Scams In Goa Canva
गोंयकाराचें मत

Goa Opinion: परीटघडीचे ‘व्हाइट कॉलर’ दरोडेखोर

Goa Opinion: आज चित्र फार उफराटे आणि निराशाजनकच दिसत आहे. जंगलवाटेवर, आडमार्गाला राहून शस्त्राची भीती दाखवून लुटणाऱ्यांना आपण ‘दरोडेखोर’ म्हणतो. मग, या अशा नोकरीचे आमिष दाखवून लुबाडणाऱ्या परीटघडीच्या ‘व्हाइट कॉलर’ महिलांना व लोकांना काय म्हणायचे?

गोमन्तक डिजिटल टीम

शिवास्पदे शुभदे

सकाळी सकाळी वर्तमानपत्र उघडले रे उघडले की कोटींच्या हिशोबात पैसा हडप केल्याची बातमी ठकसेनांच्या फोटोसहित वाचायला मिळते. कोणी सूत्रधार, कोणी मध्यस्थ, कोणी सरकारी अधिकारी आणि बळीचा बकरा बनलेला सामान्य माणूस, ज्याला सर्व बाजूंनी सुरक्षित अशी सरकारी नोकरीच हवी असते. ती एकदा मिळाली की आयुष्याचे सोने झाले असे त्याला वाटते. मग काय सकाळी उठला ऑफिसला गेला, संध्याकाळी घरी आला. डोक्याला ताप नाही की शरीराला कष्ट नाही. सगळेच कसे सुरक्षित, सुखी आणि चैनीत चाललेले असते.

पण ही सरकारी नोकरी मिळवायची कशी? त्यासाठी थोडे कष्ट घ्यावे लागतात. कष्टही साधेसुधे नाहीत तर नोकरी देणाऱ्या एजंटला पकडण्यापासून ते त्याला हवे तेवढे त्याचे हात ओले करण्यापर्यंत मजल मारावी लागते. ही रक्कम काही साधीसुधी नसते. लाखोंच्या घरात, कधी कधी एक पाऊल पुढे कोटीच्या घरातही ती असते. जितकी नोकरी वजनी तितकी तितकीच थैलीही वजनी असावी लागते.

अशा दलालांच्या नजरेत गरजू माणूस सापडतो. दलाल असे सावज अचूक हेरतात आणि पैसे उकळतात. मौज मजा करतात. व्यसनेही असतातच. अधूनमधून एखाद्याला नोकरीही लावून देतात. मग त्यांची पत वाढते. गरजू माणसे इथेच फसतात. बरेचसे लोक पैसे घालवून बसतात आणि कर्जबाजारी होतात. अशा बऱ्याच जणांना चुना लागल्यानंतर अगदीच न राहवून त्यातला एखादाच तक्रार करण्याचे धारिष्ट करतो आणि बिंग फुटते. मग अधिकृतरीत्या धरपकड सुरू होते. अर्थात आधी या गोष्टी मान्यवरांना किंवा सुरक्षा यंत्रणेला शासनाला माहीत नसतात असे मुळीच नाही. कारण तेही अधून मधून आपले हात ओले करून घेत असल्याशिवाय दलालांचे मोकाट फिरणे संभवत नाही. प्रकरण अंगावर शेकेपर्यंत आळी मिळी गुपचिळी साधली जाते, असे हे षड्यंत्र.

एका बाजूला गरिबी वाढली आहे, तरुण बेकार आहेत, असा सारखा आरडाओरडा पेपरच्या माध्यमातून चालू असतो. विरोधी पक्षही हेच मुद्दे घेऊन भांडत असतो. पैसा नाही तर नोकरी मिळवण्यासाठी द्यावे लागणारे लाखो रुपये कुठून आणतात, हाही एक प्रश्नच आहे.

