वाळपई: ठाणे-डोंगुर्ली पंचायत क्षेत्रातील चरावणे येथे धरण उभारण्याच्या प्रस्तावाला अखेर मंजुरी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. गोवा सरकारच्या वन्यजीव महामंडळाने या प्रकल्पास मान्यता दिली असून केंद्र सरकारची परवानगी मिळाल्यानंतर प्रत्यक्ष काम सुरू होणार आहे.
दरम्यान, हा प्रकल्प पूर्ण झाला तर सत्तरी तालुक्यातील ठाणे आणि म्हाऊस पंचायत क्षेत्रातील १५ गावांची पाण्याची समस्या मिटणार आहे.
गेल्या १७ वर्षांपासून हा प्रकल्प रखडला होता. वनमंत्री विश्वजीत राणे आणि आमदार डॉ. दिव्या राणे यांच्या विशेष प्रयत्नांमुळे हा प्रकल्प पुन्हा मार्गी लागणार आहे. या धरणामुळे भूगर्भातील पाण्याची पातळी वाढेल तसेच सत्तरी तालुक्यातील १५ गावांमधील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सुटणार आहे.
२००६ साली सुरू करण्यात आलेले चरावणे धरणाचे काम बिगरसरकारी संस्थांच्या विरोधामुळे थांबले होते. त्यावेळी जवळपास ३५ लाख रुपये खर्च होऊन २० टक्के काम पूर्ण झाले होते. मात्र म्हादई अभयारण्याच्या हद्दीत प्रकल्प येत असल्यामुळे काहींनी विरोध दर्शविला आणि आवश्यक कागदपत्रांच्या अभावामुळे काम बंद पडले.
गेल्या अनेक वर्षांपासून मार्च महिन्यातच नदीचे पात्र कोरडे पडते आणि अनेक गावांतील विहिरी आटतात. त्यामुळे पिण्याच्या पाण्याची टंचाई मोठ्या प्रमाणात जाणवते. दाबोस जलप्रकल्पातून पुरवले जाणारे पाणीही अपुरे पडते. या धरणामुळे भूगर्भातील जलसाठा वाढेल आणि ठाणे, म्हाऊस पंचायत क्षेत्रातील नैसर्गिक नाले, विहिरी, जलस्रोत पुनर्जीवित होतील. तसेच जलसिंचन प्रकल्पांना चालना मिळेल, ज्याचा फायदा शेती आणि ग्रामीण भागातील लोकांना होणार आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.