यांद्वारे देशात 25 हजार कोटी रुपयांची फसवणूक; गोवा पोलिस महासंचालकांनी दिली धक्कादायक माहिती

Cyber Crime Safety: पोलीस निरीक्षक दिपक पेडणेकर यांनी यावेळी सायबर गुन्ह्यांची तसेच ते कशा प्रकारे टाळावेत याची सविस्तर माहिती दिली.

Sameer Panditrao

DGP Alok Kumar About Cyber Crime Safety Goa Campaign

पणजी: जगात तसेच देशभरात दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात सायबर गुन्हे वाढत आहे. या गुन्ह्यांना बळी पडून लोकांची फसवणूक सुरूच आहे. सायबर गुन्ह्यांपासून सुरक्षित होण्यासाठी पोलिस प्रशासन, प्रसार माध्यमे तसेच अन्य घटकांनी अधिकाधिक जागृती करणे आवश्यक आहे व त्यावर नियंत्रणासाठी हाच पर्याय असल्याचे मत गोवा पोलिस महासंचालक अलोक कुमार यांनी व्यक्त केले.

पोलिस मुख्यालयात गोवा श्रमिक पत्रकार संघटनेतर्फे आज बुधवारी (२२ जानेवारी) आयोजित सायबर सुरक्षा कार्यशाळेत ते बोलत होते. यावेळी पोलिस उपमहानिरीक्षक अजय शर्मा, उपमहानिरीक्षक वर्षा शर्मा, पोलिस अधीक्षक राहुल गुप्ता, पोलिस निरीक्षक दीपक पेडणेकर उपस्थित होते.

अलोक कुमार म्हणाले, गेल्या काही वर्षात राज्यात सायबर गुन्हे वाढत आहेत. सायबर गुन्ह्यांद्वारे संपूर्ण देशात वर्षाला २५ हजार कोटी रुपयांची तर गोव्यात अशा गुन्ह्यांद्वारे प्रतिदिन सर्वसाधारणपणे लाखो रुपयांची फसवणूक होत आहे. पोलिस प्रशासन असे गुन्हे आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न करत आहे. यासाठी आम्ही गेल्या सहा महिन्यात खात्यांतर्गत उद्योग, आस्थापने, शाळा व महाविद्यालयांमध्ये या गुन्ह्यांबाबत जनजागृतीसाठीचे विशेष प्रयत्न सुरू केले आहेत. प्रसार माध्यमे व अन्य भागधारकांनी देखील असे प्रयत्न करावेत.

सायबर गुन्हे कसे होतात, फसवणूक कशी केली जाते, हे कसे टाळावे, तक्रार कुठे करावी याबाबतची माहिती गोव्यातील प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचणे हे आमचे उद्दिष्ट्य आहे. गोवा पोलिसांकडून याबाबत समाज माध्यमे किंवा अन्य माध्यमातून जागृती मोहीम केली जात आहे. राज्यातील प्रसारमाध्यमांनी यासाठी गोवा पोलिसां सोबत एकत्र येऊन काम केले पाहिजे. असे झाल्यास या वर्षाच्या अखेरीस ‘सायबर सुरक्षित गोवा’ हे लक्ष्य साध्य करता येऊ शकेल.

पोलीस निरीक्षक दिपक पेडणेकर यांनी यावेळी सायबर गुन्ह्यांची तसेच ते कशा प्रकारे टाळावेत याची सविस्तर माहिती दिली. सायबर गुन्हेगार हे लोकांचा निष्काळजीपणा, लोभ किंवा भीतीचा आधार घेऊन गुन्हे करतात. गुंतवणुकीची बनावट ॲप, डिजिटल अरेस्ट, सेक्सटॉरशन, समाज माध्यमांवर बनावट प्रोफाइल, नोकरी देण्याचे खोटे अमिष, बनावट कर्ज ॲप अशा अनेक पद्धतीने लोकांची फसवणूक सुरू आहे. यासाठी लोकांनी जागृत राहणे आवश्यक आहे. तसेच आपली वैयक्तिक माहिती कुणाला न देणे, आलेला मेसेज अधिकृतता तपासणे गरजेचे आहे, असे ते म्हणाले.

बनावट ८५ संकेतस्थळे बंद

सायबर गुन्हेगार अनेकदा बनावट संकेतस्थळ तयार करून लोकांची आर्थिक फसवणूक करतात. त्यामुळे सावध राहण्याची गरज आहे. ही संकेतस्थळे अधिकृत संकेतस्थळाप्रमाणेच हुबेहूब नक्कल असते. मात्र या संकेत स्थळाच्या ‘युआरएल’मधील स्पेलिंग चुकीचे असते. गोवा पोलिसांनी गेल्या काही महिन्यात अशी ८५ बनावट संकेतस्थळे बंद केली आहेत व आणखी ५० संकेतस्थळे बंद करण्याच्या मार्गावर आहेत, अशी माहिती राहुल गुप्ता यांनी दिली.

सायबर गुन्हे टाळण्यासाठी महत्वाचे मुद्दे

सेबीच्या संकेतस्थळावर गुंतवणूक ॲप किंवा गुंतवणूकदाराची अधिकृतता तपासावी.

‘डिजिटल अरेस्ट’द्वारे फसवणूक करणाऱ्या अनोळखी व्यक्तीला ठिकाण, नाव, पद, बॅच नंबर अशी माहिती विचारावी.

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या (आरबीआय) संकेतस्थळावर कर्ज देणाऱ्या ॲपची अधिकृतता तपासावी.

पाठवण्यात आलेल्या संकेतस्थळची लिंक ही .gov.in किंवा.nic.in किंवा https:// असणारी असावी.

