Zadani Village Goa Canva
गोंयकाराचें मत

Zadani: सफर गोव्याची! मलेरियाच्या तांडवानंतर दफनभूमी झालेले, जनगणनेच्या अहवालात निर्मनुष्य असणारे 'झाडांनी' गाव

Zadani Village Goa: मलेरियाच्या साथीत ‘झाडांनी’ इथे मृत्यूचे तांडव आल्याने गाव निर्मनुष्य झाला आणि जेव्हा जेव्हा जनगणनेचा अहवाल प्रकाशित करण्यात आला, त्यावेळी त्याचा उल्लेख ‘निर्मनुष्य गाव’ असाच केला जातो.

राजेंद्र केरकर

Zadani Village Goa

जनगणनेच्या अहवालानुसार सत्तरीतल्या ‘झाडांनी’ या गावाची नोंद निर्मनुष्य अशी करण्यात आलेली आहे. सत्तरी हा गोव्यातला जुन्या काळापासून सर्वाधिक महसुली खेडी असलेला तालुका आहे. ‘झाडांनी’ हा एका टोकाला बारमाही वाहणाऱ्या म्हादई नदीच्या उजव्या तीरावरती वसलेला गाव आहे.

प्राचीन काळी गोव्याची राजधानी असलेल्या हळशीला जाण्यासाठी जे मार्ग अस्तित्वात होते, त्यात साखळीहून सोनाळ- करंझोळ येथील ‘म्होवाचा गुणो’ आणि तेथून कृष्णापूर केळील- तळेवाडी (गवाळी) खानापूरमार्गे हळशीला जाता यायचे. औरंगजेब पुत्र आणि राजपुत्र मुझ्झम जेव्हा छत्रपती संभाजी महाराज आणि त्यांच्यासमवेत असलेल्या अकबर (द्वितीय) यांना जेरबंद करण्यासाठी रामघाटातून डिचोली शहरात उतरला, तेव्हा संभाजी महाराजांनी सुरक्षिततेच्या दृष्टीने अकबराला भीमगडावरती आणले.

आज इतिहासजमा होण्याच्या वाटेवरती असलेला भीमगड मुगल साम्राज्याचा परगणा होता. त्यावेळी भीमगडावरती जाताना उन्हाळ्यात उस्ते गावातून मार्गक्रमण करताना ‘झाडांनी’ गाव लागायचा. ‘म्होवाचा गुणो’ येथून बोंदीर आल्यावरसुद्धा नदीकिनारी विश्रांती घेण्यासाठी ‘झाडांनी’ येणे शक्य व्हायचे.

‘झाडांनी’ पेंड्राल आणि कडवळ ही गावे नदीकिनारी वसली होती आणि तेथे लोकवस्ती होती. सत्तरी तालुका १७४६साली मार्किस द अलोर्णा याने पोर्तुगीज सत्तेखाली आणला. येथील कष्टकरी आणि राणे सरदेसाई यांंनी सुमारे २७ वेळा बंड करून सत्ताधीशांना नामोहरम केले.

त्यामुळे १८९७ आणि त्यानंतर १९१३साली हा तालुका सैन्यांच्या ताब्यात असताना ४९० चौरस किलोमीटर क्षेत्रफळाचे जे सहा प्रशासकीय विभाग केले त्यात ‘झाडांनी’ हा गाव कोदाळ विभागात तर उर्वरित कडवळ आणि पेंड्राल या गावांचा समावेश करंझोळ विभागात करण्यात आला होता.

आज कडवळ गावात दोन घरे असून, पेंड्राल आणि ‘झाडांनी’ ही गावे निर्मनुष्य असल्याची नोंद आढळते. पूर्वी उस्तेहून कळसा नदी ओलांडून लोक जेव्हा केळघाटमार्गे खानापूर जवळच्या हळशी राजधानी शहरात जायचे, तेव्हा वाटेत ‘झाडांनी’ गाव लागायचा. नदीतल्या पाण्यात हातपाय धुऊन आणि पाणी पिऊन ताजेतवाने होऊन लोक मार्गस्थ होण्याअगोदर नदीकिनारी वृक्षांच्या सावलीत असलेल्या नंदीच्या पाषाणी मूर्तीकडे जायचे.

