Santinez Creek Dainik Gomantak
गोंयकाराचें मत

Santinez Creek: पणजी, ताळगावच्या प्रदूषणाचा 'सांतिनेज खाडी'ला विळखा

Santinez Creek Pollution: केवणे आणि नागाळीचे दोन्ही ओहळ ताळगावच्या शेतीला ओलावा देत सांतिनेज खाडीकडे येतात. पूर्वी पाटातून वाहणारे स्वच्छ पाणी आज प्रदूषणाने काळा रंग परिधान करून वाहताना पाहून नाकाला रुमाल लावावा लागला.

गोमंतक ऑनलाईन टीम

मधू य. ना. गावकर

आषाढ महिना सुरू झाला आणि पावसाच्या सरी कोसळून वनश्री हिरवा शालू नेसून सजू लागली. सुवासिनींची पावले पौर्णिमेच्या दिवशी वडाच्या झाडाकडे वळून त्या झाडाला गंध, हळदी कुंकू, फुलांच्या वर्षावाने त्याचे खोड दिसेनासे झाले. भगवान कृष्ण लहान असताना खोड्या करीत होता, म्हणून यशोदा आई त्याला दोरखंडाने बांधून ठेवत होती, तसेच सुवासिनींचा जमाव त्या वडाच्या महा-काय खोडाला सफेद सुताच्या धाग्याने आवळून बांधतात.

त्या सुवासिनी गेल्यावर वटवृक्षाखाली कपिलानंदा, काळीभद्रा, सुरभी, सुशीला आणि सुमन गोमाता त्या ठिकाणी येऊन, तिथे ठेवलेले दूध, साखर, गूळ, मध, अननस, आंबा, केळी, फणस आणि फुले खाऊन तृप्त होतात. मात्र, वडाच्या ढोलीतील मुंग्यांना त्या प्रसादाचा सुगावा लागताच, त्याचे लोंढेही मुळाकडे गर्दी करून ते एकमेकांवर चढून आपले खाद्य मिळवण्याचा प्रयत्न करतात.

तरी येणारा एक वर्षाचा काळ वटवृक्ष दोरखंडाने बंदिस्त असतो, कपिलानंदा गाईचा जन्म पृथ्वीपासून झाला. पवित्र, पाण्यापासून काळीभद्रा जन्मली, अग्नी पासून सुरभी, वायूपासून सुशीला जन्मली, आणि आकाशापासून सुमन जन्मली, या पाच गाईंना पृथ्वीच्या पाच तत्वांनी जन्म दिला, असे पुराणात वाचायला मिळते. त्या गायींच्या शेणापासून विभूती, भसीन, भस्म, क्षार, पंचगव्यापासून तयार केलेले भस्म सांब सदाशिव आणि दिगंबराने आपल्या अंगाला लावले.

आपण कपाळी लावतो त्या भस्माचे डोंगर कर्नाटक राज्यात गाणगापूर, चेट्टपट, उतनूर, कुपगल, बेल्लारी भागात आहेत. मात्र शास्रज्ञांच्या मते पुराणकाळातील त्या पाच गाईंच्या शेणाच्या राखेचे ते ढिगारे आहेत. आजही शेतकरी लोक गाईच्या शेणाची चुलीतील राख शेतासाठी वापरुन, चांगले पीक घेतात. या पसाऱ्याचा विषय डोक्यात घोळवत माशेल कडून बसने पणजी बसस्थानक गाठले, त्या ठिकाणी मला सांतीनेज खाडीचा प्रवास करण्यासाठी पणजीत राहणाऱ्या वास्तुरचनाकार तलुला डिसिल्वा आपली गाडी घेऊन थांबल्या होत्या.

गाडीने आम्ही लगेच ताळगावचा रस्ता धरला, पणजीकडून दहा पंधरा मिनिटात अरबी समुद्रात घुसलेल्या बांबोळी पठाराच्या पायथ्याशी नागाळी आणि केवणे परिसरातील शेततळ्याकडे, दोन झऱ्यांच्या रुपाने वहात येत, ते पाणी तळ्यात साठून खालच्या बाजूनी पाटाच्या रुपात शेतीला पुरवठा करते. पूर्वी पाटातून वाहणारे स्वच्छ पाणी आज कावळ्याचा रंग परिधान करून वाहताना पाहून नाकाला रुमाल लावावा लागला.

पावसाच्या सरी कोसळल्याने ओल्या मातीच्या चिखलाला तुडवीत आम्ही दोघे त्या दोन ओहळांच्या काठाने जात प्रदूषित पाण्याचे निरीक्षण करीत होतो. दूरवर काही शेतकऱ्यांनी भात रोप लावले होते, त्या बियाण्याला नुकतेच आलेले हिरवेपण दिसत होते. ते कोंब खाण्यास पारव्यांचे थवे जमलेले पाहून, त्या शेतकऱ्यांचे कष्ट वाया जाणार हे मनात शिरले.

ओहळाचा एक फाटा नागाळी कडून शेतातून कामराभाटात येऊन सांतिनेज खाडीच्या उगमाकडील तलावात खारट पाण्यात विलीन होतो. दुसरा फाटा केवणे, करंझाळेकडून केरान टोकां शेतातून वाहात जात कामराभाटात येऊन ते दोन्ही ओहळ आपले गोड पाणी सांतिनेज खाडीच्या उगमाकडील तलावात खारट पाण्यात विलीन होते.

