फोंडा, कुर्टी - खांडेपार पंचायतीच्या ग्रामसभेत कचरा प्रश्नासोबत सीसीटीव्ही, पावसाळी गटार व्यवस्था, रस्ते तसेच इतर विषयांवर चर्चा करण्यात आली.
आज कुर्टी येथे झालेल्या या ग्रामसभेला ग्रामस्थांनी अनेक प्रश्न उपस्थित केले, त्याला सरपंच इतर पंच सदस्य तसेच पंचायत सचिवाने उत्तरे दिली.
ग्रामसभेच्या सुरवातीला सरपंच हरेश नाईक यांनी स्वागत केले. त्यानंतर पंचायत सचिव सचिन नाईक यांनी मागील ग्रामसभेचा अहवाल सादर केला. त्यावर चर्चा करण्यात आली. विशेषतः पंचायतक्षेत्रातील कचऱ्यासंबंधी तसेच सीसीटीव्हीचा प्रश्न प्रामुख्याने चर्चेला आला.
मागच्या काळात कमी दर्जाचे सीसीटीव्ही कॅमेरे पंचायतक्षेत्रात लावण्यात आले होते, मात्र ते अल्पावधीत नादुरुस्त झाल्याने केलेला खर्च पाण्यात गेल्याने पंचायतीतर्फे संबंधित कंत्राटदारावर तक्रार नोंदवण्याची पूनर्मागणी करण्यात आली. या विषयावर ग्रामस्थांनी चर्चा करून पंचायतीने कारवाई करावी अशी मागणी केली.
पंचायत क्षेत्रातील कचऱ्याचाही प्रश्न चर्चेला आला. पंचायतीची कचऱ्याची गाडी पुन्हा पुन्हा नादुरुस्त होत असल्याने एकदाच काय ती व्यवस्थित दुरुस्त करा, परत परत दुरुस्तीसाठी पैसे खर्च करू नका, अशी मागणी नागरिकांनी केली. त्यावर पंचायतीतर्फे तसा होकार भरला. पंचायतीचे संकेतस्थळ अजून तयार झालेले नाही.
हे संकेतस्थळ जोपर्यंत ‘अपलोड’ होत नाही, तोपर्यंत पंचायतक्षेत्रात गैरकारभार सुरूच राहतील, त्यामुळे संकेतस्थळ आदी अपलोड करा, अशी जोरदार मागणी संदीप पारकर यांनी केली.
पंचायतक्षेत्रातील रस्ते, गटार, मलनिस्सारण प्रकल्प तसेच इतर विषयांवरही चर्चा करण्यात आली. यावेळी सरपंच हरेश नाईक, उपसरपंच विल्मा परेरा इतर पंचसदस्यांनी ग्रामसभेतील चर्चेत भाग घेतला.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.