पणजी: गोव्यासाठी ‘पाहुणा’ क्रिकेटपटू ललित यादव २०२५-२६ मोसमात खूपच उपयुक्त ठरला असून तिन्ही प्रकारच्या स्पर्धांत त्याने लक्षवेधी योगदान दिले, साहजिकच त्याला संघात घेण्याचा गोवा क्रिकेट असोसिएशनचा (जीसीए) निर्णय फायदेशीर ठरल्याचे आकडेवारीवरून जाणवत आहे.
२०२५-२६ मोसम सुरू होण्यापूर्वी ‘दिल्ली’कर ललित याला पाहुणा क्रिकेटपटू या नात्याने ‘जीसीए’ची पहिली पसंती नव्हती, पण त्याने निवड आता सार्थ ठरविली आहे. २०२५ मध्ये जीसीएच्या स्थानिक स्पर्धेत खेळल्यामुळे ललित गोव्यासाठी ओळखीचा होता. नव्या मोसमात तो गोवा क्रिकेट संघाच्या जर्सीत मैदानात अवतरला. आता तिन्ही प्रकारच्या क्रिकेटमध्ये तो संघाचा आधारस्तंभ ठरला आहे.
गोव्याकडून खेळताना चंडीगडविरुद्ध रणजी करंडक स्पर्धेत पर्वरी येथील पहिल्याच सामन्यात २९ वर्षीय ललितने द्विशतकाने सुरवात केली आणि नंतर मागे वळून पाहिलेच नाही. दिल्लीच्या हा अष्टपैलू क्रिकेटपटू गोव्यात येण्यापूर्वी १९ प्रथम श्रेणी सामने खेळला होता, तसेच दिल्ली कॅपिटल्सतर्फे आयपीएल स्पर्धेत झळकला होता.
एकंदरीत त्याचा अनुभव गोव्यासाठी आता निर्णायक ठरला असून रणजी करंडक स्पर्धेतील बाकी दोन सामन्यांत संघाला त्याच्याकडूनच जास्त अपेक्षा असतील.
ललितने २०२५-२६ मोसमात एकूण तीन शतके केली आहेत. रणजी स्पर्धेत पर्वरी येथे चंडीगडविरुद्ध द्विशतक (२१३) केले, तर विजय हजारे करंडक एकदिवसीय स्पर्धेत त्याने जयपूर येथे लागोपाठ शतके ठोकताना हिमाचल प्रदेशविरुद्ध १०४, तर सिक्कीमविरुद्ध नाबाद १३१ धावा केल्या.
ललितने २०२५-२६ मधील रणजी करंडक स्पर्धेत गोव्याकडून खेळताना पाच सामन्यांत ७१.८३च्या सरासरीने एक शतक व एक अर्धशतक झळकावत ४३१ धावा केल्या आहेत. सय्यद मुश्ताक अली करंडक टी-२० स्पर्धेतील सात सामन्यांत त्याने पाच वेळा नाबाद राहत दोन अर्धशतकांसह १३७.५०च्या सरासरीने २७५ धावा केल्या.
विजय हजारे करंडक एकदिवसीय (लिस्ट ए) क्रिकेट स्पर्धेतही सातत्य राखले. त्याने सात डावांत दोन वेळा नाबाद राहत ९२ च्या सरासरीने ४६० धावा केल्या. यामध्ये दोन शतके व तीन अर्धशतकांचा समावेश आहे. ऑफस्पिन गोलंदाजीत छाप पाडताना त्याने रणजी स्पर्धेत नऊ, तर विजय हजारे करंडक स्पर्धेत पाच गडी बाद केले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.