केवणे आणि नागाळीचे दोन्ही ओहळ, तिथल्या भागातील लोकांच्या विहिरी, तलावांत पाणी भरून पुढे ताळगावच्या व्हडले भाटातील शेतीला ओलावा देत खाडीकडे येतात. पूर्वी गोड्या पाण्यात कासव, बेडूक, पाणसर्प तसेच थिगुर, देरवळे, सांगट, वाळेर, करणकाटके अशी मत्स्यसंपदा ओहळातील स्वच्छ पाण्यात जन्म घेत होती. आज त्या दोन्ही ओहळांतून दुर्गंधीयुक्त काळ्या डांबराप्रमाणे पाणी वाहताना पहावयास मिळते. एकेकाळी चतुर्थी, दसऱ्याकडे सोन्याचा मुलामा चढवल्याप्रमाणे पिकून शेते वाऱ्याच्या झोतात डोलायची.

कापणी मळणी झाल्यावर भाताच्या राशी घरी नेल्यावर शेतकरी आनंदीत व्हायचा, हिवाळ्यात तांबडी भाजी, मुळा नवलकोबी, मिरची, कांदा, रताळी, कलिंगड, वांगी, वाल खुडून भाजी पणजी बाजारात विकून संसार चालवत होते. भाताची पेज, उकड्या तांदळाचे शीत ओहळातील गोडी मासळी, शेतातील भाजी आणि करंझाळे समुद्र किनारी रापणीत पकडलेले बांगडे, तारले पेडे, दोडयारे, सवनांळे, इसवण, झिंगे अशी ताजी मासळी आणून जेवण करून समाधानी व्हायचे.

सकाळी पिकाला पाणी देण्यास शेतात शेतकऱ्यांचा मेळा भरायचा. आज शेतात हातावर मोजण्याइतकीही माणसे पहायला मिळत नाहीत. पन्नास वर्षांपूर्वी आल्तिनो टेकडीवरून पूर्व दिशेकडून वर येणाऱ्या सूर्याची किरणे हिरव्यागार विशाल शेतीवर पसरायची. संध्याकाळचा सूर्य मावळताना त्याची किरणे समुद्रीय पाण्यावर पडून परावर्तित होऊन त्या किरणांच्या रुपेरी प्रकाशाने, हिरवी शेती न्हाऊन जायची. आज ताळगावची परीस्थिती बदलली असून भल्या मोठ्या उंच इमारती आकाशाला टेकू दिल्याप्रमाणे दाटीवाटीने उभ्या दिसतात.

याबाबतीत पणजी शहरालाही मागे टाकले आहे. सांतिनेजची खाडी उगमाकडून खाली जाताना, आल्तिनो टेकडीचे पाणी आपल्या प्रवाहात घेण्यासाठी, तांबडी माती परिसरातून पिटरभाट, कामराभाट, खाजनभाटाकडून टोंका साकवाखालून प्रवास करीत पुढे अग्नीशमन दल परीसरात ती कांपाल इनडोअर स्टेडीयमकडे उगम पावलेल्या ओह‌ळाचे वहात येणारे पाणी घेऊन पुढे आरोग्य खात्याच्या इमारतीमागून, साकव ओलांडून जुन्या मेडिकल हॉस्पिटल परिसरात ती मांडवी नदीस मिळते.

चाळीस वर्षांपूर्वी मी आरोग्य खात्यात कामाला जाताना पाहिले होते, भरती आल्यावर मांडवीतून सांतिनेज खाडीच्या मुखातून खारे पाणी वरच्या भागात कामराभाटाकडे जाताना, शेवटा, काळुंद्र, खरचाणी खेकडे, पालू, तामसा मासळी पकडण्यासाठी जाळ, काटाळी लावून मासळी पकडत होते, ते दृष्य आज इतिहास जमा झाले आहे.

आज जीवनदायी खाडीच्या प्रवाहात प्लास्टिक पिशव्या, बाटल्या, काचेच्या वस्तू, आणि सांडपाण्याची पाईप पहावयास मिळते. प्रशासकीय व व्यापारी कारणांनी पणजी शहर आणि ताळगाव विकसित झाले, लोकवस्ती वाढली. पण सांतिनेज खाडी आणि तिच्या ओहळांच्या मानगुटीवर प्रदूषणाचे भूत बसले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Advocate Ankur Kumar Attack: मोरजीत मारहाण; संशयित ध्रुव, दिलीप यांना दोन दिवसांची पोलिस कोठडी; अन्य साथीदारांचा शोध सुरू

VIDEO: 'FIFA World Cup' हातातून निसटला, मेस्सी गुडघ्यावर बसून रडला; फायनलनंतरचा भावनिक व्हिडिओ व्हायरल

Horoscope: सोमवार ठरणार भाग्याचा दिवस! 'या' 4 राशींना नोकरीत मोठे यश, करिअरमध्ये मिळणार सुवर्णसंधी

Vijayanagara Empire: 600 वर्षांपूर्वीचं अभियांत्रिकीचं अद्भुत उदाहरण! हंपीतील 'बुक्क' जलवाहिनी आजही सांगते विजयनगरच्या वैभवाची कहाणी

Goa Weather: राज्यात तुरळक पावसाच्या सरी, काही भागात झाडे पडण्याच्या घटनांची नोंद

SCROLL FOR NEXT