मधू य. ना. गावकर
‘जाऊ ओहोळांच्या गावा’ या माझ्या परिक्रमेत फोंडा तालुक्यातील प्रत्येक ओहोळाच्या काठाने प्रवास करताना मला आठवले ते आमचे पूर्वज; कारण त्यांनी वाहणाऱ्या ओहोळांचे पाणी अडवून आणि जिरवून त्या पाण्यावर प्रत्येक गाव अन्नधान्य आणि फळफळावळ पिकवून सुजलाम् सुफलाम् केला होता. प्रत्येक ओहोळाच्या पात्रात व्यवस्थितपणे नैसर्गिक बंधारे घालून झरी, तलाव यांच्या पाण्याचा पुरवठा शेती बागायतीला केला आणि विविध पिके घेतली.
ते कष्टाने घेतलेले पीक प्रत्येकाकडे पोहोचेल याकडेही लक्ष दिले. हे सर्व करण्यासाठी उपयुक्त असलेले जलस्रोत पूर्वजांनी प्राणपणाने जपले. प्रत्येक ओहोळांच्या जागी पाहिल्यास हे लक्षांत येते. खाऱ्या आणि गोड्या पाण्याची देवाणघेवाण करण्यासाठी ओहोळाच्या मुखात मानस अगर ‘मूस’ बसवून दोन्हींच्या संगमावर पाण्यातील जैवविविधतेला जन्म देण्याचे काम केले. पर्यावरणाचा सांभाळ केला. पाण्यात मिळणारी ताजी मासळी खाऊन ऊर्जा निर्माण झाल्याने त्या ऊर्जेच्या जोरावर भविष्य घडवण्यास झटले.
गेल्या पन्नास वर्षांपासून आमच्या गोव्यात शेती पडीक ठेवण्याचे काम सर्रास सुरू आहे. बागायतीत अगर डोंगर, पठारावर हिरवीगार जंगले तोडून काँक्रीटची जंगले उभी झाली आहेत. त्यामुळे, धान्य उत्पादनात आपला गोवा बराच खालच्या क्रमांकावर पोहोचला आहे.
येशू ख्रिस्ताचा जन्म झाला तेव्हा जगाची लोकसंख्या वीस कोटी होती, ती चाळीस कोटी होण्यास तेरावे शतक उजाडावे लागले. आज आपण एकविसाव्या शतकात वाटचाल करताना लोकसंख्या कैक अब्जांवर पोहोचली आहे. तोच प्रकार आमच्या गोव्यात घडत आहे. गोवा स्वतंत्र झाला तेव्हा लोकसंख्या सात आठ लाख होती.
तेव्हा गोव्यात गावागावांत विहिरी, झरी, तळ्या, ओहोळांचे पाणी वापरत होते. फक्त ओपा खांडेपार नदीवर एकच धरण होते. त्याचे पाणी फोंडा आणि पणजीला पुरवठा होत होते. शिवाय दोन बंधारे त्याकाळी पोर्तुगिजांनी बांधले होते.
एक केपे शहर परिसरात कुशावती नदीवर उभारून त्याचे पाणी चांदोरपर्यंत शेती बागायतीला पुरवठा होत असे. दुसरा बंधारा शिगाव परिसरात दूधसागर नदीवर उभारला. त्याचे पाणी तिथल्या बागायतीला पुरवठा करीत होते. आज त्रेसष्ट वर्षांत गोव्याची लोकसंख्या वीस लाख पूर्ण करून एकवीस लाखांकडे वाटचाल करीत आहे, इतक्या लोकसंख्येला पाणी कोठून आणणार, हा खरा प्रश्न आहे.
पाण्यासाठी सरकारने हणजुणे, आमठाणे, म्हैसाळ, चांदेल, दाबोस, तिळारी, काणकोण, साळ, गांजे ही लहान मोठी धरणे बांधली. शिवाय आणखी नवीन बांधण्याच्या तयारीत आहे. तरीही गोमंतकीय पाण्यासाठी रस्त्यावर घागरी घेऊन उतरतात.
पण आपली तळी, विहिरी, झरे आणि ओहोळांतून मिळणारे गोडे पाणी आपण वाचवू शकत नाही. म्हणजेच आपण आपल्या पूर्वजांच्या संस्कृतीपासून दूर हरवत पुढची वाटचाल करीत आहेत. त्याने आपण शेतातील कोंगा आणि खरबा, तळी ओहोळातील थिगुर, कासव, देखळे, पिट्टोळ, वाळेर, करणकाटका, खेकडा अशी जैविक संपदा गमावली आहे.
त्याचे मुख्य कारण घराकडील सांडपाणी आणि रासायनिक खतांचा वापर केल्याने हे सारे घडलेले आहे. आज हवामानात बदल झाला असे आपण म्हणतो. मात्र इवल्याशा गोव्यात शेतात, बागायतीत भराव टाकणे, डोंगर फोडणे, वनराई कापणे हे प्रकार सर्वत्र चालूच असल्याचे पाहावयास मिळते.
