Goa Investment Scam Dainik Gomantak
गोवा

Goa Finance Scam: गोव्यात आजवरचा सर्वात मोठा आर्थिक घोटाळा; गुंतवणुकीच्या नावाखाली 50 जणांना 130 कोटींचा गंडा

Goa's Largest Financial Scam in History: शेअर मार्केटमध्ये आर्थिक गुंतवणुकीद्वारे भरमसाट व्याज देण्याचे आमिष दाखवून गोव्यातील सुमारे ५० गुंतवणूकदारांना १३० कोटींचा गंडा घातला गेला आहे. मुख्य सूत्रधार मायरन रॉड्रिग्स आणि दीपाली परब हे आयडीलिक गोवन गेटवेज कंपनीमध्ये भागीदार असल्याने कंपनीच्या पाच संचालकांविरुद्ध १३० कोटींचा फसवणुकीचा गुन्हा ‘आर्थिक गुन्हे कक्षा’च्या पोलिसांनी (ईओसी) दाखल केला आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

Share Market Investment Scam Of 130 Crore In Goa

पणजी: शेअर मार्केटमध्ये आर्थिक गुंतवणुकीद्वारे भरमसाट व्याज देण्याचे आमिष दाखवून गोव्यातील सुमारे ५० गुंतवणूकदारांना १३० कोटींचा गंडा घातला गेला आहे.

मुख्य सूत्रधार मायरन रॉड्रिग्स आणि दीपाली परब हे आयडीलिक गोवन गेटवेज कंपनीमध्ये भागीदार असल्याने कंपनीच्या पाच संचालकांविरुद्ध १३० कोटींचा फसवणुकीचा गुन्हा ‘आर्थिक गुन्हे कक्षा’च्या पोलिसांनी (ईओसी) दाखल केला आहे. मुख्‍यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी गोव्‍यातील हा सर्वांत मोठा आर्थिक घोटाळा असल्‍याचे म्‍हटले आहे.

संशयित मायरन रॉड्रिग्स हा लंडनला फरारी झाला असून त्याच्याविरुद्ध रेड कॉर्नर नोटीस जारी करण्याची प्रक्रिया सुरू आहे. त्याला ताब्यात घेण्यासाठी आर्थिक गुन्हे कक्षाने हालचाली सुरू केल्या आहेत. आतापर्यंत त्याच्या विविध बँक खात्यांतील रोख रक्कम तसेच जंगम व स्थावर मालमत्ता ताब्यात घेण्यात आल्याची माहिती पत्रकार परिषदेत पोलिस अधीक्षक राहुल गुप्ता यांनी आज दिली. या गुन्ह्यातील संशयित सुशांत घोडगे हा आमदार विजय सरदेसाई यांचा माजी स्वीय सचिव होता, हे समोर आले आहे.

नाव खराब करण्‍याचे कारस्‍थान; विजय

हा घोटाळा मायरन रॉड्रिग्स याने केला आहे. त्यात सुशांत घोडगे आणि नोलान आंताव या दोघांचा अजिबात संबंध नाही. त्यामुळेच त्या दोघांना अटकपूर्व जामीनही मिळाला आहे. हे प्रकरण एका वर्षांपूर्वीचे आहे आणि यात जो पैशांचा व्यवहार झाला ते पैसे डिपॉझिटही केले आहेत, असे विजय सरदेसाई यांनी म्‍हटले आहे. आता हे प्रकरण उकरून काढले आहे, त्यामागे फक्त माझे नाव खराब करण्याचे कारस्थान आहे. विरोधकांचा आवाज दाबण्याचा हा एक प्रकार आहे. हे सरकार गोवेकरांच्या विरोधी आहे. त्यामुळेच त्यांना आम्ही उघडे पाडत आहोत.

घोटाळ्याचा संबंध फातोर्डा ते लंडन!

मायरन रॉड्रिग्स याने केलेला हा १३० कोटींचा घोटाळा हा गोव्यातील सर्वांत मोठा आर्थिक घोटाळा आहे. त्‍याचा संबंध फातोर्डा ते लंडनपर्यंत पोहोचलेला आहे, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आज मडगाव येथे दिली. मडगाव येथे त्यांना या घोटाळ्याबद्दल विचारले असता, या प्रकरणात चौकशी सुरू आहे, असे सांगितले. सरदेसाई यांच्या मळकर्णे येथील फार्मवर साध्या वेशातील पोलिस गेले होते, असे आज सरदेसाई म्हणाले होते. त्याबद्दल मुख्यमंत्री म्हणाले, याबद्दल मला काहीच माहीत नाही!

तपासासाठी प्रकरण आर्थिक गुन्हा विभागाकडे

गुंतवणूकदारांची रक्कम आयडिलिक गोवन गेटवेज ॲण्ड डेव्हलपमेंट्स प्रा. लि. कंपनीत गेल्याने या कंपनीच्या नोलान लॉरेन्स आंताव (फातोर्डा), ज्योकिम रोझारिओ पिरीस (फातोर्डा), विजय दत्तात्रय जोईल (सिंधुदुर्ग-महाराष्ट्र), नावनिक मारिओ पेरेरा (बाणावली) आणि सुशांत मनोहर घोडगे (पेडणे) यांच्याविरुद्ध आर्थिक गुन्हा कक्षाने गुन्हा दाखल केला आहे.

