Saptakoteshwar Temple Dainik Gomantak
गोंयकाराचें मत

Saptakoteshwar Temple: गोव्याच्या अधिदैवताचे मूळ स्थानी पुनर्स्थापन? श्री सप्तकोटेश्वर-कोटीतीर्थाच्या जीर्णोद्धाराला सुरुवात

Saptakoteshwar Temple Divar History: फार प्राचीन काळापासून गोमंतक - गोवा ही पवित्र भूमी, देवभूमी म्हणून ओळखली जाते. निसर्गसौंदर्याने नटलेल्या या प्रदेशाला पुराणपरंपरेत ‘आनंदवनकानन’ असे संबोधले गेले आहे.

गोमंतक ऑनलाईन टीम

डॉ. भूषण भावे

शुक्रवार ४ सप्टेंबर रोजी सकाळी ९ वाजता पोर्णें तीर्थ, दिवाडी येथे कोटीतीर्थ कॉरिडोर विकास प्रकल्प ह्या गोवा सरकारच्या पुरातत्व खात्याच्या प्रकल्पाची सुरवात म्हणून गोवा राज्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत व केंद्रीय राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांच्यातर्फे श्री हाटकेश्वर व कोटीतीर्थ येथे महाभिषेक, उदकशांती व मांडवी पंचगंगा आरती इ. धार्मिक विधी व प्रकट सभेचे आयोजन केले आहे. त्यानिमित्त हा खास लेख.

फार प्राचीन काळापासून गोमंतक - गोवा ही पवित्र भूमी, देवभूमी म्हणून ओळखली जाते. निसर्गसौंदर्याने नटलेल्या या प्रदेशाला पुराणपरंपरेत ‘आनंदवनकानन’ असे संबोधले गेले आहे. सह्याद्रीची बलदंड पर्वतरांग आणि दुसऱ्या बाजूला अथांग हिंद महासागर यांच्या सान्निध्यात वसलेली ही भूमी केवळ भौगोलिकदृष्ट्या वैशिष्ट्यपूर्ण नाही, तर धार्मिक, सांस्कृतिक आणि ज्ञानपरंपरेच्या दृष्टीनेही अत्यंत समृद्ध आहे.

गोव्याच्या इतिहासातील सर्वाधिक वैभवशाली कालखंडांपैकी एक म्हणजे कदंब राजवट. साधारणपणे शके १००८ ते १३०० या कालखंडात कदंबकुलाने गोव्याहून राज्य केले. प्रारंभी चंद्रपूर अर्थात चांदोर आणि नंतर गोपकपट्टण या केंद्रांतून त्यांनी राज्यकारभार केला. कदंबांनी कला, स्थापत्य, प्रशासन, व्यापार आणि संस्कृतीला मोठी चालना दिली. झांझीबारपासून सुमात्रापर्यंतच्या विविध राष्ट्रांशी व्यापारी संबंध प्रस्थापित झाल्यामुळे गोमंतक प्रदेश समृद्ध आणि वैभवशाली बनला.

कदंब राजांचे श्री सप्तकोटेश्वर हे कुलदैवत व कुलदेवी श्री चामुंडा होती. ‘श्री सप्तकोटेश्वरलब्धवरप्रसाद’ हे बिरुद ते अभिमानाने धारण करीत. त्यांचे राजचिन्ह सिंह होते. गोव्याच्या प्राचीन परंपरेत सिंहाला असलेले महत्त्व लक्षात घेता काही शिलालेख आणि ताम्रपटांत गोव्याचा ‘सिंहल’ असा उल्लेख आढळतो.

याच कालखंडात दिवाडी बेटावरील श्री सप्तनाथ-सप्तकोटेश्वर, श्री गणनाथ आदी मंदिरांचा जीर्णोद्धार झाल्याचे संदर्भ आढळतात. बाराव्या शतकात कदंबांनी उभारलेले हे भव्य मंदिर पुढे चौदाव्या शतकाच्या मध्याला दख्खनच्या सुलतानाने म्हणजे बहामनी काळात अल्लाउद्दीन खिलजीचा सेनापती मलिक कफूरने उद्ध्वस्त केले. या काळातील इतिहास कोकण - आख्यानात असा शब्दबद्ध करण्यात आला आहे -

म्लेछांनी केला उत्पात

देवांसि अनर्थ आरंभिला

श्री सप्तकोटेश्वर देवासी

उपडून चिखली घातिला बांधासी

कदंब राजवटीनंतर आलेल्या विजयनगर साम्राज्याचा मंत्री माधव मंत्री यांनी चौदाव्या शतकाच्या अखेरीस ते पुन्हा बांधले, अशी साक्ष मिळते. मुक्तिक्षेत्र आणि संस्कृत विद्येचे माहेरघर म्हणून काशी प्रसिद्ध आहे. या दोन्ही बाबतींत गोव्याचे काशीशी साम्य असल्याची प्राचीन परंपरा आहे. गोकर्णादुत्तरे भागे शतयोजन विस्तृतम् ।