मला आठवते सुमारे ४०, ४५ वर्षांपूर्वी सरकारी नोकऱ्या देताना काही निकषांचे पालन केले जाई. यात पहिल्या पन्नासजणांचे मेरिट लिस्ट असायचे. त्यांच्या मुलाखती घेऊन रिक्त जागेप्रमाणे नोकरी दिली जाई. नंतर पुढील उमेदवारांना संधी दिली जात असे. म्हणजेच गुणवत्तेला मान दिला जाई. त्यानंतरच बाकीच्यांसाठी महनीय व्यक्तीच्या शब्दाचा मान राखून सामावून घेतले जाई. अशा व्यक्ती, नोकरदार माणसे गुणवत्तेला मान दिल्यामुळे प्रामाणिकपणे आणि नीटनेटके काम करीत असत. माणसे माणसांना माणूस या नात्याने ओळखत होती. समोरच्याचा आदर करायची रीत होती. निदान माणसे एकमेकांना ओळख तरी दाखवत होती. नातीगोती, शेजारपाजार याची सर्वांना जाण होती. आज या गोष्टी हळूहळू कमी होत तडीपार झाल्या आहेत. उरल्यासुरल्या नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत.

तेव्हा शिकलेली माणसेही मर्यादित होती. आता प्रत्येक जण शिकलेला आहे, प्रत्येकाला सरकारी नोकरी हवी आहे. त्यामुळे अधूनमधून अशा गोष्टी कानावर येत असत. पण एवढ्या मोठ्या प्रमाणात षड्यंत्र चालू असेल आणि त्यातून फसवणूक होत असेल असे कधीच वाटले नव्हते.

आता मात्र विचित्र, भयानक सत्य समोर येत आहे. दिवसेंदिवस त्याचे स्वरूप अधिकच तीव्र होत चालले आहे. अजून काय काय ऐकायला, वाचायला मिळेल, हे सांगता येत नाही. समाजाच्या नैतिकतेची झालेली प्रचंड घसरण पाहवतही नाही आणि सहन तर होतच नाही. माणसे अक्षरश: विकली जाताना पाहून मन विषण्ण होते. गोवा मुक्तीसाठी रक्त सांडलेल्या स्वातंत्र्यसैनिकांना, त्यांच्या कुटुंबीयांना काय वाटेल याचा थोडा थोडा जरी विचार केला गेला असता तर?

गोवा मुक्तीनंतर प्रत्येक नागरिक स्वाभिमानाने आनंदाने स्वकर्तृत्वाने आपले आणि समाजाचे रक्षण आणि वर्धन करेल अशी माफक अपेक्षा त्यांनी ठेवली असावी. पण ही अपेक्षा पूर्ण करण्याचे भाग्य आमच्या नशिबी नाही. उलट दुसऱ्यांना लुबाडून आपण श्रीमंत कसा होऊ, याकडेच बहुतेकांचे लक्ष लागले आहे. पैसा श्रेष्ठ. पैशापुढे नातीगोती, आपली परकी सगळे सगळे विसरून आपण लिओ टॉलस्टॉय यांच्या ‘हाउ मच लँड डज अ मॅन नीड?’ या लघुकथेतल्या त्या पहोमसारखे धावत सुटलो आहोत. त्या कथेतला पहोम, जितके जास्त जोरात धावत जाऊन परत येऊ तितकी जमीन आपली होईल या आशेने सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत धाव धाव धावतो आणि शेवटी थकून मरतो. जिच्यासाठी धावतो, ती जमीन काही त्याला अतिस्वार्थामुळे उपभोगता येत नाही.

