मिलिंद म्हाडगुत
सध्या भाजप सरकारचा मगो पक्ष एक घटक आहे. खरे तर मगो हा गोव्यातला सर्वांत जुना पक्ष. भाजपपेक्षा कितीतरी ज्येष्ठ. पण आज मगोला दुय्यम भूमिका घ्यावी लागत आहे. कालाय तस्मै नमः म्हणतात ते हेच. आता २०२७सालची निवडणूक डोळ्यासमोर ठेवून भाजप मगोशी युती करू पाहत आहे आणि ती होण्याची शक्यता अधिक आहे.
२०१२साली भाजपचे तत्कालीन सर्वेसर्वा मनोहर पर्रीकर यांनी काहीसे नमते घेऊन मगोशी युती केली होती. त्यावेळी त्यांचे उद्दिष्ट काँग्रेसला हरवणे हे असल्यामुळे ही युती जरुरी होती. त्यामुळे स्थानिक भाजप कार्यकर्त्यांचा मोठा विरोध असूनसुद्धा पर्रीकरांनी फोंडा मतदारसंघ मगोला दिला होता. ती भीती आज राहिलेली नाही.
पण तरीसुद्धा राजकारणात काहीही होऊ शकते याची जाणीव भाजपला आहे. याचा प्रत्यय त्यांना नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत आला आहे. सगळे हातखंडे वापरूनसुद्धा ते दक्षिण गोवा जिंकू शकले नाही याची खंत नाही म्हटली तरी भाजप नेत्यांच्या मनात वसते आहे. त्यामुळे त्यांनी आगामी विधानसभा निवडणुकीकरता सावधपणे पावले उचलायला सुरुवात केली आहे.
मगोशी या निवडणुकीत युती करण्याचा प्रयत्न हा याच रणनीतीचा भाग आहे. आम आदमी पक्ष, काँग्रेस, गोवा फॉरवर्ड व तृणमूल हे पक्ष एकत्र आल्यास भाजपच्या काही जागा ’डेंजर झोन’ मध्ये जाऊ शकतात याची जाणीव त्यांना झालेली आहे. आणि त्यामुळेच मगोला आपल्या पंखाखाली घेऊन विरोधी पक्षांच्या संभाव्य युतीला तोंड देण्याची तयारी भाजपने सुरू केली आहे.
तसे पाहायला गेल्यास मगोची ताकद आज पूर्वीसारखी राहिलेली नाही. पण त्याचबरोबर ही ताकद पूर्णपणे लयालाही गेलेली नाही हेही तेवढेच खरे आहे. फोंडा, पेडणे, डिचोलीसारख्या तालुक्यांत आजही मगोची बऱ्यापैकी ताकद आहे. ही ताकद भाजपला मिळाल्यास त्याचा पक्षाला नक्कीच फायदा होऊ शकतो. मात्र मगोला या युतीचा किती फायदा होईल हे सांगणे कठीण आहे. मुख्य म्हणजे ही युती झाल्यास मगोचे सर्वेसर्वा सुदिन ढवळीकर हे मुख्यमंत्री होऊ शकणार नाहीत.
सुदिन हे गेली पंचवीस वर्षे मडकई मतदारसंघातून निवडून येत आहे, आणि तेही वाढत्या मताधिक्याने. त्यामुळे सुदिन यांनी मुख्यमंत्री व्हावे, असे अनेकांना वाटते आहे. त्यामुळेच काही दिवसांपूर्वी दैनिक ‘गोमन्तका’तून प्रसिद्ध झालेल्या ‘सुदिन मुख्यमंत्री होऊ शकेल का?’ या लेखाला सुदिनांच्या हितचिंतकाकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला होता.
पण भाजपशी युती झाल्यास मुख्यमंत्री भाजपचा होणार हे सांगायला तत्त्ववेत्त्याची गरज नाही. दुसरे म्हणजे निवडणुकीत ही युती झाल्यास मगोची वाढ खुंटेल हेही तेवढेच खरे आहे. २०२२साली भाजपशी युती न होऊनसुद्धा मगोच्या तीन जागा अगदी कमी फरकाने गेल्या होत्या हे विसरता कामा नये. त्या आल्या असत्या तर मगो आमदारांची संख्या पाच झाली असती.
तृणमूलशी युती न करता मगो स्वतंत्रपणे लढला असता तर निकालात नक्कीच फरक पडला असता, असे अनेक राजकीय विश्लेषक आजही ठामपणे सांगताना दिसतात. त्याचबरोबर आज मगो सरकारात असल्यामुळे पक्षाचे काम बऱ्याच अंशी ठप्प झाल्यासारखे वाटत आहे. राज्यात अनेक समस्या असूनसुद्धा मगो पक्षाला सरकारात असल्यामुळे मूग गिळून गप्प बसावे लागत आहे.
त्यामुळे पक्षाचा आलेख आकुंचित झाल्यासारखा वाटायला लागला आहे. त्यात परत भाजप व मगो कार्यकर्त्यांत आलबेल आहे असेही नाही. मडकई, फोंडासारख्या मतदारसंघांत तर याचा नेहमीच प्रत्यय येत आहे.
फोंड्यात आज डॉ. केतन भाटीकरांसारखा एक चांगला नेता मगो पक्षाच्या दिमतीला आहे. पण भाजप-मगोची युती झाल्यास व फोंडा भाजपला गेल्यास आपल्याला अपक्ष म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उतरावे लागेल असे भाटीकरांना जे परवा सांगावे लागले ते याच मानसिकतेपोटी. अशा अनेक मगो नेत्यांची हीच मानसिकता आहे. पण शेवटी राजकारण हे तत्त्वावर वा कार्यकर्त्यांच्या मानसिकतेवर चालत नसते. त्याला वेगवेगळे कंगोरे असतात.
केंद्रात भाजप सरकार असल्यामुळे मगोसारखा स्थानिक पक्ष त्यांच्याशी पंगा घेऊ शकत नाही हे मगोला कळून चुकलेले आहे. त्यामुळेच मगो ’सेफ गेम’ खेळू शकतो. परत एकदा एखादे मंत्रिपद व दोन ते तीन जागा यावर समाधान मानू शकतो. हे पाहता आगामी निवडणुकीत ही युती झाल्यास त्याचा फायदा भाजपला नक्कीच होऊ शकतो. पण मगोच्या पदरी मात्र तडजोडीशिवाय काहीच पडणार नाही हे निश्चित!
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.