आसगाव येथील घर मोडतोड प्रकरणावरून सरकारवर होत असलेल्या टीकेची धार बोथट कऱण्यासाठी पोलिस महासंचालक जसपाल सिंग यांची बदली गोव्याबाहेर केली जाणार आहे. मुख्य सचिव पुनीतकुमार गोयल यांनी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना सादर केलेल्या अहवालानंतर महासंचालकांची खुर्ची गदागदा हलू लागली आहे.
आता केवळ केंद्रीय गृह मंत्रालयाकडून बदली आदेश जारी होण्याची औपचारिकता बाकी आहे.
सरकारने पर्यायी व्यवस्था म्हणून सुट्टीवर असलेले पोलिस महानिरीक्षक ओमवीर सिंग बिश्णोई यांना सोमवारपर्यंत कामावर हजर होण्याचे आदेश जारी केले आहेत. शुक्रवारी मुख्यमंत्र्यांनी या साऱ्याची कल्पना केंद्रीय गृह मंत्रालयाला दिली आहे.
त्यानंतर पाठवलेल्या पत्रात पोलिस महासंचालकांना राज्य प्रशासनातून मुक्त करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. येत्या सोमवारपर्यंत जसपाल सिंग यांच्या बदलीचा आदेश केंद्रीय गृह मंत्रालयाने जारी न केल्यास त्या पदाचा ताबा पोलिस महानिरीक्षकांकडे देण्याची तयारी राज्य प्रशासनाने ठेवली आहे.
...तोपर्यंत जसपाल सिंग गोव्यातच
पोलिस महासंचालक जसपाल सिंग शुक्रवारी दिल्लीतील गृह मंत्रालयाशी संपर्कात होते, अशी माहिती मिळाली. ते रजेवर जाण्याचा विचार करत होते. मात्र, सरकारने त्यांना राज्याबाहेर जाऊ नका, असे कळविले आहे. त्यामुळे महानिरीक्षक ओमवीर सिंग बिष्णोई येईपर्यंत ते गोव्यातच असतील.
पूजाचा पती ‘रॉ’ अधिकारी
खात्रीलायकरित्या मिळालेल्या माहितीनुसार, अतुल शर्मा हा पूजाचा पती भारतीय पोलिस सेवेतीलच अधिकारी असून तो गुप्तचर संस्थेत प्रतिनियुक्तीवर आहे. सध्या तो थायलंडमध्ये कार्यरत आहे. याआधी त्याच्याकडे गोव्यातील एका गुप्तचर यंत्रणेच्या कार्यालयाचा (रॉ) ताबा होता. यादरम्यान त्याने या जमीन व्यवहारासाठी पुढाकार घेतला होता, अशी माहिती मिळाली आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.