कन्नड भाषेत नंदी ‘बसवा’ म्हणून प्रसिद्ध असून, वाटेतला प्रवास निर्विघ्न व्हावा म्हणून वाटसरू नंदीच्या मूर्तीवरती हात फिरवायचे आणि ‘बसव्या घाटार वचाया’ असे म्हणायचे. त्यावेळी दगडाची ही निर्जीव मूर्ती म्हणे हालचाल करायची!

कडवळ, ‘झाडांनी’ आणि पेद्रोल या तिन्ही गावात वेगवेगळ्या ठिकाणी महिषासुरमर्दिनी, सातेरी, गजलक्ष्मीरूपी केळबाय त्याचप्रमाणे ब्राह्मणी बेताळ, पुरुष यांच्या ३६च्या आसपास दगडी मूर्ती असून, शंभर वर्षापूर्वी या जंगलात लोकवस्तीने युक्त हसतीखेळती गावे होती. आज ही गावे, त्यांची मंंदिरे आणि त्यांच्याशी संंबंधित लोकसंस्कृती इतिहासजमा झाल्याने, ‘झाडांनी’ येथील लोकवस्ती आकस्मिकरीत्या पूर्णपणे गायब कशी झाली हे कोडे निर्माण झाले होते.

‘झाडांनी’ येथे म्हादई नदी किनारी पुरातत्त्व अभ्यासकांना नदीपात्रातल्या दगडांचा वापर करून उभारलेल्या थडग्यांचा शोध लागला आहे. आज या थडग्यांवरती वृक्षवेली वाढलेल्या असल्याने, त्यांचे अस्तित्व दृष्टीस पडत नाही.

परंतु बारकाईने निरीक्षण केले असता ही वैशिष्ट्यपूर्ण दगडी थडगी आणि दफनभूमी दृष्टीस पडते. ही लोकवस्ती महापूर किंवा रोगांच्या साथीत नष्ट झाली, असे मानले जात होते. भारताच्या अन्य प्रांतांप्रमाणे गोव्यातही त्याकाळी मलेरिया, कॉलरा यासारख्या साथींबरोबर दुष्काळाने गावच्या गावे ओस पडायची.

सत्तरीतील पायदळाचा मेजर आंतोनिया मॅगाल्हास याच्या १९२०मध्ये प्रकाशित पुस्तकात वरिष्ठ डॉक्टर लुईज ब्रास डिसा, जे येथे आरोग्याधिकारी म्हणून कार्यरत होते, त्यांच्या निष्कर्षानुसार सत्तरीत घनदाट जंगले, दलदलीचा प्रदेश यामुळे मोठ्या प्रमाणात मलेरियाचा प्रसार करणाऱ्या मच्छरांची पैदास व्हायची. पर्जन्यवृष्टीचे प्रमाण जादा असल्याने आणि आरोग्याला पोषक हवामानाच्या अभावी मलेरियाच्या साथीत मृत्युमुखी पडण्याचे प्रमाण लक्षणीय होते अशी नोंद आढळते. शंभर वर्षांपूर्वी आलेल्या अशाच मलेरियाच्या साथीत बहुधा ‘झाडांनी’ गावातल्या कुटुंबांचे उच्चाटन झाले असावे आणि ही बाब नजरेला पडल्यानंतर शेजारच्या गावातल्या लोकांनी मृतांचे सामूहिकरीत्या दफन केले असावे.

‘झाडांनी’ या गावात आलेल्या साथीच्या रोगांनी तेथील लोकांचा बळी घेतला याची नोंद पोर्तुगीज कालखंडातल्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी वेळोवेळी ठेवलेल्या नोंदीतून आज उपलब्ध होते. परंतु मलेरियाच्या साथीत समस्त लोकवस्तींचा नायनाट झाला की त्यातून सावरलेली मंडळी गाव सोडून कुठे परागंदा झाली याविषयीची खात्रीपूर्वक माहिती उपलब्ध नाही.

