विकास कांदोळकर
वास्तवाला अतिशयोक्तीच्या चष्म्यातून पाहून ‘मूर्खपणा’ उघड करणारा विडंबन साहित्यप्रकार, मानवी जीवनातील विसंगतींना आरसा दाखवतो. सत्ताधाऱ्यांना हसवत, खोलवर चिमटा काढणारे विडंबन, बंडखोर असल्यामुळे मोहक असून भयावह वास्तवाला हास्यास्पद बनवत लोकांना विचार करण्यास प्रवृत्त करते.
सूक्ष्मतेतून तीक्ष्णता साधणारे विडंबनाचे सौंदर्य त्याच्या व्यंगात आहे. सोशल मीडियातील ‘मीम्स’ आणि ‘ट्रोल्स’ हे विडंबनाचे नवे प्रकार राजकारणी आणि सेलिब्रिटींना ‘एक्स्पोज’ करतात. विडंबनाचे सौंदर्य लोकांना हसवत इच्छित परिणाम कसा साधते, हे खालील, समाजसेवेच्या राजकीय-विडंबनातून पाहणे उचित ठरेल.
आमदार, खासदार, मंत्री, वगैरे नेते आपण राजकारणात ‘समाजसेवे’साठीच आल्याचा दावा करतात. पण जनतेला फक्त त्यांचा स्वार्थ, बँक खात्यांचे फुगीर आकडे आणि भ्रष्टाचाराचे डोंगर दिसत असतात. यावर एक जालीम उपाय सुचवावासा वाटतो.
सरकारने त्यांच्यासाठी विधानसभा, लोकसभा किंवा राज्यसभेच्या शेजारीच ‘सेवाग्राम’ नावाचा भव्य प्रकल्प उभारावा! होय, गांधीजींच्या सेवाग्रामला टक्कर देणारा, पण पंचतारांकित सुविधांनी सजलेला. येथे या ‘लोक-सेवकांना’ समाजसेवा करणे अतिशय सोपे होऊन भ्रष्टाचार कायमचाच नामशेष होईल. कारण नेत्यांना पैशांची गरजच भासणार नाही.
मूलभूत फरक असला तरी, सेवाग्रामची संकल्पना सतत देऊळ, मस्जिद आणि गिरीजाघरांशेजारी राहणाऱ्या धर्मगुरूंपासून घेतलेली आहे, जे आपल्या कार्य-स्थळांकडे सतत वास्तव्य करून, आपल्या कर्तव्य तत्परतेला जागत असतात.
जनतेच्या पैशातून उभारलेल्या सेवाग्रामच्या मुख्य प्रवेशद्वारावर सोन्याने मढवलेल्या अक्षरांत लिहिले आहे, समाजसेवेचे व्रत घेतलेल्यांचे स्वागत आहे. आत शिरताच, पंचतारांकित राहणीमानाची केलेली व्यवस्था नजरेस पडते. प्रत्येक आमदाराला स्वतंत्र बंगला... नव्हे नव्हे, ‘सेवाकक्ष’ म्हणा.
आत एसी, जकूझी, मसाज चेअर आणि भव्य स्मार्ट टीव्ही! यावर फक्त दूरदर्शनचे ‘समाजसेवा विशेष’ कार्यक्रम दाखवले जातील. मंत्री महोदयांना तर स्विमिंग पूल आणि हेलिपॅडसह ‘महासेवाकक्ष’! खासदारांसाठी ‘विशेष सेवाकक्ष’!! ज्यात दररोज सकाळी प्रशिक्षित युवक-युवतींचे ‘योगा’ क्लास, फोटो-व्हिडीओसेशनसाठी खास व्यवस्था. नोकरशहांना ‘फाईल-फ्री सेवाकक्ष’!!! ज्यामध्ये ऑफिस-फाईल्स फक्त सजावटीसाठी असतील, कारण निर्णय ‘व्हॉट्सप ग्रुप’वरून येण्याची व्यवस्था असेल.
या सेवाग्रामात लोकप्रतिनिधींनी लोकांशी कसे बोलायचे हे शिकण्यासाठी ‘लोकसंपर्क प्रशिक्षण कक्ष’ असेल, जिथे ‘उत्तर कसे न द्यावे?’, भावनांनी लोकांची मने जिंकायचे भाषण’ आणि वचन निभावू न देण्याची कला’ प्रशिक्षक शिकवतील.
