Cashew Agriculture Dainik Gomantak
गोवा

Cashew Agriculture : काजू उत्‍पादकांच्‍या व्‍यथा जाणून सरकार सहकार्याची गॅरंटी देणार का ? उत्पादक हवालदिल

Cashew Agriculture :पोट भरण्याच्‍या व्यवसायाला घरघर; तसेच काजू फेणीला म्हणावा तसा प्रतिसाद मिळत नसल्याने गेल्या वर्षीची काजू फेणी अजून पडून असल्याची माहिती काजू उत्पादक देतात.

गोमन्तक डिजिटल टीम

मनोदय फडते

Cashew Agriculture :

सांगे, हंगामातील तीन महिने काबाडकष्ट केल्यास पुढील पावसाळ्यातील सहा महिने पोटापाण्याची पुंजी आणि घरातील लहान-थोरांना आधारवड म्हणून काजू पिकाकडे पाहिले जात असे.

पण सुरवातीलाच जर काजूचा दर भाव खाऊ लागला तर पुढे काय होणार, याचा अंदाज येऊ लागल्याने काजू उत्पादक हवालदिल बनले आहेत. यात योग्य मार्ग न काढल्यास भविष्यात काजू पीक संजीवनीच्या मार्गाने जायला फारसा वेळ लागणार नाही, अशी धारणा कष्टकरी समाजात उत्पन्न झाली आहे.

काजू गोळा करण्यासाठी एका जोडप्याला साधारण तेराशे ते पंधराशे रुपये मोजावे लागतात. याचा अर्थ दिवसाला आजच्या घडीला पंधरा किलो काजू उत्पादन व्हायला हवे. तसेच काजू फेणीला म्हणावा तसा प्रतिसाद मिळत नसल्याने गेल्या वर्षीची काजू फेणी अजून पडून असल्याची माहिती काजू उत्पादक देतात.

बदलणारे हवामान, जंगली जनावरे काजूंचा फडशा पाडतात. त्यांनी नुकसान करून शिल्लक राहणारे काजू हे त्या मालकासाठी, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. अशाप्रकारे नुकसान सोसावे लागल्यावर काजू उत्पादक दुसऱ्या व्यवसायाकडे वळणार नाहीत तर काय होणार, अशा कडवट प्रतिक्रिया शेतकरी व्यक्त करू लागले आहेत.

दरवर्षी वाढीव दराने लिलाव :

स्वतःच्या काजू बागायती वेगळ्या आणि लिलावद्वारे घेतल्या जाणाऱ्या काजू बागायती वेगळ्या. कारण स्वतःच्या काजू बागायतीत कमी उत्पादन झाले तरी एकवेळ परवडेल; पण लिलाव करून घेतल्या जाणाऱ्यांना कोणीच मदतीचा हात देत नाही. त्यात वन खाते दरवर्षी वाढीव दराने लिलाव करतात. काजू उत्पादन मिळो अथवा न मिळो कराराप्रमाणे रक्कम अदा करावीच लागते. त्यात यंदा दर नसल्याने लिलाव करून काजू गोळा करण्यासाठी पुढाकार घेतलेल्यांचे नुकसान झाले आहे.

वन विकास महामंडळ दरवर्षी दहा टक्के दर वाढवून लिलावधारकांना परवाना देते. त्यात लागवड केलेली किती झाडे शिल्लक राहिली त्याचा थांगपत्ता नसतो. पावसाळ्यात काजू बागायती स्वच्छ करायच्या असतात; पण तेसुद्धा कागदावर केले जात आहे. मजूर घालून प्रत्यक्षात काजू बागायती स्वच्छ करणे परवडत नाही. यांत्रिक पद्धत वापरण्यास वन खाते परवानगी देत नाही.

- सयाजी देसाई, काजू उत्पादक, नेत्रावळी-सांगे

बागायतीमधील कोणतेही पीक असो त्याचा सर्रासपणे जंगली जनावरे फडशा पाडतात. यंदाचा काजू दर हा चढणारा आहे की, काजू उत्पादकांना खाली पाडणारा आहे, ते भविष्यात कळून येणारच आहे. सध्याचा दर पाहता कोणताच ताळमेळ जुळत नाही. सरकार याकडे गांभीर्याने पाहणार की केवळ घोषणा करीत राहणार, तेच समजत नसल्याने ‘कष्टकरी’ हवालदिल झालेत.

- रजनीकांत नाईक, काजू उत्पादक, उगे-सांगे

‘बेरोजगारी’ची भीती! :

कष्टकरी समाज कष्ट करण्यास नेहमीच तयार असतो; पण योग्य मोबदला मिळत नसल्याने प्रत्येक आघाडीवर अपयश येत आहे. ऊस, दूध आणि काजू या तिन्ही ‘कॅश क्रॉप’मधून कष्टकरी समाजाने अंग काढून घेतल्यास राज्यात बेरोजगारी निर्माण होईल. यासाठी शेतकऱ्यांच्या अडचणी कशा दूर करता येतील यावर सरकारने उपाययोजना आखणे आवश्यक आहे.

चविष्ट ‘काजू’ला किंमत नाही!:

राज्यात मोठ्या प्रमाणात परराज्य आणि परराष्ट्रामधून काजूगर येऊ लागल्याने गोव्यातील चविष्ट अशा काजू बियांना योग्य भाव मिळत नाही.

उन्हात राबून दिवस-रात्र काबाडकष्ट झेलणाऱ्या समाजाला काय मिळते ते समजून घेण्यासाठी वातानुकूलित जागेत बसून चर्चा करण्यापेक्षा काजू बागायतदारांकडे जाऊन त्यांचे दुःख समजून घेतल्यास या कष्ट करणाऱ्यांना काहीतरी मोबदला मिळू शकेल, अशी आशा बाळगण्यास काही हरकत नसावी.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa: भर पावसात प्रवासी बोट नदीत बुडाली; बाहेर काढण्यासाठी गोवा सरकारने 11 दिवसांत खर्च केले 20 लाख रुपये

Multiple Organ Failure Diseases: एकाच आजारानं हृदय, यकृत अन् मूत्रपिंड खराब होऊ शकतं का? जाणून घ्या वैज्ञानिक कारण अन् प्रतिबंधात्मक उपाय

Pandharpur Wari: 1566 साली लोक जुने गोवेतील रस्त्यांतून, अभंग म्हणत वारीला जात असल्याची नोंद आहे..

Goa LPG Advisory: एलपीजी ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी; गोवा सरकारकडून अ‍ॅडवायझरी जारी

Ferrari Seized: महाराष्ट्रात नोंदणीकृत 7.5 कोटींची 'फेरारी' कर्नाटकमध्ये चालवली म्हणून केली जप्त; काय नेमकं प्रकरण? वाचा

SCROLL FOR NEXT