Vedanta Truck Transport Dainik Gomantak
गोवा

Bicholim Mining: रात्री 'वेदांता'ची धडधड सुरूच! खंडपीठाने दिला दम; कडक कारवाईचे निर्देश

Vedanta Mineral Transport: अनेक वर्षे खाण व्यवसाय बंद आहे व आता कुठे ही पहिलीच खाण कंपनी तो सुरू करत असताना अडथळे आणले जात आहेत.

गोमन्तक डिजिटल टीम

Goa Bench Mining Transport

पणजी: पिळगावातून रात्रीच्या वेळी खनिज मालाची वाहतूक करण्यास मनाई केली असतानाही मुळगाव येथील पाच टॉप येथून वाहतूक सुरू करून गावकरवाडा-डिचोलीतील एक टॉप येथे खनिज उतरले जात आहे. हे आज पुराव्यासह निदर्शनास आणून दिल्यावर मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने याची गंभीर दखल घेतली.

ही खनिज वाहतूक त्वरित बंद करा. रात्री वाहतूक केली जाणार नसल्याचे हमीपत्र वेदांता कंपनीने द्यावे. तसेच रात्रीच्या कथित वाहतुकीसंदर्भात चौकशी करून जबाबदार अधिकाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्याचे निर्देश देत खंडपीठाने कंपनीला जोरदार दणका दिला.

सरकारने परवानगी दिलेल्या पर्यायी वाहतुकीच्या मार्गाबाबत हस्तक्षेप करण्यास खंडपीठाने नकार दिला तसेच परवाना असलेला गावातून जाणारा मार्ग मोकळा करण्यासाठी कंपनीने केलेली विनंतीही फेटाळली. खाण व भूगर्भ खात्याने सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात रात्रीच्यावेळी वाहतूक करण्यास परवानगी देण्यात आल्याचे नमूद केले आहे.

वाहतूक मार्गाला जो पर्यावरण परवाना दिला आहे, त्यामध्ये फक्त दिवसाच वाहतूक करण्यास परवानगी आहे. त्यामुळे रात्रीच्यावेळी परवानगी देणे हे केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाच्या आदेशाचे उल्लंघन करणारे आहे. जर काही सुधारणा करायच्या असल्यास त्याचा अधिकार राज्य सरकारला नसून तो केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाला आहे. सरकारने पर्यायी मार्गाला जी परवानगी दिली आहे तो रद्द करावा. कारण त्याचा पर्यावरण परवान्याच्या आदेशात उल्लेख नाही.

अनेक वर्षे खाण व्यवसाय बंद आहे व आता कुठे ही पहिलीच खाण कंपनी तो सुरू करत असताना अडथळे आणले जात आहेत. पिळगाव गावातून जाणारा मार्ग अडवण्याचा वाद हा खूप वर्षांपासून आहे. स्वार्थासाठी काहीजण अडथळा आणत आहेत. पर्यायी रस्ता आहे तो पर्यावरण परवाना असलेल्या मार्गाचाच भाग आहे. या पर्यायी मार्गाच्या पर्यावरण परवान्याबाबत हरकत असल्यास संबंधितांनी योग्य मंचाकडे दाद मागावी, अशी बाजू ॲडव्होकेट जनरल देविदास पांगम यांनी आज मांडली.

...तर कंपनीवर कारवाई : पांगम

गोवा खंडपीठाने दिलेल्या निर्देशानुसार, रात्रीची खनिज माल वाहतूक बंद आहे. रात्रीची वाहतूक सुरू असल्याचे जे पुरावे छायाचित्रासह सादर केले आहेत ते मान्य नाहीत. तरीही त्याची शहानिशा केली जाईल. यामध्ये काही तथ्य आढळल्यास संबंधित अधिकारी तसेच वेदांता कंपनीविरुद्ध कठोर कारवाई करू, अशी हमी ॲडव्होकेट जनरल देविदास पांगम यांनी खंडपीठाला दिली.

