डॉ. ऑस्कर रिबेलो
‘राम काणकोणकर हल्ला प्रकरणा’ची संध्याकाळ आता सुरू झाली आहे. पुढे रात्र होईल आणि तीही संपून दिवस उजाडेल. तोवर राजकीय कोंबडे आपापल्या खुराड्यात स्वस्थ झोपा घेतील. विरोधाचे रविकिरण दिसू लागताच पुन्हा आरवतील. त्यांच्या आरवण्यानेच तो सूर्य उगवलाय असे भासवत राहतील.
तूर्तास सर्वत्र नीरव शांतता आहे. नाही म्हणायला, ‘रामहल्ला’ प्रकरण वेगाने धसास लावण्याचे सामर्थ्य असलेले रवि नाईकही काळाच्या पडद्याआड गेले आहेत. त्यांच्या तेजोबलावर झळकणारे कैक चंद्र पिसे लावत फिरत असल्याचे नवे अबलाबल पाहत, ‘रवि मी’ म्हणण्याचा सार्थ अभिमान बाळगणार्या व्यक्तिमत्त्वाने काळाच्या रंगमंचावरून मायबाप प्रेक्षकांचा ‘रामराम’ घेतला.
त्यांच्या कथा ओठी असणारे पोलिसही निवृत्त झाले आहेत. ‘रामहल्ल्या’विरोधात आरंभशूरागत पेटून उठलेल्या निखार्यांचे आता कोळसे झाले आहेत. कितीही उगाळले तरी काळेच!
गोव्यात दर महिन्याकाठी एक तरी असे कागदी होडीचे प्रकरण नसलेल्या पाण्यात वल्हवत असते, स्वत:चे पाणी दाखवत असते. ज्याच्यासाठी उन्हाळा सोसला तो पाऊस येतोही. पण, होडी तरंगावी म्हणून नव्हे तर बुडावी म्हणून.
दोष केवळ पावसाचाच असे म्हणता येत नाही; होडीच्या बुडण्यामागे साजुक कमळे व नाजुक हात खूप असतात! त्या होडीच्या बुडण्याचे दु:ख स्वत:चे लहानपण जपलेल्या माझ्यासारख्या अनेकांना असते. काणकोणकरी होडी का बुडाली, याचा माझ्या अल्पमतीने शोध घेण्याचा हा लहानसा प्रयत्न...
या प्रकरणातील तीन मुद्दे बहुधा निर्विवाद असावेत.
= रामला निर्दयपणे मारहाण करण्यात आली, तीही भरदिवसा. गुन्हेगारांना आपण पकडले जाऊ, शिक्षा होईल, ‘कुणी करायला लावला हल्ला’ हे विचारले जाईल याची जराही भीती नव्हती. त्यांना परिणामांची अजिबात पर्वा नव्हती.
= रामाला न्याय मिळावा यासाठी ‘जस्टीस फॉर रामा’ची हाक दिलेल्या लोकांपर्यंत स्वतःची बाजू पोहोचवायला रामने तब्बल २५ दिवस घेतले. इतके दिवस घेणे, खरोखरच अतिशय विचित्र आहे. हेच रामा काणकोणकर दररोज टीव्हीवर आणि वर्तमानपत्रांमध्ये सगळ्यांशी बोलत होते. अगदी राजन नारायणसारख्या ज्येष्ठ पत्रकारांशीदेखील.
= प्रमोद सावंत आणि रोहन खंवटे हेच त्या हल्ल्यामागचे सूत्रधार असल्याचा स्फोटक आरोप रामाने रुग्णालयातून बाहेर पडल्यावर केला.
या तीनही गोष्टी निर्विवाद सत्य आहेत. यावर वाद घालता येत नाही. बरोबर ना??
वर्तमानपत्रांच्या पहिल्या पानावर असलेला रामा, आता तिसर्या चौथ्या पानावर ढकलत ढकलत बातमीमूल्य नसलेली घटना झालाय. आता बातमीत आहेत, त्या घरफोडीच्या, दारू पिऊन हुज्जत घालणार्या पर्यटकांच्या व पर्वरीतील न बुजलेल्या खड्ड्यांच्या. बातम्यांत आता राम उरलाच नाही. पंचवीस दिवस उलटल्यावर लोकही आपल्या दैनंदिन रामरगाडग्यात अडकले आहेत.
नाही म्हणायला थोडीशी संतापाची लाट भाजपमध्ये आहे. त्यांच्या प्रिय नेत्यावर अशा प्रकारे कलंक लावला गेल्यानंतर ते स्वाभाविकही आहे. विरोधी पक्षाचे आमदार मात्र आपली बाजू अजून ठरवायच्या विचारात आहेत.
आत्ता बोलावे की बोलूच नये या संभ्रमात आहेत. स्वप्न पाहताना अचानक जाग आल्यावर वास्तव आणि स्वप्न यातील गोंधळ त्यांना भ्रमिष्टावस्थेत घेऊन जात आहे. ‘आय हॅव अ ड्रीम’चे संतापाने व आवेशाने भरलेले भाषण, ते रास्तारोको, ते काळे कपडे आताशा फिकट झाले आहेत. गळून पडलेल्या नखांनी सत्ताधार्यांना कुरतडणार्या प्रेस नोट कंटाळा येईस्तोवर काढण्याचा रतिब त्यांनी सुरू केलाय.