तसेच लोकांना संमोहित करण्यासाठी हसून बोलण्याची, डोळ्यात डोळे घालून बोलण्याची, शब्द-आवाज-देहबोलीची तंत्रे शिकवली जातील. नेत्यांना निरनिराळ्या योजनांवर विचारविनिमय करण्यासाठी ‘योजना संमेलन कक्ष’ असेल ज्यात फक्त पॉवरपॉईंट प्रेझेंटेशन, ‘भाषण जनरेटर एआय’, टाळ्या वाजवणारे यंत्र आणि शेवटी ‘सेल्फी पॉइंट’ असेल.
मतदारसंघात जायचे झाल्यास सर्व मंत्री, आमदार, खासदार एकाच वातानुकूलित बसने जातील. होय, वेगवेगळ्या महागड्या गाड्यांचा खर्च, इंधन खर्च, ट्राफिक जाम, खाण्या-पिण्याची बिले, यांसारख्या समस्या टाळण्यासाठी, सर्व नेते एकत्र, एकाच बसमध्ये! ड्रायव्हरला सर्वांना समान वेळ देण्याची सूचना. बस आतून बारसारखी सजलेली! नाहीहो, ‘तो’ बार नव्हे, ‘सेवाभाव बार’ म्हणावा, ज्यात फक्त ग्रीन टी आणि नीतिवचने मिळतील.
सर्व नेते ‘व्रतधारी’ बनल्यामुळे ‘कुटुंब भेट’ योजनेद्वारा नेत्यांना कुटुंबाला महिन्यातून एकदा भेटण्याची मुभा असेल व त्यासाठी वेळेची निश्चिती केली जाईल. यामुळे लोकांना सतत राजकीय भेटींचा त्रास होणार नाही. कोणत्याही कार्यक्रमाला, लग्नाला, उद्घाटनाला नेते उपस्थित राहणार नसल्यामुळे, लोकांना ‘खरा’ आनंद मिळेल.
सेवाग्रामस्थित व्यक्तीचे जवळचे कोणी वारले असल्यास तिथे फक्त सरकारी विमानाने जाऊन, परत येताना ‘शोकसंदेश’ रेकॉर्ड करून पाठवण्याची व्यवस्था असेल. आरोग्यक्षेत्रालाही मोठा फायदा आहे. सेवाग्राममध्येच ‘सुपरस्पेशलिटी’ हॉस्पिटल असल्याने नेत्यांचे सर्व विशेष उपचार तेथेच होत असल्यामुळे, जनतेच्या हॉस्पिटलांमध्ये खाटा मोकळ्या राहतील, ही काय कमी समाजसेवा आहे?
शिक्षण आणि रोजगाराच्या क्षेत्रांतही बदल दिसतील. सेवाग्रामची देखभाल करण्यासाठी हजारो कर्मचारी-स्वयंपाकी-वाहनचालक-सुरक्षारक्षक लागतील. देशातील बेरोजगारी कमी होईल. नेत्यांची सेवा ‘सरकारी नोकरी’ ठरवली जाईल. चहा आणणारे, सेल्फी घेणारे, चमचेगिरी करणारे, नेत्यांचे आप्तेष्ट आणि कार्यकर्त्यांचा, यासाठी ‘खास’ विचार केला जाईल.
सेवाग्राममुळे समस्या संपतील, कोर्टात प्रकरणे नाहीत, पोलिसांना, वकिलांना सुट्टी, पत्रकार बेरोजगार, सगळीकडे आनंदी आनंद! जनता म्हणेल, ‘आमचे नेते सेवाग्राममध्ये सुखी, आम्ही रस्त्यावर सुखी.’ आणि भ्रष्टाचार? तो तर इतिहासजमा!
कारण सेवाग्राममध्ये पैशाची गरजच भासणार नाही. सेवाग्रामच्या निर्मितीतून महत्त्वाचा फायदा म्हणजे पारदर्शकता! सर्वच आमदारांचे आणि मंत्र्यांचे बँक खाते सरकार सांभाळत असल्यामुळे, जनतेला त्यावर देखरेख करता येईल. सर्व खर्च लोकांच्या पैशातून... लोकांच्या प्रतिनिधींसाठी... लोकांच्या देखरेखेखाली... ‘गरीब-हटाव’ योजनेनंतर याहून मोठी ‘लोकशाही’ संकल्पना आहे?
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.