थिवी: गोव्यातील अंमली पदार्थ विरोधी मोहिमेला मोठे यश मिळाले असून कोलवाळ पोलिसांनी थिवी रेल्वे स्थानकावर केलेल्या विशेष कारवाईत 3.5 लाख रुपये किमतीचा गांजा (Ganja) जप्त केला. या प्रकरणी एका नेपाळी नागरिकाला अटक करण्यात आली. गेल्या दोन महिन्यांपासून देशभरातून येणाऱ्या प्रवाशांची तपासणी करण्यासाठी उत्तर गोवा पोलिसांनी रेल्वे स्थानकांवर अतिरिक्त सुरक्षा कर्मचारी तैनात केले आहेत. याच मोहिमेअंतर्गत, 16 सप्टेंबर 2025 रोजी कोलवाळ पोलीस ठाण्याच्या विशेष पथकाने ही कारवाई केली.
पोलिसांच्या पथकाने थिवी रेल्वे स्थानकावर संशयास्पद हालचाली करणाऱ्या एका व्यक्तीला अडवले. चौकशीदरम्यान ही व्यक्ती रोशन जप्रेल (वय, 25) असल्याचे निष्पन्न झाले. नेपाळचा मूळ रहिवासी असलेला हा तरुण सध्या कळंगुट येथे राहत होता. तो मुंबईहून मांडवी एक्सप्रेसने गोव्यात आला होता. रेल्वे स्थानकाच्या पार्किंगमध्ये त्याची झडती घेतली असता त्याच्याजवळ 3.500 किलो गांजा सापडला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जप्त केलेला गांजा गोव्यातील (Goa) ग्राहकांना विकण्यासाठी आणला होता. अंमली पदार्थ विरोधी कायद्याअंतर्गत (NDPS Act) आरोपी रोशन जप्रेलला तात्काळ अटक करण्यात आली.
पोलिसांच्या तपासात आरोपी (Accused) रोशन जप्रेलची गुन्हेगारी पार्श्वभूमी उघड झाली आहे. विशेष म्हणजे, त्याला यापूर्वीही 2024 मध्ये साळीगाव पोलिसांनी एका अंमली पदार्थ प्रकरणात अटक केली होती. यामुळे तो एक सराईत अंमली पदार्थ तस्कर असल्याचे सिद्ध झाले आहे. आरोपी पुन्हा त्याच गुन्ह्यात सहभागी झाल्यामुळे पोलिसांनी त्याची कठोर चौकशी सुरु केली आहे.
दरम्यान, ही कारवाई पोलिस निरीक्षक (PI) संजित कांडोळकर, म्हापसाचे एसडीपीओ (SDPO) विल्सन डिसोझा आणि उत्तर गोव्याचे एसपी राहुल गुप्ता (IPS) यांच्या नेतृत्वाखालील टीमने केली. पीएसआय दत्ताराम राणे आणि पोलीस कर्मचारी सुदेश केरकर, निखिल नाईक, प्रवीण पाटील, संतोष नार्वेकर, सदाशिव परब, निकलेश गावकर आणि सर्वेश राऊत यांनी या यशस्वी कारवाईत महत्त्वाची भूमिका बजावली.
गोव्याला अंमली पदार्थांच्या विळख्यातून बाहेर काढण्यासाठी पोलीस दल सातत्याने प्रयत्न करत आहे. रेल्वे स्थानकांवर आणि राज्याच्या सीमांवर कडक बंदोबस्त ठेवल्यामुळे अशा तस्करीच्या घटनांना आळा बसत आहे. ही कारवाई गोव्यातील अंमली पदार्थ विरोधी मोहिमेतील एक महत्त्वपूर्ण पाऊल मानले जात आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.