या सर्वांत जास्त फटका बसलेले राम आणि त्याचे समर्थक, ‘विकले गेले’ अशा आरोपांचा भडिमार सहन करत आहेत. माध्यमांनी रामाला विनोदी पद्धतीने खलनायक ठरवण्याचे हास्यास्पद काम सुरू केले आहे.
त्यांना आता लक्षात आले आहे की त्यांनी मोठा घास घेतला आहे. रामाला सल्ले देण्याचे काम सुरू झाले आहे. मित्रा रामा, तुला जे कोणी सल्ले देत आहेत किंवा ज्यांचे सल्ले जाणतेपणी, अजाणतेपणी तू ऐकत आहेस, ते सर्व सल्ले तुझ्या हिताचे नाहीत. त्यांच्या शंका तुझ्या कार्यावर बोळा फिरवणार्या लघुशंका आहेत. तू तुझ्या कानांची मुतारी करून घेऊ नयेस, असे मला वाटते.
स्पष्टच सांगतो; हल्ल्यानंतर दुसर्या दिवशी मी रामला स्वतः भेटलो होतो. तो फार जखमी आणि सुजलेला होता. पण पूर्णपणे सावचित्त, शुद्धचित्त आणि स्पष्ट बोलत होता. तेव्हाच त्याला म्हटले होते, ‘हीच वेळ आहे. ताबडतोब, आताच तुझी गोष्ट सर्वांसमोर मांड. स्वत: सगळ्यांना सांग. म्हणजे अफवा, शंका आणि दिशाभूल होणार नाही.’
पुढे काय? काहीच नाही. माझ्यासारख्या मूर्ख नास्तिकाच्या म्हणण्यावर कुणाचीही श्रद्धा नसते!
पण मी जो मुद्दा मांडतो आहे, तो ना राजकारण्यांसाठी आहे,
ना कार्यकर्त्यांसाठी, ना रामसाठी, ना माध्यमांसाठी, ना गोवेकरांसाठी. माझा सवाल आहे तो आपल्या झगमगत्या, देखण्या, आदरणीय पोलीस दलाला. आपल्या प्रामाणिक, भ्रष्टाचारमुक्त, कर्तव्यदक्ष पोलिसांना.
= कॅमेर्यात कैद झालेले हल्लेखोर तुमच्या ताब्यात आहेत.
=ख झेनिटो, बिश्नोई तुमच्या ताब्यात आहे.
=ख हल्ला झालाय याचे पुरावे निर्विवाद आहेत.
तर मग, त्या सगळ्या मारहाणीनंतर, ते गुन्हेगार तुमच्या ताब्यात असताना, कृपया आम्हाला सांगा - रामवर हल्ला का झाला??
अगदी स्पष्ट आणि थेट, कोणताही आडपडदा न ठेवता सांगून टाका. जर कोणतेही राजकारणी यात गुंतलेले नसतील तर मग त्या सर्वांना गुलाबी, लाल महोत्सवांची उद्घाटने करू द्या खुशाल! जर रामचे या गुंडांशी वैयक्तिक वैर असेल (ज्याची शक्यता नगण्य आहे), तर तेही स्पष्ट सांगा. वेडाचे झटके आल्यामुळे त्यांनी हल्ला केला, तर तसेही सांगा. गप्प बसू नका. बोला, सांगा. कारण शोधणे व ते सांगणे हेच तुमचे काम आहे.
गोव्यातील कायदा आणि सुव्यवस्था पार कोलमडली आहे. त्याहीपेक्षा कोलमडवणारी गोष्ट म्हणजे कोणालाच काही फरक पडेनासा झालाय. हीच अनास्था आणि उदासीनता २०११ ते २०१४ या काळात - यूपीए सरकारच्या - होती. त्याचा परिणाम काय झाला, हे सर्वांना माहीत आहे. तोच परिणाम न जाणवण्यामागे केवळ मोदींचा ‘फील-गुड’ प्रभाव आहे.
खरे सांगायचे झाल्यास या प्रकरणाने आता मला पार थकवून टाकले आहे. मी फक्त आपल्या पोलीस अधिकार्यांकडून एका गोष्टीची वाट पाहतो आहे; ‘रामावर हल्ला का झाला?’
या प्रश्नाचे खरेखुरे उत्तर. मला आशा आहे की, माननीय न्यायाधीश, सर्व अर्ज ऐकल्यावर तुम्हा पोलीस अधिकार्यांना उत्तरदायी ठरवतील आणि हाच प्रश्न विचारतील, ‘रामावर हल्ला का झाला?’ कारण हाच एक प्रश्न आहे ज्याचे उत्तर मिळणे खूप आवश्यक आहे.
ताजा कलम : कार्यकता असलेल्या माझ्या एका मित्राने मला विचारले, ‘जर रामचा या हल्ल्यात मृत्यू झाला असता तर? मग पोलीस जीएमसीच्या शवागारात जाऊन त्याच्याकडून ‘स्टेटमेंट’ घेणार होते का? या मारहाणीचा मग ‘हत्या’ म्हणून तपास सुरू झाला असता?’
पोलिसहो! जिचे रक्षण करण्याची जबाबदारी तुमच्यावर आहे, त्या कायदा सुव्यवस्थेचाच खून झाला आहे, तेव्हा या प्रकरणाचा ‘हत्या’ म्हणूनच तपास करा. कदाचित उत्तर सापडेल!
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.