२०२३ मध्‍ये वेगवेगळ्या तक्रारी

कॅश फॉर जॉब प्रकरण ताजे असतानाच शेअर मार्केटमध्ये आर्थिक गुतंवणुकीद्वारे भरमसाट व्याज देण्याचे आमिष दाखवून फसवणुकीचे प्रकरण समोर आले आहे. त्‍याद्वारे १३० कोटींची फसवणूक झाली आहे. सासष्टी तालुक्यातील लोकांनी २०११ पासून मुख्य सूत्रधार मायरन रॉड्रिग्स याच्याकडे गुंतवणूक करण्यास सुरुवात केली होती; मात्र आजतागायत त्यांना पैसे परत मिळालेले नाहीत. याप्रकरणी दोन वेगवेगळ्या तक्रारी २०२३ मध्ये दाखल झाल्या होत्या.

गुंतवणूक केलेल्यांची संख्या सुमारे ५० हून अधिक असून त्यांनी केलेली गुंतवणुकीची रक्कम सुमारे १०० कोटींहून अधिक आहे. मायरन याने लोकांना आपण स्टॉक ब्रोकर असल्याचे तर दीपाली परब ही अर्थतज्ज्ञ असल्याचे भासवत होती.

या प्रकरणाचा तपास सुरू झाल्यानंतर संशयित मायरन हा २४ जुलै २०२३ रोजी दुबईमार्गे लंडनला पळून गेला होता. त्याच्याविरुद्ध इमिग्रेशन ब्युरोमार्फत लुकआऊट नोटीस, इंटरपोलमार्फत ब्ल्यू नोटीस तर सध्या त्याच्याविरुद्ध रेड कॉर्नर नोटीस जारी करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

मायरन याने पहिली पत्नी सुनीता रॉड्रिग्स हिला २०२१ मध्ये घटस्फोट दिला. त्यानंतर दीपाली परब हिच्याशी विवाह केलेला आहे, असे गुप्ता यांनी सांगितले. पोलिसांनी संशयित मायरन व दीपाली यांच्या बँक खात्यातील ६,०८,६६३ रुपये, ठेव रक्कम ३५,२५,००० रुपये तसेच बँकेतील दोन लॉकर्स गोठविली आहेत.

३८ गुंतवणुकदारांनी दिली तक्रार

नोव्हेंबर २०२२ ते जून २०२३ या काळात मायरन याने ३,२५,००,००० रुपये आयडिलिक गोअन गेटवेस अँड डेव्हलपमेंट्स प्रा. लि. कंपनीमध्ये तर प्रॉस्पेक्ट रिॲलिटी कंपनीत २,००,५०,००० रुपये ट्रान्सफर केले होते. ही रक्कम गुंतवणूकदारांकडून जमा केलेली होती व त्याचा उपयोग त्याने व्यवासायासाठी केला होता. संशयित मायरन आणि दीपाली या दोघांविरुद्ध ११ ऑगस्ट २०२३ रोजी सालसेतमधील सुरेश आल्मेदा याने पहिली तक्रार दाखल केली होती.

अंतरिम अटकपूर्व जामीन

मायरन याने केलेल्या फसवणुकीच्या गुन्ह्यामध्ये या पाचही संशयितांची भूमिका तपासण्यात येत आहे तसेच कंपनीच्या जंगम व स्थावर मालमत्ता ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. ज्योकिम वगळता नोलान, विजय, नावनिक आणि सुशांत या चौघांनी अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला आहे. न्यायालयाने त्यांना अंतरिम अटकपूर्व जामीन दिला आहे. या गुन्ह्यातील संशयित सुशांत घोडगे हा आमदार विजय सरदेसाई यांचा माजी स्वीय सचिव (पीएस) होता, हे समोर आले आहे.

फसवणूक केली नाही; नोलान

मी किंवा सुशांत घोडगे यांनी कुणाचीही फसवणूक केलेली नाही. मायरन रॉड्रिग्स प्रकरणाच्या संदर्भात आयडलीक गोवन गेटवेज अँड डेव्हलपमेंट प्रा. कंपनीत फक्त ३.२५ कोटी रक्कम जमा केली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Battle of Galwan: रक्ताने माखलेला चेहरा, हातात धारदार शस्त्र अन् डोळ्यात देशभक्तीची चमक, 'गलवान'मधील सलमानचा पहिला लूक आला समोर

ED Goa: गोव्यात ईडीची झाडाझडती; 'सडा अर्बन'ची 1.05 कोटींची मालमत्ता तर जमीन हडप प्रकरणी संदीप वझरकर 3.19 कोटींची जमीन जप्त

Video: अप्रतिम अन् शानदार...! भर पावसात मुलांसोबत 'गजराज'नं लुटला क्रिकेटचा आनंद; सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

Goa: भर पावसात प्रवासी बोट नदीत बुडाली; बाहेर काढण्यासाठी गोवा सरकारने 11 दिवसांत खर्च केले 20 लाख रुपये

Multiple Organ Failure Diseases: एकाच आजारानं हृदय, यकृत अन् मूत्रपिंड खराब होऊ शकतं का? जाणून घ्या वैज्ञानिक कारण अन् प्रतिबंधात्मक उपाय

SCROLL FOR NEXT