BJP in maem  Dainik Gomantak
गोवा

मयेत भाजपची 'सत्वपरीक्षा' विजयी घोडदौड राखण्याचे आव्हान

अपक्ष उमेदवारांचा प्रचार जोरात, ''आप'', गोवा फॉरवर्डचे आव्हान

दैनिक गोमन्तक

डिचोली : भाजपचा बालेकिल्ला म्हणून ओळखण्यात येणाऱ्या मये मतदारसंघात यावेळीही भाजपने गतवेळेचाच ''फॉर्म्यूला'' अंमलात आणला असला, तरी या निवडणुकीत भाजपसमोर विजयी घोडदौड कायम राखण्याचे आव्हान असल्याचे चित्र आहे. 2007 पासून गेल्या सलग तीन निवडणुका मिळून आतापर्यंत मये मतदारसंघात सर्वाधिक म्हणजेच चारवेळा भाजपने विजय संपादन केला आहे. त्यामुळे हा मतदारसंघ भाजपसाठी ''सुरक्षित'' असल्याचा राजकीय अंदाज आहे.

यावेळीही इथे भाजपला अनुकूल वातावरण असल्याची हवा असली, तरी मगोसह गोवा फॉरवर्ड आणि ''आप''ने भाजपसमोर कडवे आव्हान उभे केले आहे. त्यामुळे या मतदारसंघातून विजयी घोडदौड कायम राखणे भाजपला तेवढे सोपे नाही. विरोधकांनी निर्माण केलेले आव्हान पाहता, यावेळी या मतदारसंघात भाजपची (BJP) सत्वपरीक्षा ठरणार आहे.

या मतदारसंघातून प्रेमेंद्र शेट (भाजप), प्रवीण झांट्ये (मगो), प्रा. राजेश कळंगुटकर (आप), संतोषकुमार सावंत (काँग्रेस-गोवा फॉरवर्ड), श्रीकृष्ण परब (आरजी) यांच्यासह मिलिंद पिळगावकर, रोहन सावईकर, दीपकुमार मापारी आणि शीला घाटवळ मिळून नऊ उमेदवार निवडणूक (Election) रिंगणात आहेत. मतदारसंघाचा एकंदरीत कानोसा घेतला असता, भाजप, मगो, गोवा फॉरवर्ड आणि आम आदमी पक्षांमध्येच लढत होणार असल्याचे चित्र जाणवत आहे. मतदारसंघात अपक्षांकडून होणारी मतविभागणी आणि ''सायलंट मतदारांची भूमिकाही निर्णायक ठरणार आहे. जमीन मालकी हक्क प्रश्न आणि खाण अवलंबितांची भूमिकाही महत्वाची ठरणार आहे.

भाजपसाठी सत्वपरीक्षा

या निवडणुकीसाठी भाजपने मये मतदारसंघात गतवेळच्याच फॉर्म्यूल्याचा अवलंब केला आहे. यावेळी माजी सभापती स्व. अनंत शेट यांचे कनिष्ठ बंधू प्रेमेंद्र शेट हे भाजपतर्फे निवडणूक लढवत आहेत. 2007 आणि 2012 साली झालेल्या सलग दोन्ही निवडणुकांत स्व. अनंत शेट हे भाजपच्या उमेदवारीवर निवडून आले होते. ही प्रेमेंद्र शेट यांच्यासाठी जमेची बाजू असली, तरी मगोच्या कळपात जाऊन ''सिंहगर्जना'' केल्यानंतर त्यांनी भाजपच्या कमळाचा स्वीकार केला आहे. 2017 साली झालेल्या गेल्या निवडणुकीत भाजपचे तत्कालीन आमदार स्व. अनंत शेट यांचा ''पत्ता'' कट केला असतानाही, नाराजी लपवत स्व.अनंत शेट शेवटच्या क्षणी भाजपच्या प्रचारात उतरले होते. यावेळी मात्र स्थिती नेमकी उलटी आहे.

प्रवीण झांट्ये यांनी दंड थोपटले

भाजपकडून आपला ''पत्ता'' कट झाल्याची जाणीव होताच प्रवीण झांट्ये यांनी आमदारकीचा राजीनामा देऊन मगो पक्षात प्रवेश केला. मगोतर्फे झांट्ये ही निवडणूक लढवत आहेत. त्यांनी प्रचारही धुमधडाक्यात सुरु केला असून, त्यांना चांगला प्रतिसाद मिळत आहे. झांट्ये यांनी ''प्रतिष्ठा'' पणाला लावली आहे. त्यामुळे भाजपसमोरील चिंता वाढली आहे. गेल्या निवडणुकीत ते निवडून आले असले, तरी त्यापूर्वी दोन निवडणुका त्यांनी मयेतून लढविलेल्या आहेत. त्यामुळे त्यांचे ठराविक मतदार मयेत आहेत. त्यातच त्यांचे वडील स्व.हरिष झांट्ये हेही मयेतून एकदा निवडून आलेले होते. ही त्यांच्यासाठी जमेची बाजू आहे.

''आप'', (AAP) गोवा फॉरवर्डचे आव्हान

गेल्या निवडणुकीत काँग्रेसच्या (Congress) उमेदवारीवर निवडणूक लढवून जवळपास साडेसात हजार मते मिळवलेले संतोषकुमार सावंत यावेळी काँग्रेस-गोवा फॉरवर्ड (Goa Forward) युतीचे उमेदवार म्हणून आपले भवितव्य आजमावित आहेत. स्थानिक प्रश्न घेऊन ते मतदारांसमोर जात आहेत. त्यांच्या प्रचारकार्यात काँग्रेससह गोवा फॉरवर्डचे नेते सहभागी होत आहेत. त्यांना मतदारसंघात चांगला प्रतिसाद मिळत आहे. दुसऱ्या बाजूने आम आदमी पक्षानेही (आप) मतदारसंघात आव्हान उभे केले आहे. या पक्षातर्फे निवडणूक लढवणारे प्रा. राजेश कळंगुटकर हे उच्चशिक्षित आहेत. त्यांच्यामागे शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञ आदी शिक्षित कार्यकर्त्यांची फळी सक्रिय आहे. आप सत्तेत आल्यास भ्रष्टाचार बंद होणार असून, नोकऱ्यांसाठी कोणालाही पैसे मोजावे लागणार नाहीत. अशी ग्वाही ते मतदारांना देत आहेत.

अपक्ष उमेदवारांचा प्रचार जोरात

या मतदारसंघात चार अपक्ष निवडणूक लढवत असले, तरी मिलिंद पिळगावकर आणि रोहन सावईकर यांनी प्रचाराला जोर दिला आहे. पैकी मिलिंद पिळगावकर यांनी २००२ साली मयेतून मगोच्या उमेदवारीवर निवडणूक लढविली होती. अल्प मतांनी त्यांचा विजय हुकला होता. पिळगावकर हे मतदारांना परिचित आहेत. यावेळी ते भाजपच्या उमेदवारीसाठी प्रयत्नशील होते. त्यादृष्टीने त्यांनी मोर्चेबांधणीही केली होती. मात्र त्यांना भाजपची उमेदवारी मिळाली नसल्याने ते अपक्ष म्हणून रिंगणात उतरले आहेत. त्यांना महिला आणि युवकांकडून पाठींबा मिळत आहे.

मये मतदारसंघ

पुरुष मतदार -14, 072.

महिला मतदार-14,674

एकूण मतदार- 28,746.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

Winter Care Tips: हिवाळ्यात त्वचेची घ्या विशेष काळजी; 'हे' घरगुती उपाय नक्की ट्राय करा!

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

SCROLL FOR NEXT