सर्वेश बोरकर
कोकणच्या ठाणे-वाळुकेश्वर येथील अपरादित्य शिलाहाराने ११४०मध्ये मुंम्बईत वसई खाडीच्या उत्तरेकडील भागावर पुन्हा स्वारी केली आणि मही बिंब व प्रताप बिंबाने जिंकून घेतलेला भाग पुन्हा स्वतःकडे घेतला.
बिंबाचे खुद्द राजधानीचे गाव केळवे-माहीम आणि सोपारा. हा प्रदेश शिलाहाराने जिंकून प्रताप बिंबला ठाणे-साष्टी बेटात कोंडून टाकले. केळवे-माहीम हातचे गेल्यामुळे प्रताप बिंबाने वांद्र्याच्या दक्षिणेस एक नवे माहीम निर्माण केले आणि त्याला आपली राजधानी म्हणून घोषित केले.
हेच ते मुंबईचे माहीम जंक्शन. ह्या स्थानाचे नाव मुळच्या केळवे-माहीममधील माहीम वरून पडले हेदेखील ह्या महिकावतीच्या बखरीत स्पष्ट होते.
प्रताप बिंबाचा पुत्र मही बिंबने ठाण्यापलीकडे जाऊन शिलाहारांच्या कल्याण प्रांतावर हल्ला चढवला आणि ते हस्तगत केले. अशाप्रकारे साष्टी बेटांमाधून शिलाहारांची ११४१च्या आसपास हकालपट्टी झाली. मात्र शूर्पारक ऊर्फ नालासोपाराच्या उत्तरेकडे पुढची सव्वाशे वर्षे त्यांनी राज्य केले.
प्रताप बिंबच्या मागून त्याचा पुत्र मही बिंब गादीवर आला. त्याने ११४७ ते १२१२ अशी तब्बल ६५ वर्षे राज्यकारभार केला. ह्या दरम्यान ११८८ मध्ये चेउल येथील भोज राजा दक्षिणेवरून ठाण्यावर चालून आला.
उरण - पनवेल काबीज करत तो खाडीपलीकडे कळव्याला येऊन पोहोचला. मही बिंबला ह्याची खबर लागली होतीच. त्याने सेनापती केशवराव आणि हंबीरराव यांना ८ हजार फौज देऊन ठाण्याला रवाना केले होते. कळव्याला ह्या २ फौजेमध्ये तुंबळ युद्ध झाले. ह्यात खुद्द भोज राजा प्राणास मुकला. भोजाचे उरलेसुरले सैन्य पळत सुटले. मही बिंबाच्या फौजेचा मोठा विजय झाला.
सेनापती केशवरावाला त्याने गळ्यातील पदक अर्पण केलाचा स्पष्ट उल्लेख महिकावतीच्या बखरीत सापडतो. देवनारच्या एका शिपायाला ठाकूर पद दिले गेले. उत्तनच्या १२ शिपायांना राउत पद मिळाले.
ह्यानंतरच्या काही काळात मही बिंबाने शिलाहारांच्या ताब्यात असलेला सोपारा ते केळवे-माहीम आणि पुढे संजाण - नवसारी उत्तर सीमा, असा प्रदेश पुन्हा आपल्या ताब्यात घेतला.
आताच्या मुंबई, ठाणे - साष्टी - कल्याण आणि सोपारा ते नवसारी अशा विस्तृत प्रदेशावर त्याचे राज्य पसरलेले होते. मही बिंबने कामाई नावाच्या स्त्रीबरोबर लग्न केले आणि तिच्याकडून त्याला पुत्र झाला. त्याचे नाव केशवदेव ठेवले गेले. १२१२मध्ये जेव्हा मही बिंब वारला तेव्हा हा केशवदेव अवघ्या ५ वर्षांचा होता.
अर्थातच राज्याचा कारभार कामाई देवीवर येऊन पडला. तिनं केशवदेव बिंबाचा राज्यारोहण समारंभ घडवून आणला. अशा तर्हेने बिंब घराण्याचा तिसरा राजा राज्य करू लागला. केशवदेव बिंबाने राजा झाल्यावर अनेकांना इनामे दिली आणि ऐश्वर्याने राज्य केले असे बखर म्हणते. देशोधडीला लागलेला प्रांत ८० वर्षांत शेती, व्यापार-उद्योग यांची भरभराट होऊन पुन्हा एकदा स्थिरस्थावर झाला होता.
