प्रतापगड हा महाराष्ट्रातील एक प्रसिद्ध डोंगरी किल्ला सातारा जिल्ह्यातील जावळी तालुक्यात महाबळेश्वरच्या नैर्ऋत्येस सुमारे १३ किलोमीटरवर आहे. त्याची समुद्रसपाटीपासून उंची १,०९२ मीटर असून, पूर्वेकडील बाजूस ३४० मीटर आणि पश्चिमेकडे ८७० मीटर खोल दरी आहे. शिवाजी महाराजांनी जावळी खोरे जिंकल्यानंतर मोरो त्रिंबक पिंगळे यांना १६५६ मध्ये हा किल्ला बांधून घेण्याची आज्ञा दिली.
मुख्य किल्ला, माची आणि बालेकिल्ला असे या किल्ल्याचे तीन भाग होतात. मुख्य किल्ला व बालेकिल्ला भागांत तलाव असून, संरक्षणाच्या दृष्टीने किल्ल्याच्या चोहोबाजूंस भक्कम तटबंदी व बुरूज आहेत. बालेकिल्ल्याचे क्षेत्रफळ ३,६६० चौ. मी., तर मुख्य किल्ल्याचे ३,८८५ चौ. मी असून, दक्षिणेकडील बुरूज १० ते १५ मी. उंचीचे आहेत. त्यांपैकी अफझल, रेडका, राजपहारा, केदार इत्यादी बुरुजांचे अवशेष टिकून आहेत.
अफझल बुरूज हा वैशिष्ट्यपूर्ण असून, तो निमूळत्या डोंगरधारेच्या शेवटी आहे. या भागाला माची म्हणतात. कारण अशाच स्वरूपाचे बांधकाम राजगड (सुवेळा व संजीवनी), तोरणा ( झुंजार) या किल्ल्यांवरील माच्यांचे आहे.
मुख्य किल्ल्यात प्रवेश करण्यासाठी दोन दरवाजे पार करून जावे लागते. दोन्ही दरवाजांवर शरभाच्या प्रतिमा दिसतात. दोन दरवाजे पार केल्यावर शिवाजी महाराजांनी १६६१ मध्ये मोरो त्रिंबक पिंगळे यांच्या हस्ते स्थापन केलेले तुळजाभवानीचे मंदिर आहे. या देवालयासमोर दोन उंच दीपमाळा आहेत.
त्या जवळच नगारखान्याची इमारत आहे. तिचा १९३५ मध्ये जीर्णोद्धार करण्यात आला. भवानीदेवीचे मूळ मंदिर फक्त दगडी गाभाऱ्याचे होते. १८२० मध्ये सातारच्या प्रतापसिंह महाराजांनी (१८१८-१८३९) तेथे लाकडी मंडप बांधला. नंतर हा मंडप आगीच्या भक्ष्यस्थानी पडला व मंदिरातील दागिन्यांची चोरी झाली. औरंगजेब दक्षिणेत आला असताना या मंदिरासही काही उपद्रव झाला.
गडावर वेगवेगळ्या ठिकाणी विखुरलेल्या तोफा या मंदिरात आणून ठेवलेल्या आहेत. तिसरा दरवाजा पार केल्यावर केदारेश्वराच्या मंदिरात पोहोचता येते. या दरवाजावरदेखील शरभाच्या प्रतिमा आहेत. गडाच्या वायव्येला तटबंदीमध्ये बांधलेला रेडका बुरूज दिसतो. गडाच्या उत्तरेकडील तटबंदीमध्ये आणि केदारेश्वर मंदिरामागील तटबंदीमध्ये चोरदरवाजे आहेत.
प्रतापगडचे ऐतिहासिक महत्त्व छत्रपती शिवाजी महाराज आणि अफझलखान भेट व त्या प्रसंगी झालेला अफझलखानाचा वध या घटनेमुळे वाढले (१६५९). छत्रपती राजाराम महाराजसुद्धा जिंजीस जात असताना प्रथम प्रतापगडास आले.
पेशवाईत नाना फडणवीसांनी येथे सखाराम बापूंना काही दिवस नजरकैदेत ठेवले होते (१७७८). पुढे ज्या वेळी नाना फडणवीसांविरुद्ध दौलतराव शिंदे व त्यांचा विश्वासू मंत्री बाळोबा कुंजीर हे चालून आले, तेव्हा नानांनी सन १७९६ मध्ये काही दिवस या किल्ल्यात आश्रय घेतला होता. सन १८१८ च्या ब्रिटिश-मराठे युद्धानंतर तो ब्रिटिशांच्या ताब्यात गेला.
स्वातंत्र्योत्तर काळात या किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा ५ मीटर उंचीचा भव्य अश्वारूढ पुतळा उभारण्यात आला. त्याचे अनावरण १९५७ च्या नोव्हेंबर महिन्यात त्या वेळचे पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरू यांनी केले. शिवछत्रपती प्रतिष्ठानने येथे एक प्रशस्त सभागृह उभारले आहे.
भवानी मंदिरापासून थोड्या अंतरावर अफझल बुरुजाच्या आग्नेयेस अफझल खानाची कबर आहे. गेली काही वर्षे येथे प्रवेश बंद करण्यात आला आहे. कुंभरोशी या महाबळेश्वर-महाड रस्त्यावरील गावापासून किल्ल्याच्या प्रवेशद्वारापर्यंत १९५७ मध्ये गाड्या जातील असा रस्ता करण्यात आला. तेथे एक धर्मशाळा होती.
सह्याद्रीच्या कुशीत, जावळीच्या खोऱ्यात उभा असलेला प्रतापगड हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाचे आणि कर्तृत्वाचे प्रतीक आहे. वर्ष १६५६ मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेला हा किल्ला शिवकाळातील अनेक ऐतिहासिक घटनांचा साक्षीदार राहिलेला आहे.
१० नोव्हेंबर १६५९ रोजी याच प्रतापगडाच्या पायथ्याशी छत्रपती शिवाजी महाराज यांनी आदिलशाहचा सरदार अफजल खान याचा वध केला. प्रतापगड हा केवळ किल्ला नव्हे, तर तो शिवछत्रपतींच्या पराक्रमाचा वारसा आहे, जो आजही सुमारे चारशे वर्षांनंतर ताठ मानेने उभा आहे.
प्रतापगड हा मराठ्यांच्या लढाऊ स्थापत्यशास्त्राचा उत्तम नमुना आहे. चिलखती बुरूज आणि डोंगराच्या टोकावर निमूळती माची या रचनेमुळे सैन्याला हालचाली करणे सोपे जात असे. या वैशिष्ट्यांमुळे किल्ल्याला ‘युनेस्को’च्या जागतिक वारसा स्थळाच्या यादीत स्थान मिळाले आहे. यातून छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आणि वारसा जागतिक पातळीवर नेण्यास मदत होणार आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.