सायबर फसवणूक झाल्यास १९३० किंवा ७८७५७५६२२२ या क्रमांकावर त्वरित संपर्क साधा.

गुंतवणूकवेळी कोणतीही लिंक डाऊनलोड करण्यापूर्वी ‘सेबी’द्वारे शहानिशा करा.

समाज माध्यमांवर तुमचे स्थान समजेल अशा प्रकारची छायाचित्रे टाकू नयेत.

सायबर गुन्हेगारी कशी रोखाल?

आर्थिक व्यवहारात तंत्रज्ञानाचा वापर सुरू झाल्यानंतर या क्षेत्रात सायबर गुन्हेगारी व ऑनलाइन आर्थिक फसवणूक प्रकरणात वाढ झाली दिसत आहे. हे गुन्हेगार वेगवेगळ्या क्लृप्त्या लढवून फसवतात. त्यामुळे रिझर्व बॅंकेपुढे मोठे आव्हान ठाकले आहे. रिझर्व बॅंक सुद्धा वेगवेगळ्या कल्पनांचा वापर करून गुन्हेगारी व फसवणूक रोखण्यासाठी लोकांमध्ये जागृतीचा प्रयत्न करीत आहे. नागरिकांनी रिझर्व बॅंकेने घालून दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वांचा व नियमांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन करण्यात येत आहे.

६८ वर्षीय आंतोनियो फर्नांडिस म्हणाले, आपल्या मोबाईलवर एका मित्राच्या नंबरवरून पैशांची गरज असल्याचा संदेश आला. जेव्हा आपण संदेश वाचण्याचा प्रयत्न केला, तेव्हा आपले बॅंक खाते हॅक झाल्याचे आढळले. काही तासांतच आपल्याला कुटुंबीयांकडून, शेजाऱ्यांकडून आणि मित्रांकडून फोन आले, की खरोखरच आपल्याला पैशांची गरज आहे का?

आणखी एक नागरिक अनिकेत देसाई म्हणाले, कित्येक ज्येष्ठ नागरिक आपल्या विदेशात असलेल्या मुलांकडे संपर्क साधण्यास व्हॉट्सअपचा वापर करतात. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीदायक वातावरण पसरले आहे. आशा प्रकारे कित्येकांची आर्थिक फसवणूक झाल्याचे आढळून आले आहे.

दररोज वाढत्या प्रमाणात प्रकरणे नोंदवली जात असताना रिझर्व्ह बँकेने जनतेत जागरूकता निर्माण करण्यासाठी आणि फसवणूक करणाऱ्यांच्या विविध पद्धती आणि त्यांच्या आर्थिक व्यवहारांचे संरक्षण करण्यासाठी घ्यावयाच्या खबरदारीबद्दल माहिती देण्यासाठी प्रयत्न वाढवले ​​आहेत.

मडगाव येथील रवींद्र भवन येथे हल्लीच झालेल्या गोवा सारस महोत्सवात, वित्तीय समावेशन आणि विकास विभागाच्या अधिकाऱ्यांनी वित्त संबंधित अनेक पैलूंबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी एक स्टॉल लावला.

त्यांच्या ''आरबीआय कहता है'' या मोहिमेत संपूर्ण भारतात आर्थिक सुरक्षिततेवर प्रकाश टाकणाऱ्या जाहिराती होत्या, ज्यात अमिताभ बच्चन सारखे बॉलिवूड स्टार तसेच विविध क्रीडा व्यक्तिमत्त्वांचे संदेश लावण्यात आले होते.

लोकांना त्यांच्या पैशांबाबत ऑनलाइन काळजी घेण्यास सांगण्याचा प्रयत्न करतो. आज बहुतेक व्यवसाय ऑनलाइन झाले आहेत आणि लोक ऑनलाइन व्यवहार करणे पसंत करतात. त्यामुळे कष्टाने कमावलेल्या पैशाचे फसवणुकीपासून संरक्षण करण्याची गरज आणखी महत्त्वाची बनते, असे मत त्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केले.

ओटीपीबाबत सावध रहा!

बँकांशी जोडलेल्या काही ऑनलाइन फसवणुकींमध्ये फिशिंग लिंक्सचा वापर, एटीएम कार्ड स्किमिंग, स्क्रीन शेअरिंग किंवा रिमोट अॅक्सेस वापरून होणारी फसवणूक, सिम स्वॅप किंवा सिम क्लोनिंग, क्यूआर कोडद्वारे होणारी फसवणूक, सोशल मीडियाद्वारे बनावट ओळख निर्माण करणे, ओटीपी आधारीत फसवणूक यांचा समावेश आहे. ओटीपीबाबत सावध राहिले पाहिजे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

St Estevam: संतापजनक! आठवीत शिकणाऱ्या 10 मुलांना वळ उठेपर्यंत मारहाण, सांतइस्तेव येथील शिक्षिकेवर गुन्हा दाखल

Goa Politics: 'एसटींसोबत रक्‍ताचे नाते सांगणारे आले अन् गेले'; मुख्‍यमंत्री, सभापतींकडून गावडेंवर खोचक ‘बाण’

Monsoon Trip Goa: मान्सूनमध्ये गोव्यात कुठली 'ऑफबीट' ठिकाणं एक्सप्लोर कराल? वाचा खास टिप्स

Rashi Bhavishya 04 July 2025: प्रवासाचे योग, सामाजिक मान मिळेल; महत्वाची व्यक्ती भेटेल

Acid Attack Goa: 'त्याच्या' आईनेच आत्महत्येस प्रवृत्त केलं... अ‍ॅसिड हल्ल्याप्रकरणी मृत मुलीच्या आईचा खळबळजनक आरोप

SCROLL FOR NEXT