तस्य गोवापुरी नामनगरी पापनाशिनी ॥

अर्थात, सुप्रसिद्ध गोकर्ण क्षेत्राच्या उत्तरेला गोवापुरी नावाचे पापनाशक क्षेत्र आहे, अशी या परंपरेत कल्पना आहे. दिवाडी बेटाजवळ पंचनद्यांचे (म्हादईच्या शाखा), गोमती अर्थात मांडवी व अघनाशिनी अर्थात झुआरी नदीचे समुद्राशी होणारे संगमक्षेत्र अत्यंत पवित्र मानले गेले. या पवित्र संगमामुळे दिवाडी-नार्वे परिसराला प्राचीन काळापासून तीर्थक्षेत्राचे स्वरूप प्राप्त झाले.

श्री सप्तकोटेश्वर : कोंकणभूमीचे अधिष्ठान

दिवाडीतील नार्वे परिसराच्या पावित्र्याशी श्री सप्तकोटेश्वर देवस्थानाची परंपरा निगडित आहे. आख्यायिकेनुसार सप्तऋषींनी सात कोटी वर्षे तपश्चर्या करून भगवान शिवांना प्रसन्न केले आणि सात धातूंच्या मिश्रधातूपासून शिवलिंगाची स्थापना केली. म्हणून या दैवताला सप्तकोटेश्वर हे नाव प्राप्त झाले. या पवित्र शिवलिंगाचे केवळ दर्शन केल्याने पापनाश आणि स्पर्शाने मुक्ती प्राप्त होते, अशी श्रद्धा आहे. म्हणूनच ‘क्षेत्रं यवाधिकं काश्याः’ हे क्षेत्र काशीपेक्षा जवभर अधिक श्रेष्ठ आहे, अशी भक्तिपरंपरेतील भावना व्यक्त होते.श्री सप्तकोटेश्वर हे केवळ गोव्याचे नव्हे, तर संपूर्ण कोंकणपट्टीचे अधिष्ठानदैवत मानले जाते. काशीप्रमाणेच गोवा हे तीर्थयात्रा आणि विद्येचे केंद्र होते, ही बाब गोव्याच्या सांस्कृतिक इतिहासाचे वैशिष्ट्य अधोरेखित करते.

यात्रेची परंपरा आणि पोर्तुगीज आक्रमण

या पवित्र क्षेत्रात पुराणकाळापासून हजारो हिंदू तीर्थयात्रेसाठी येत असत. येथे होणारी महायात्रा श्रावण वद्य अष्टमी अर्थात जन्माष्टमी, गोकुळाष्टमीच्या दिवशी भरत असे. परंतु सा.श. १५१० मध्ये पोर्तुगीजांनी गोवा जिंकल्यानंतर या परंपरेवर मोठा आघात झाला. तिसवाडीतील मंदिरे नष्ट करण्यात आली, तीर्थक्षेत्रे भ्रष्ट करण्यात आली आणि हिंदू समाजाला आपल्या धार्मिक केंद्रांपासून दूर करण्याचा प्रयत्न झाला. मोठ्या प्रमाणावर धर्मांतरण करण्याचे पोर्तुगीजांचे दिवाडी हे पहिलेच गाव होते. याच काळात नार्वे, दिवाडी, येथील श्री सप्तकोटेश्वर मंदिर उद्ध्वस्त करण्यात आले आणि त्याची परंपरा पुढे डिचोली तालुक्यातील त्याच नावे नार्वे गावात स्थलांतरित झाली.

जेजुईत इतिहासकार फादर फ्रान्सिस्को द सौझा यांनी आपल्या ‘Oriente Conquista’ या ग्रंथात दिवाडीच्या मंदिराचे आणि तेथील तीर्थपरंपरेचे महत्त्व नोंदविले आहे. त्यांच्या लेखनानुसार, दिवाडी हिंदूंसाठी तितकेच पवित्र होते, जितके ख्रिस्ती लोकांसाठी पवित्र भूमी. मंदिर नष्ट झाल्यानंतरही विशिष्ट दिवशी हिंदू तेथे मोठ्या संख्येने येत आणि मूळ मंदिराच्या समोरील नदीपात्रात स्नान करून धार्मिक पुण्यलाभ मिळविण्याचा प्रयत्न करीत. श्री सप्तकोटेश्वर बरोबरच जवळच्याच श्री हाटकेश्वर या देवाचेही दर्शन घ्यायची प्रथा या काळात पडली असावी.

