Bhuvaneshwari Jadhav Wins Gold Medal In kalaripayattu
पणजी: केरळमध्ये उगमस्थान असलेली प्राचीन भारतीय युद्ध कला (मार्शल आर्ट) ‘कलारीपयट्टू’ या खेळात भुवनेश्वरी जाधव हिने गोव्यासाठी गुरुवारी ऐतिहासिक कामगिरी बजावली. उत्तराखंडमधील ३८व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत तिने सुवर्णपदक जिंकले, जे या खेळातील राज्याचे पहिलेच पदक ठरले.
कलारीपयाट्टू या खेळाचा गोव्यात २०२३ साली झालेल्या ३७व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत प्रथमच समावेश करण्यात आला होता. तेव्हा गोव्याला या खेळात एकही पदक मिळाले नव्हते. उत्तराखंडमधील रोशनबाग-हरिद्वारा येथे भुवनेश्वरीने इतिहास रचला. ती कलारीपयट्टू खेळातील काईपोरू प्रकारातील अनआर्मंड कॉम्बॅटमधील मुलींच्या ६५ - ७५ किलोगटात विजेती ठरली. अंतिम लढतीत तिने दिल्लीच्या खेळाडूस गोल्डन पॉईंटवर हरविले. त्यापूर्वी, भुवनेश्वरीने राजस्थान व हरियानाच्या खेळाडूस हरविले होते.
उत्तराखंडमधील स्पर्धेत गोवा कलारीपयट्टू पथकाचे नेतृत्व या खेळाच्या राज्य संघटनेचे सचिव दीपक आमोणकर करत असून सुदर्शन संपत संघाचे प्रशिक्षक आहेत. तांत्रिक अधिकारी रंजन मुल्लारट्ट यांच्या मार्गदर्शनाखाली मोहीम सुरू आहे.
भुवनेश्वरी जाधव ही शिरोडा येथील क्रीडापटू असून आंतरराष्ट्रीय-राष्ट्रीय पातळीवर तिने कराटे खेळात यश प्राप्त केलेले आहे. गतवर्षी तिने राष्ट्रीय कराटे स्पर्धेत कुमिते प्रकारात सुवर्णपदक जिंकले होते. राष्ट्रीय स्पर्धेतील तिचे ते सलग चौथे पदक ठरले होते. २०२२ साली अमेरिकेतील लाग व्हेगास येथे झालेल्या यूएस ओपन आंतरराष्ट्रीय कराटे स्पर्धेत तिने एक रौप्य व दोन ब्राँझपदके जिंकली होती. दक्षिण आशियाई कराटे स्पर्धेत सुवर्णपदकासाठी खेळताना गुडघ्याचा स्नायू तुटल्यामुळे शस्त्रक्रिया झाल्यावर गतवर्षी भुवनेश्वरीने यशस्वी पुनरागमन केले होते.
भुवनेश्वरीची कामगिरी तिच्या समर्पित भावनेचा, तसेच भारतातील कलारीपयट्टूच्या वाढत्या सामर्थ्याचा पुरावा आहे. तिचा विजय हा केवळ वैयक्तिक मैलाचा दगड नसून देशभरातील तरुण मार्शल आर्टिस्टसाठी प्रेरणा देणारा आहे. गोव्याने या खेळात जोरदार ठसा उमटवला असून भविष्यात आणखी प्रतिभा उदयास येण्याची आम्हाला आशा आहे.’’रंजन मुल्लारट्ट, तांत्रिक अधिकारी-कलारीपयट्टू
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.