त्यामुळे आज ‘झाडांनी’ येथे जे दगडांची विशिष्टरीत्या मांडणी करून ठिकठिकाणी ठेवलेली रचना जेथे आहे, तेथे पुरातत्त्वतीय दृष्टिकोनातून उत्खनन हाती घेतले तर काळाच्या उदरात लुप्त झालेल्या त्यांच्या संस्कृतीच्या, समाजजीवनाच्या खाणाखुणा ज्ञात होण्याची अधिक शक्यता आहे.

म्हादई नदीच्या ज्या उपनद्या सत्तरीत वाहत असतात, त्यांपैकी एका बाजूने सुका पानशिरा आणि दुसऱ्या बाजूने मुख्य म्हादई नदीचे पात्र वाहत असून, त्याच्या उजव्या काठावरती वृक्षवेलीत, गर्दीत त्याकाळी करण्यात आलेल्या सामूहिक दफन विधीद्वारे तेथे निर्माण झालेल्या दफनभूमीची प्रचिती आणून देणारे उंचवटे पाहायला मिळतात. उस्ते गावातून ‘झाडांनी’ येथे पूर्वी जेथे बसवास्वरूप नंदी ठेवण्यात आला होता त्या जागेवरती जाताना ही दफनभूमीसदृश जागा पाहायला मिळत होती.

मलेरियाच्या साथीत ‘झाडांनी’ इथे मृत्यूचे तांडव आल्याने बहुधा गाव कालांतराने निर्मनुष्य झाला आणि त्यानंतर जेव्हा जेव्हा जनगणनेचा अहवाल प्रकाशित करण्यात आला, त्यावेळी त्याचा उल्लेख प्रामुख्याने ‘निर्मनुष्य गाव’ असाच केला जातो.

अँग्लो -पोर्तुगीज तहानंतर इथल्या पोर्तुगीज सरकारकडून ब्रिटिशांनी सत्तरीतल्या सह्याद्रीत येणाऱ्या गावात कॉफी, चहाचे मळे उभारता यावे यासाठी करारावरती जागा घेतल्या होत्या. त्या कालखंडात ‘झाडांनी’, पेंड्राल आणि कडवळ या गावांतल्या पुरातत्त्वीय वारशाच्या खाणाखुणा विस्मृतीत गेल्या असतील.

काही दिवसांपूर्वी ‘झाडांनी’ येथे एकत्रित आणून ठेवलेल्या सांतेर, केळबाय, ब्राह्मणी आणि अन्य पाषाणी मूर्ती गायब झाल्याने, तो प्रकाशात आला होता. ‘झाडांनी’ येथील ज्या स्थळावरती गेल्या दशकभरापासून जो महाशिवरात्रीचा उत्सव साजरा व्हायचा, तेथून काही अंतरावरती शेवटी विद्रूप केलेल्या मूर्ती पोलिसांना सापडल्या. गेल्या दोन अडीचशे वर्षांपासून निर्मनुष्य असलेल्या गावात नव्याने महाशिवरात्रीचा उत्सव सुरू करण्यात आलेला असला तरी इथले मूळ रहिवासी कोण होते? मलेरियाच्या साथीतून जे वाचले, ते कुठे गायब झाले? हे प्रश्न आजतागायत अनुत्तरित आहेत. त्यामागचे रहस्य कळले तर विस्मृतीत गेलेल्या इतिहासाचे आकलन होईल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Water Taxi: गोव्यात लवकरच धावणार पाण्यावरची टॅक्सी! कोचीचे पथक करणार पाहणी; प्रवाशांना मिळणार नवा पर्याय

Goa News Live: ओपा पाणी प्रक्रिया प्लांटमध्ये विद्युत बिघाड, तिसवाडी, फोंड्यात मर्यादीत पाणी पुरवठा

Goa Politics: खरी कुजबुज; पैशांसाठी भारतीय स्त्रिया बनल्या विधवा?

Goa Rain: गोव्यात अतिवृष्टीने दाणादाण! शाळांना सुट्टी, अनेक ठिकाणी पडझड; पुन्हा ऑरेंज अलर्ट जारी

Women Workers Goa: महिला कामगारांबाबत महत्वाचा निर्णय! वेळ निश्चिती, सुरक्षितेबाबत अधिसूचना जारी

SCROLL FOR NEXT