माणसे केवळ मी आणि माझा स्वार्थ यालाच कवटाळून बसली आहेत आणि या स्वार्थापोटी मिळेल त्याला लुबाडीत आहेत. यात महिलांचे वर्चस्व आहे. आम्हा महिलांना ३३ टक्के आरक्षण देऊन पुढे आणण्यासाठी, त्यांच्या कर्तृत्वशक्तीला वाव देण्यासाठी सरकार आणि समाज प्रयत्नशील आहे. ‘महिलांवर अन्याय होतो’, ‘महिला खूप सहन करतात’, ‘त्या खूप काही करू शकतात, पण त्यांना संधी दिली जात नाही’, ‘संधी द्या, त्या संधीचे सोने करतील’, अशी अनेक वाक्ये कानावर पडतात. ‘कॅश फॉर जॉब’ घोटाळ्यांत महिलांचा सहभाग पाहता, ही वाक्ये हास्यास्पद वाटतात. या इथे प्रामाणिक महिलांची क्षमा मागून म्हणावेसे वाटते की, निसर्गाने दिलेल्या आकर्षकपणाचा, रूपाचा, बुद्धिमत्तेचा आणि स्त्रीत्वाचा गैरफायदा घेत इतरांना फसवून कोट्यवधी कमवण्याचे काम महिला करतात. गरीब जनसामान्यांना नोकरी, प्लॉट, फ्लॅट, बिझनेस आदींची आमिषे दाखवून त्यांच्या जिवावर कोट्यधीश होण्याची स्वप्ने साकार करतात. संपत्ती कमवावी पण ती कमावण्याचा मार्ग नेहमीच प्रामाणिक व चांगला असला पाहिजे.

निसर्गनियमानुसार जन्म, मृत्यू आणि इहलोकाचा वारसा सर्व प्राणिमात्रांना ईश्वरेच्छेने मिळाला आहे. जन्माला आलेल्या सजीवाला जगण्यासाठी धडपड ही करावीच लागते. माणूस वगळता इतर प्राणी भूक लागली की अन्नाच्या शोधात फिरतात, अन्न मिळवतात आणि खातात. ते कुठेही अन्न साठवून ठेवत नाहीत, धन तर नाहीच नाही. पण सगळ्या सजीवांचा मुकुटमणी मानव प्राणी आहे त्याने आपली इतकी प्रगती केली आहे की अन्नधान्यापेक्षा त्याला पैसा, धन हेच सर्वश्रेष्ठ वाटते व ते मिळवण्याचे अनेक मार्ग त्याच्यापाशी आहेत. काही खडतर, काही सोपे, काही कष्टसाध्य तर काही विनाकष्टाचे. मार्ग कोणताही निवडला तरी त्यात प्रामाणिकपणा, सचोटी यांना पर्याय नाही. दुर्दैवाने आज चित्र फार उफराटे आणि निराशाजनकच दिसत आहे. जंगलवाटेवर, आडमार्गाला राहून शस्त्राची भीती दाखवून लुटणाऱ्यांना आपण ‘दरोडेखोर’ म्हणतो. मग, या अशा नोकरीचे आमिष दाखवून लुबाडणाऱ्या परीटघडीच्या ‘व्हाइट कॉलर’ महिलांना व लोकांना काय म्हणायचे? त्यांनी अगदी योजनाबद्ध रीतीने घातलेले हे दरोडेच नव्हेत का?

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

POP Ganesh Idol: गोव्यात प्लास्टर ऑफ पॅरिस गणेशमूर्तींच्या विक्रीवर कठोर बंदी घाला; हिंदू जनजागृती समितीची मागणी

Jitesh Sharma: लॉर्ड्समध्ये जितेश शर्माची 'फजिती'! 'या' खेळाडूमुळे मिळाली एन्ट्री, पाहा VIDEO!

Comunidade Land Goa: कोमुनिदादींच्या जमिनी केवळ गावकार व भागधारकांच्याच; हस्तक्षेप करण्याचा राज्य सरकारला अधिकार नाही

Viral Video: जगाला वेड लावणारा 'ऑरा फार्मर'! 11 वर्षांचं पोर बनलं सोशल मीडियावर स्टार; त्याचा अनोखा डान्स तुम्ही पाहिला का?

Nagpur Goa Highway: गोव्यात नेमके कोणते शक्तिपीठ? महामार्ग विरोधात रक्ताच्या अखेरच्या थेंबापर्यंत लढण्याचा राजू शेट्टींचा निर्धार

SCROLL FOR NEXT