केवळ दिवसाच वाहतुकीचा पर्याय

खनिज मालाची वाहतूक करण्यासाठी ज्या मार्गासाठी पर्यावरण परवाना आहे, तो स्थानिकांनी अडविला आहे. तो मोकळा करून द्यावा, असा अर्ज वेदांता कंपनीने केला होता, तो सुद्धा खंडपीठाने आज फेटाळला. गोवा खंडपीठाने दोघांचेही अर्ज फेटाळले. सरकारने पर्यायी मार्गाने खनिज मालाची वाहतूक करण्यास परवानगी दिली आहे. मात्र, रात्रीच्यावेळी वाहतूक करण्यास गोवा खंडपीठाने परवानगी नाकारली आहे. त्यामुळे वेदांता कंपनीला दिवसाच खनिज मालाची वाहतूक करावी लागणार आहे.

...अन् खंडपीठाने वकिलांना सुनावले

रात्रीच्यावेळी खनिज मालाची वाहतूक सुरू असल्याचे निदर्शनास आणून दिल्यावर खंडपीठ कडाडले. बंदी आदेश असतानाही ही वाहतूक कशी सुरू आहे, असा सवाल केला. ही वाहतूक ताबडतोब थांबवा व या मार्गावर सीसीटीव्ही कॅमेरे बसवा. त्यातील फूटेज तपासून पहा. याला कोण जबाबदार आहे त्याची चौकशी करा, असे खंडपीठाने सरकारी वकिलांना सुनावले. वेदांता कंपनीने वाहतूक केली जात नसल्याचा दावा केल्यावर खंडपीठाने संबंधित अधिकाऱ्याकडून हमीपत्र मागितले.

ग्रामस्थांचीही मागणी फेटाळली

गोवा सरकारने वेदांता कंपनीला पर्यायी मार्गाने खनिज वाहतूक करण्यास परवानगी दिली आहे. या मार्गाला पर्यावरण परवाना नाही, तसेच पर्यावरणीय व नियामक मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन होत आहे. त्यामुळे ही परवानगी रद्द करण्याची मागणी पिळगाव ग्रामस्थांतर्फे अर्जदार रमाकांत सालेलकर यांनी केली होती. खंडपीठाने ती मागणी विचारात घेतली नाही. याविरुद्ध संबंधित मंचाकडे दाद मागावी, असे नमूद करून सालेलकर यांचा अर्ज फेटाळला.

पिळगाव ग्रामस्थांनी गावातून जाणाऱ्या मार्गावरील खनिज वाहतूक रोखल्यानंतर सरकारने याच रस्त्याच्या बाजूने ८४० मीटर अंतराच्या पर्यायी मार्गावरून वाहतूक करण्यास परवानगी दिली आहे.

त्यासंदर्भातील आदेश ११ डिसेंबर २०२४ रोजी काढला होता. सकाळी ९ ते १ व दुपारी २ ते ५ पर्यंत प्रतितास ट्रकांच्या ४० खेपा तर रात्री ११.३० ते पहाटे ५.३० पर्यंत ५० खेपा मारण्यास परवानगी दिली होती.

पर्यावरण परवाना असलेल्या मार्गावरून दिवसा १२७ खेपा प्रतितास वाहतूक करण्यास परवानगी आहे.

मात्र, रात्रीच्या वाहतुकीस खंडपीठाने बंदी घातल्याने वेदांता कंपनीला पर्यायी रस्त्यावरून दिवसा ४० वाहतुकीच्या खेपा मारता येणार आहेत. त्यामुळे त्यांच्यासमोर अडथळा निर्माण झाला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Rashi Bhavishya 14 September 2025: आर्थिक लाभाचे संकेत, कुटुंबात सौख्य; भावनिक तणाव टाळा

IND vs Pak: भारत विरुद्ध पाकिस्तान 'महामुकाबल्या'त Team India ची प्लेइंग 11 कशी असेल? कोणाला डच्चू, कोणाला संधी?

Best Destination For Solo Travel: सोलो ट्रिपसाठी परफेक्ट! महिलांसाठी सुरक्षित मानली जाणारी 'ही' टॉप ठिकाणं, एकदा नक्की भेट द्या

Railway Accident: पत्नी दारूच्या नशेत रेल्वे ट्रकवर बसली, वाचवायला गेलेल्या पतीचा रेल्वेच्या धडकेत मृत्यू; वेरोड्यातील दुर्घटना

Sal: भेडशीत तिळारी, दोडामार्गात मणेरी नावाने ओळखली जाणारी गोव्यातील शापुरा नदी; सौंदर्यसंपन्न बनलेला 'साळ गाव'

SCROLL FOR NEXT