मिलिंद म्हाडगुत
‘कला क्षेत्रातील दायित्वाचे कौतुक’ हा सुरश्री केसरबाई केरकर संगीत महोत्सव यावर शनिवार २८ फेब्रुवारीच्या ‘गोमन्तक’मध्ये प्रसिद्ध झालेला लेख व त्यावर प्रतिक्रिया व्यक्त करणारा गोरख मांद्रेकर यांचा मंगळवार दि. ०३ मार्च रोजीचा लेख हे दोन्हीही लेख वाचनात आले.
कला अकादमीचा सुरश्री केसरबाई केरकर संगीत महोत्सव परत सुरू होत आहे ही राज्यातील संगीतप्रेमींकरता आनंदाची बाब आहे यात शंकाच नाही. केसरबाई केरकर यांच्या गायन क्षेत्रातील कर्तृत्वाचा दाखला देणे म्हणजे एखाद्या रूपवतीला आरसा दाखविण्यासारखेच. गोव्याचे नाव जागतिक पातळीवर नेण्यात ज्या कलाकारांनी सिंहाचा वाटा उचलला त्यात केसरबाईंचे नाव अग्रस्थानी घ्यावे लागेल यात शंकाच नाही.
फोंडा तालुक्यातील केरीसारख्या गोव्यातील एका छोट्या खेड्यात जन्माला येऊनसुद्धा आपल्या कर्तृत्वाच्या पताका जगभर झळकविणाऱ्या केसरबाई खरोखर महानच.
केसरबाई जन्मल्या त्या १८९२साली. त्यावेळी गोवा पोर्तुगिजांच्या जोखडाखाली होता. वातावरण अतिशय प्रतिकूल होते. अशा परिस्थितीत संगीताची साधना करणे म्हणजे खायचे काम नव्हते. त्यात परत केरी गाव त्यावेळी अत्यंत अविकसित भाग म्हणून गणला जात असे.
म्हणजे तसा त्यावेळी गोव्यात विकास नव्हताच म्हणा. अशा सगळ्या विपरीत परिस्थितीशी तोंड देऊन मुंबईसारख्या देशाच्या एका प्रमुख शहरात संगीत क्षेत्रात आपले अस्तित्व निर्माण करणे यातच केसरबाईंचे कर्तृत्व अधोरेखित होते.
पैशांच्या चणचणीमुळे गेली काही वर्षे केसरबाईंच्या नावे सुरू असलेल्या संगीत महोत्सवाचे आयोजन न झाल्यामुळे कांदोळकरांनी व्यक्त केलेली व्यथा त्यामुळे तेवढीच रास्त!
आमदारांना कदंबाच्या एसी बसेसचे पासेस द्यावेत व त्यातून बचत झालेल्या पैशातून हे संमेलन आयोजित करावे ही कांदोळकरांची सूचना त्यांची या संमेलनाबाबतची तळमळ व्यक्त करते हेही तेवढेच खरे. पण तसे पाहायला गेल्यास आज सरकार कितीतरी ठिकाणी अनाठायी खर्च करताना दिसते.
हा खर्च कमी केल्यास अशी कितीतरी संमेलने आयोजित करता येतात. पण सरकारला याचे सोयरसुतक आहे असे दिसतच नाही. म्हणूनच तर असे महोत्सव खंडित केले जातात. केसरबाईंनी संगीत साधना करण्याकरता किती कष्ट घेतले याचे किस्से आम्ही आमच्या लहानपणी केसरबाईंच्या नातेवाइकांकडून ऐकले आहेत.
त्यामुळे अशा कलाकारांची सरकारकडून वंचना होणे हे राग येण्यासारखेच यात दुमत असण्याचे कारण नाही. पण याचा अर्थ कोणत्याही संमेलनाला कमी लेखावे असा मात्र होत नाही.
ग्रामीण भागात होणाऱ्या संमेलनांतूनसुद्धा महान कलाकार निपजू शकतात हे विसरता कामा नये. शेवटी लहान व महान याच्यात फरक असतो तो जिद्दी वृत्तीचा आणि त्या कलेप्रति असलेल्या तळमळीचा. केसरबाईंनी त्या काळात या त्यांच्या कलेला लागून किती टीका सहन केली होती, किती टोमणे खाल्ले होते हे मी माझ्या लहानपणी ऐकले आहे.
म्हणूनच मला या महान कलाकाराबाबत माझ्या लहानपणीच आदर निर्माण झाला होता. आता परिस्थिती बदलली आहे. कलेला पूरक असे वातावरण आहे. त्यामुळे भविष्यात आपल्या राज्यातून आणखीही केसरबाई केरकर निर्माण होऊ शकतात. त्याकरता गोव्याबाहेर जाण्याची आवश्यकता भासू नये असे वातावरण राज्यात निर्माण व्हायला हवे.
आणि हाच दृष्टिकोन बाळगून राज्यातील खेड्यापाड्यातसुद्धा संगीत संमेलने व्हायला हवीत. अशा संमेलनांना जर सरकारने निधी दिला तर ती त्यांची चूक म्हणता येणार नाही. यातली सगळीच संमेलने दर्जेदार असतात असे मी म्हणणार नाही. पण म्हणून अशा संमेलनांना कमी लेखणे हेही गैरच!
कलाकार घडविण्याकरता अशा प्रकारचे प्रयोग आवश्यक असतातच. यातून भविष्यात एखादी कलाकार केसरबाई वा हिराबाई पेडणेकर बनू शकते. इतिहासावर जगता येत नाही पण इतिहासाचा दाखला घेऊन भविष्य घडविता येते असे जे म्हटले जाते ते उगाच नव्हे. केसरबाई हा गोव्याचा देदीप्यमान इतिहास झाला.
आता हा इतिहास समोर ठेवून नवी केसरबाई घडविण्याचे आपण बघितले पाहिजे. आजच्या युवा पिढीत तसे पाहायला गेल्यास चांगली प्रतिभा आहे. या प्रतिभेला योग्य चालना दिल्यास त्यातून विश्व व्यापतील असे स्वराविष्कार निर्माण होऊ शकतात. मांद्रेकरांनी म्हटल्याप्रमाणे या गावागावांत होणाऱ्या संमेलनांना केसरबाई केरकर संगीत महोत्सवासारखे मोठे मोठे कलाकार येत नसतात.
त्याचप्रमाणे राज्यातील सगळेच कलाकार पणजीला जाऊन या महोत्सवाचा आनंद लुटू शकत नाही हेही तेवढेच खरे. पण मुख्य म्हणजे संमेलन हे संमेलन असते त्यात वर्गीकरण आणता कामा नये. त्याकरता अशा समेलनाप्रति सकारात्मक दृष्टिकोन बाळगणे आवश्यक ठरते.
काही का असेना, कांदोळकर व मांद्रेकर यांनी संगीत कलेवर चांगले लेख लिहून आमच्या ज्ञानात भर घातली यात शंकाच नाही. मात्र कांदोळकरांनी गोव्यातील इतर मतदारसंघात होणाऱ्या संमेलनांना कमी लेखले नसते तर दुधात साखर पडली, असती हे निश्चित!
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.