मुकेश थळी
माझ्या अंगणाची गोष्टच न्यारी. इथं दुखणी बरी होतात. मी परिश्रमपूर्वक एक रोपटं लावलं होतं. अल्पकाळात त्याचं झाड झालं. डेरेदार वृक्ष. कैवल्याचं झाड बहरून आलं. डवरलं. तिथं शांततेची एक छाया मिळते. बरं वाटतं. या झाडावर पाखरं बसली तर ती आनंदी होऊन जातात.
मी सांगतो ते माझ्या आजोळचं अंगण नव्हे. ते विस्तिर्ण होतं. तुळशी वृंदावन होतं. तिथं सकाळची पूजा होत असे. त्या अंगणात आम्ही खेळत असू. क्रिकेट वगैरे. ते आमचं मैदान व्हायचं. मी नमूद करतो ते अंगण मामाघरचं बिलकुल नव्हे. इथं फोंड्यात कुठलं आलं अंगण? मी राहतो फ्लॅटमध्ये. त्याला मागीलदारच नाही मुळी. सगळं कसं बंदिस्त - बंद. कोंकणीत कैदखान्याला बंदखण म्हणतात तसं.
शेजारचे लोक संपर्क ठेवत नाही. स्टेअरकेसवर येताना जाताना चेहरा गंभीर करून जातात. असो. जीवनाचा बराच भाग मात्र हे लोक आपल्या दरवाज्याच्या की-होलमधून आमच्या व दुसऱ्यांच्या घऱी कोण आलं गेलं ते पाहतात. मी सांगतो ते अंगण डोळ्यांना दिसत नाही. आपल्या अमूर्त अंगणात सजगपणे जगताना नजर क्ष किरण होऊन भोवताल न्याहाळत असते. मग कितीतरी अधमुरे, अर्धवट, हरवलेले बिंब लख्ख दिसू लागतात. सावधगिरी बाळगणं शक्य होतं. नाही तर भवतालातील लोक बाष्कळ प्रश्न विचारून दगदग करतात. शांती ढासळवून टाकतात. त्यांना ओळखल्यावर अमूर्त अंगणाच्या सुरक्षा कवचाची ढाल पुढं करणं शक्य होतं. त्यांच्या त्रास कमी होतो.
रमेश वेळुस्करांची माझ्या आवडीची कविता आहे. त्याचा हा स्वैर अनुवाद. ते एक झाड. झाडावर बसली पाखरं. पाखरं उडून गेली. त्या पाखरांची झाडाला झाली जीव पोखरणारी दुखणी. आशयघन कविता. माझ्या अंगणाची गोष्टच न्यारी. इथं दुखणी बरी होतात. मी परिश्रमपूर्वक एक रोपटं लावलं होतं. अल्पकाळात त्याचं झाड झालं. डेरेदार वृक्ष. कैवल्याचं झाड बहरून आलं. डवरलं. तिथं शांततेची एक छाया मिळते. बरं वाटतं. या झाडावर पाखरं बसली तर ती आनंदी होऊन जातात. या झाडाच्या सावलीत बसल्यावर मनाची दुखणी दूर होतात.
हे पोर्टेबल अंगण-कवच घेऊनच मी फिरतो. नाही तर नकारात्मकतेने भरलेले जग क्षणात मन विचलीत करून टाकते. प्रश्नांचा पाऊस. नकारात्मकतेची वावझड. नकारात्मकतेचा एक थेंब स्वच्छ पाण्यात सोडावा तसे मन कलुषित, गढूळ, विषारी होते. माझं अंगण डोळ्यांना दिसत नाही. ते वेगळं असून माझ्या मनात वसलेलं आहे. हा माझा खासगी परिसर, माझा प्रायव्हसी झोन, माझ्या एकांताचा सुरक्षित कोपरा. या अंगणात कोणालाही प्रवेश नाही. इथे अनाहूत पाहुणे येत नाहीत. आजच्या काळात माहितीचा आणि आवाजाचा इतका भडीमार होत असतो की मन थकून जाते.
लोकांच्या मतांचा, टीकेचा, चहाडी चुगलीचा आणि अफवांचा गोंधळ सतत कानावर पडत असतो. अशा वेळी मी माझ्या या अदृश्य अंगणात प्रवेश करतो. झुल्यावर रेलून डोलतो. ते आंतरीक झोके मनाला दिलासा देतात. या शांत जागी मी माझ्या विचारांशी संवाद साधतो. एखादे पुस्तक, एखादी कविता, एखादा सुंदर सूर किंवा एखादी नवीन सृजनशील कल्पना यांना येथे सहज जागा मिळते. माझ्या अंगणात मी स्वतःला नव्याने भेटतो. बाहेरील धावपळ, स्पर्धा आणि ताणतणाव यांपासून दूर जाऊन मनाला विश्रांती देतो. इथे मी स्वतःचे मूल्यमापन करतो, चुका स्वीकारतो आणि नव्या स्वप्नांची बीजे पेरतो. आपण बुडू शकतो.
म्हणून आपल्या अदृश्य अंगणाभोवती सद्विचारांचे कुंपण आणि स्पष्टतेची कवच कुंडले असणे गरजेचे आहे. आजच्या डिजिटल युगात अशा अंगणाची गरज पूर्वीपेक्षा अधिक आहे. मनात असे एक सुरक्षित अंगण तयार केले पाहिजे, जिथे शांतता, विवेक आणि सकारात्मकता नांदेल. ज्या माणसाकडे असे अंगण असते, तो बाहेरील गोंगाटातही, चढ-उतारातही आपले मानसिक संतुलन टिकवून ठेवू शकतो. माझे अंगण मला जपते, घडवते आणि जगण्याला एक अर्थपूर्ण दिशा देते. मी माझ्या अंगणाच्या वर्तुळातील मध्यबिंदूला घट्ट पकडून स्वस्थ आणि मस्त जगतो. जात्याच्या खुंटीला बिलगल्यासारखा चिद्घन खुषीत. सच्ची ऐश.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.