लिओनार्डो पेस यांच्या ‘Prontuario das Definicoes Indicas’ या ग्रंथातील वर्णनही गोव्याच्या मंदिरसमृद्ध परंपरेची साक्ष देते. त्यांच्या नोंदीनुसार, गोव्यात मंदिरे इतकी विपुल होती की शहरे, गावे आणि वस्तीच नव्हे, तर उंच टेकड्या, बेटे आणि कड्यांवरही मंदिरे आढळतात. १२व्या शतकातील तांबडी सुर्ल येथील शिवमंदिर, विजयनगरच्या राजवटीतील बांदिवडे येथील स्वयंभू श्री नागेश, विशेषतः शिरोड्याचा व अनेक गावांतील श्री शिवनाथ, मूळ कुठ्ठाळीचा व सध्या मंगेशी येथील श्री मंगेश, बोरीचा श्री सिद्धनाथ, पारोड्याचा श्री चंद्रनाथ, कदंब राजवटीतील दिवाडी येथील प्रस्तुत व पुढे स्थलांतरीत झाल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजवटीतील नार्वे येथील श्री सप्तकोटेश्वर मंदिर यांच्या रूपात प्राचीन काळापासून गोव्यात व उर्वरित कोकणात शिवभक्तीची प्राचीन परंपरा आहे.

सा.श. १५१० मध्ये पोर्तुगीज सत्तेची सुरुवात झाल्यानंतर गोमंतकाच्या धार्मिक आणि सांस्कृतिक जीवनावर मोठे संकट आले. शेकडो मंदिरे उद्ध्वस्त करण्यात आली. हिंदूंची तीर्थक्षेत्रे आणि विद्याकेंद्रे बळकावून त्यांच्या जागी चर्च उभारण्यात आली. दिवाडीतील श्री सप्तकोटेश्वर मंदिरही या विद्ध्वंसातून सुटले नाही. मात्र, मंदिर उद्ध्वस्त झाले, तरी परंपरा नष्ट झाली नाही. दैवताची उपासना आणि भक्तांची श्रद्धा पुढे चालू राहिली. मूळ देवस्थानाच्या परंपरेचे स्थलांतर नार्वे येथे झाले. नंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी १६६८ मध्ये श्री सप्तकोटेश्वर मंदिराचा जीर्णोद्धार केला. त्यामुळे मंदिराच्या पुनरुज्जीवनाला धार्मिकच नव्हे, तर ऐतिहासिक आणि सांस्कृतिक महत्त्वही प्राप्त झाले. परंपरा टिकली, यात्रा क्षीण झाली

डिचोली तालुकाही पुढे पोर्तुगीजांच्या ताब्यात गेल्यानंतर गोकुळाष्टमीची ही प्राचीन यात्रा क्षीण होत गेली. तरीही तिची परंपरा पूर्णपणे लोप पावली नाही. आजही गोकुळाष्टमीच्या दिवशी शेकडो हिंदू या यात्रेसाठी येतात. यातून एक महत्त्वाची गोष्ट स्पष्ट होते, राजसत्ता बदलू शकते, मंदिरे उद्ध्वस्त होऊ शकतात; परंतु श्रद्धा आणि सांस्कृतिक स्मृती सहज नष्ट होत नाहीत.

आजची गरज : मूळ स्थानी पुनर्स्थापना

गोव्याच्या मुक्तीला सहा दशके उलटून गेली आहेत. तरीही पर्यटनाच्या क्षेत्रात आणि काही वेळा सरकारी व बिगर-सरकारी प्रचारामध्ये गोव्याला ‘पूर्वेचे रोम’ म्हणून मांडण्याची प्रवृत्ती दिसते. गोव्याचा इतिहास त्यापेक्षा कितीतरी व्यापक आणि प्राचीन आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Post Office Recruitment 2026: 10वी पास तरुणांसाठी खूशखबर! पोस्ट ऑफिसमध्ये 130 पदांवर भरती; अर्ज कुठे करावा? अर्जाची अंतिम तारीख काय? जाणून घ्या सर्व

Saptakoteshwar Temple History: शिल्पावशेषांतून उलगडतोय दिवाडीच्या सप्तकोटेश्वर मंदिराचा इतिहास; कदंब स्थापत्याला नवा उजाळा

Iran America Conflict: "हबीबी, इराणला या!" युद्धाच्या धमकीवर तेहराननं उडवली ट्रम्पची खिल्ली; 3 डी गेमचा VIDEO केला शेअर

8th Pay Commission: 8व्या वेतन आयोगाआधी सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी; सुप्रीम कोर्टाचा 'MACP' संदर्भात महत्त्वाचा निर्णय

DJ Controversy: पुण्यात 'DJ'चा सवाल; गोव्यात नरकासुराचे काय?

SCROLL FOR NEXT