वयात आलेल्या केशवदेवाने ‘राजपितामह’ अशी पदवी धारण केली आणि त्याच्या बडेजावाचे पोवाडे लोक संस्थानिकांच्या व मांडलिकांच्या राजधान्यासमोरून गाऊ लागले. चेउल येथील भोज घराण्याचा बिंब घराण्यावर राग होता.
३० वर्षांपूर्वी झालेला पराभव अजूनही भोजांच्या जिव्हारी लागलेला होताच. त्यांनी पुन्हा एकदा युद्धाचा पवित्रा घेतला आणि ठाण्यावर चालून आले. केशवदेवास ही बातमी कळताच त्याने सर्व देसाई एकत्र केले.
बिंबाचे सैन्य पुन्हा एकदा खाडी उतरून कळव्याला भोजाचा मुकाबला करायला सज्ज झाले. बखर म्हणते, युद्धामध्ये देवनार येथील विनायक म्हात्रे याने बाण मारून राजा भोजाच्या डोक्यावरचा मुकुट खाली पडला. तुंबळ युद्धात भोज पुन्हा एकदा अपयशी झाला.
इतक्यात म्हसगडचा संस्थानिक जसवंतराव भोजाच्या मदतीला धावून आला. पुन्हा एकदा लढाई माजली. ह्यावेळी बिंबाच्या फौजेमधल्या सिंद्यानी पराक्रम दाखवला आणि जसवंतरावास जिवंत पकडला. युद्धानंतर झालेल्या तहात केशवदेवाने जसवंतरावास जीवदान देऊन सोडून दिले आणि भोजासमोर मैत्रीचा हात पुढे केला. १२३४च्या आसपास केशवदेव अवघ्या १७ वर्षांचा होता!
उत्तरकोकणात हे सर्व सुरू असताना घाटावर मात्र चालुक्यांचे राज्य संपुष्टात येऊन देवगिरीच्या यादवांचे राज्य आलेले होते. आता चालुक्यांच्या जागी यादव येऊन बसले होते. बिंब चालुक्यांच्या बाजूला तर जसवंतराव आता यादवांच्या बाजूला जाऊन बसला होता. अशातच एक छोटीशी घटना घडली ज्याने कोकणात पुन्हा युद्धाचे वातावरण तापू लागले.
भोजराजाने कोकणातून केशवदेव बिंबासाठी आंब्याच्या टोपल्या पाठवल्या होत्या, त्या ह्या जसवंतरावाने मधल्यामध्ये हडप केल्या. केशवदेवाने जसवंतरावाकडे निरोप पाठवला की, ’तुमच्यासारख्या भल्या लोकांनी चोऱ्या कराव्या हे युक्त नव्हे.’ ह्यावर जसवंतरावाने उलट निरोप धाडला.
’मगदूर असेल तर आमच्या गडाला येऊन, किल्ल्याकुलपे फोडून आंबे परत घेऊन जावे.’ हे ऐकून केशवदेव बिंब पुन्हा एकदा युद्धास उद्युक्त झाला. गेल्यावेळी ह्या जसवंतरावला जिवंत सोडावयास नको होते असे त्याला नक्कीच वाटून गेले असेल.
केशवदेवाने पुन्हा एकदा सूर्यवंशी, सोमवंशी आणि शेषवंशी देसायांना एकत्र केले आणि तो दुर्गवर चालून गेला. हा वेढा तब्बल १२ वर्षे सुरू होता. महिकावती बखरकार म्हणतो, ’चिंचाचे चिंचवणी खाऊन त्याच्या चिंचोऱ्या ज्या पडल्या, त्या रुजून, त्यांचे वृक्ष होऊन, त्यांच्या चिंचा केशवदेवाच्या सैनिकांनी खादल्या.’
शेवटी अंधेरी येथे म्हात्रे कामाला होता त्याने भेद केला आणि किल्ला एकदाचा केशवदेवाच्या हाती आला. पुन्हा एकदा जसवंतराव केशवदेवाच्या हाती सापडला. केशवदेवाने त्यास ठार केले. कारण या बखरीत पुढे कुठेच ह्या जसवंतरावचा उल्लेख येत नाही.
लढाई जिंकली म्हणून केशवदेवाने सर्व सरदारांना यथायोग्य इनामे दिली. ही लढाई अंदाजे १२३२मध्ये झाली. ह्यानंतर अवघ्या ५ वर्षात केशवदेव अचानक वारला. मरतेवेळी तो अवघ्या ३० वर्षांचा होता आणि त्यास कोणीच पुत्र-संतान नव्हते. अखेर सर्व देसायांनी मिळून मुख्यप्रधान जनार्दन यास गादीवर बसवायचा निर्णय घेतला.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.