बंगले, सदनिका बांधकामास रेती मोठ्या प्रमाणात लागते. आज रेतीचा उपसा गोव्यातील प्रत्येक नदीतून होतो. त्यामुळे प्रत्येक नदीचे पात्र खोल झाले आहे. रेतीत जन्म घेणारे खुबे, तिसरी, कालवे, लेप, वागी, सफेद झिंगे नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. ही आम्हा गोवेकरांसाठी धोक्याची घंटा आहे. वसुंधरेचा चेहरामोहरा बदलत चालला आहे. पैसे कमावण्याची महत्त्वाकांक्षा असलेल्या मानवाला पर्यावरणाचे रक्षण हाच मोठा अडथळा वाटत आहे.
वाघुर्मे ओहोळाचा प्रवाह म्हणजे निसर्गाचा अजब प्रकार आहे. त्या ओहोळाचा उगम भूतखांब पठारावरून न होता पठाराच्या पायथ्याशी तीन झरींच्या माध्यमातून होतो. त्या झरींची नावे विठ्ठोळे, बायफळ आणि मुळकांची झर. त्याच प्रकारे त्या ओहोळास तीन तळी आहेत; बानले, मधले आणि लाटीकडील तळी.
वाघुर्मे गाव प्राचीन काळी मांडवीच्या पात्रात एक बेट होते. त्या काळात गोव्यात भूकंप झाल्याचे शास्त्रज्ञ मानतात. वाघुर्मे गावच्या परिसरात भूकंप झाल्याने भुतखांब पठाराच्या कठड्याचा काही भाग कोसळून त्याच मांडवी पात्रात बेट निर्माण झाले असावे. कालांतराने गावच्या वर्तुळाकार परिघात नदीच्या पात्रात पुराचा गाळ साचून शेती निर्माण झाली असावी.
असाच प्रकार विर्डी कारे-खाजन आणि तिवरे जुवारवाडा भागांत पाहावयास मिळतो, वाघुर्मे गावात गेल्या तीस चाळीस वर्षांत दक्षिण उत्तर बाजूने भल्या मोठ्या शेतातून रस्ता करून गावच्या लोकांचे दळणवळण सुखकर केले आहे. पूर्वी सावईवेरे अगर मुर्डी खांडेपार भागातून मांडवी नदीच्या किनाऱ्याने माडाच्या वनातून आणि शेतातून चालत जावे लागत असे.
वाघुर्मे गाव लहान असला तरी पर्यावरणदृष्ट्या अतिसंवेदनशील आहे. नऊ तक्षीमा, चारवर्ग, चार चौगुले आणि बारा वांगडी असा तिथल्या पूर्वजांनी तो गाव घडविल्याचा ऐकावयास मिळते. वाघुर्मे गावाला पाण्याचा तोटा नाही, इतकी ईश्वरी कृपा त्या गावाला भूतखांब पठाराने दिली आहे. वाघुर्मे गावच्या खालच्या भागात मांडवीच्या पात्रात होडले जुवे नावाचे बेट आहे.
ओहोळाचा उगम कुमेरी परिसरात होऊन त्या परिसराला पाणी देत तो बायफळ भागात पोहोचतो. तिथल्या शेतीला पाणी देतो आणि त्या खालच्या शेताकडील तळे भागात पोहोचतो. तिथल्या मोठ्या भल्या मोठ्या शेतीला पाणी पुरवून तो मांडवी नदीच्या किनाऱ्याकडे प्रवासताना खालच्या भागात दोन प्रवाह करून विशाल मायणा, मुळक, पोय शेतीला पाणी देत मांडवीस गोड्या पाण्याच पुरवठा करतो.
वाघुर्मेच्या ओहोळाचे पाणी थंड ठेवण्याचे काम पूर्वजांनी लावलेल्या हिरव्यागार बोणगीची दाट झाडे झुडपे करतात. तसेच दुसऱ्या ओहोळाचा उगम बिठ्ठोळे भागात झरीच्या रूपाने होऊन तो तिथल्या परिसराला पाणी देत पुढे प्रवास करतो.
वरचे वायंगण भात शेतीला पाणी देत पुढे होवळी भागातील परिसराला पाणी देऊन पोय भागात जातो. तिथला परिसर पाण्याने भिजवतो आणि नंतर मांडवीस मिळतो. ओहोळाच्या पाण्यात मगर, बेडूक, पाणसर्प, थिगुर, देखळा, वाळेर, सांगट, खेकडे, मल्ली, पिठ्ठोळ, शिवड, घागर हे जलचर प्राणी सापडतात.
ओहोळाच्या संथ वाहणाऱ्या पाण्यावर होवळी, धाकटी होवळी, हातीपात, कुणगे वरची आंगडी, फोडानी, देऊळसरे, व्हाळी, वाघशेत, मुळक, घरपाटो, उबीर, एरीक, शेरीक, बानी, हाळक, होवळी, नमस, आणि खारवळ ही भलीमोठी सरद-वायंगण शेती तिथल्या पूर्वजांनी पिकवली.
मांडवीच्या पात्रात मिळणारी खार पाण्यातील चोणकुल, तामसा, मालू, खरचाणी, शेवटा, काळुंद्र, वागी, झिंगे, खेकडे अशी चवदार मासळी आणि ओहोळाच्या पाण्यावर पिकणारे सरद वायंगणाचे भात, त्या ओहोळातील गोडी मासळी, शेतातील शंख शिंपले खाऊन वाघुर्मेच्या पूर्वजांनी गाव घडविला होता. आज त्या गावातील भली मोठी शेती पडीक आहे. ओहोळाचे संथ पाणी ही व्यथा तिथल्या पूर्वजांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न करते, असा मनाला भास होतो.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.