तिसवाडी: करमळी येथील कुव्हाळ-कातोर बांध सशक्त करण्यासाठी तब्बल ५ कोटी ६९ लाख ९६ हजार ९१५ रुपये खर्च केले असून बांधाचे ९० टक्के काम पूर्ण झाल्याची लिखित माहिती कृषिमंत्री रवी नाईक यांनी गोवा राज्य विधानसभेत दिली. सशक्तीकरणासाठी कोट्यवधी रुपये खर्च करूनही बांध सहा महिन्यांत वाहून गेला. पावसाळ्यापूर्वी बांधाचा एक भाग कोसळला होता. पाऊस सुरू झाल्यानंतर बांधाचा मोठा भाग वाहून गेला आहे. आता तर संपूर्ण बांधच वाहून जाण्याची भीती निर्माण झाली आहे.
वेळ्ळीचे आमदार क्रूझ सिल्वा यांनी करमळी गावातील बांधांच्या परिस्थितीसंदर्भात कृषी मंत्र्यांना अतारांकित प्रश्न विचारला होता. करमळीतील कुंभारजुवे कालव्यावर असलेला बांध सशक्त आणि पुनर्बांधणीसाठी मृदा संवर्धन विभाग-४, टोंक यांच्याकडून निविदा काढल्या आहेत. कुव्हाळ बांधासंदर्भात सविस्तर माहिती देताना नाईक यांनी खर्च केलेला निधी आणि काम पूर्ण झाल्याची टक्केवारी दिली.
कुव्हाळ-कातोर बांध कोसळल्यानंतर करमळीतील शेतकऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली होती. सहा महिन्यांतच बांध कोसळला, म्हणजे काम योग्यरित्या केले नव्हते. कोसळल्यानंतर लगेच मातीचा भराव आणून कोसळलेला भाग बुजवण्याचा प्रयत्न केला गेला; परंतु नदीच्या पाण्याच्या प्रवाहापुढे ही माती टिकली नाही.
त्यानंतर पाऊस सुरू झाला आणि बांधाचा मोठा भाग वाहून गेला. या बांधाच्या कामाबाबत अभियंत्यांनी हलगर्जीपणा केल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे.
आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून बांधलेले बांध लगेच कोसळत असल्याने पारंपरिक पद्धतीने यांचे बांधकाम करण्याची गरज आहे. पारंपरिक बांध बांधणाऱ्यांना सल्लागार म्हणून नेमून त्यांची देखरेख करावी, असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.
कुव्हाळ-कातोर बांध सहा महिन्यांच्या आत कोसळल्याने हे काम निकृष्ट दर्जाचे झाल्याचे स्पष्ट झाले आहे. काम करताना सिमेंटमध्ये खाऱ्या पाण्याचा वापर केला गेला. त्याशिवाय काम लवकर संपवण्यासाठी जुन्या बांधावर माती टाकून त्यावरून नवीन बांध बांधला गेला. पावसाळा संपेपर्यंत संपूर्ण बांध वाहून जाईल आणि करदात्यांचे पैसे वाया जातील. या प्रकरणाची चौकशी करावी.सुनील नाईक, शेतकरी
कुव्हाळ-कातोर बांध सशक्त करण्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च करूनही बांध अवघे सहा महिनेच टिकला. यामागची कारणे शोधण्याची आवश्यकता आहे; कारण आधुनिक तंत्रज्ञान वापरून बांधलेले बांध हे जास्त काळ टिकत नाहीत, असे दिसून आले. तसेच मानशीतून सोडल्या जाणाऱ्या अतिरिक्त पाण्यावरदेखील मामलेदारांनी लक्ष ठेवले पाहिजे आणि मामलेदार काम करत आहेत की नाहीत यावर मंत्र्यांनी लक्ष ठेवण्याची गरज आहे.दीपक नाईक, स्थानिक रहिवासी
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.