अज्ञानांपासून सज्ञानांपर्यंत आणि लहानपणापासून मोठ्यांपर्यंत शिक्षणाचे महत्त्व पटवून देण्यासाठी ज्योतिराव फुले यांनी सांगितले.
विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली,
नीतीविना गती गेली, गतीविना वित्त गेले,
वित्तविना शूद्र खचले, इतके अनर्थ अविद्येने केले,
त्यांचे हे विचार ऐकून काहींनी विद्येचे महत्व जाणून उपाशीपोटी राहू पण आमच्या मुला-बाळांना शिकवू असे ठरविले. तर काहींनी त्यांचे हे विचार ऐकून त्यांना अतिशहाणा ठरवून त्यांचे विचार वाऱ्यावर सोडून दिले. पण ज्योतिरावांची चिकाटी फार महत्त्वाची होती. आपण अस्पृश्य समाजाला तर शिक्षणाची पाणपोई उघडूच, पण जो स्पृश्य आहेत व मुलींनी शिक्षण घेणे म्हणजे पाप आहे, अशी गर्जना करीत त्यांनाही त्यांची जागा दाखवून प्रथम त्यांनी महत्त्वपूर्ण काम ते पहिल्यांदा आपली धर्मपत्नी सावित्रीबाईस शिक्षणाचे धडे देऊन तिला सक्षम केले आणि त्यांच्या अतुलनीय अशा कामगिरीमुळे ज्योतिराव महात्मा बनले तर सावित्रीबाईंची गणना क्रांतिज्योती म्हणून केली गेली.
फुले यांचे घराणे माळी समाजातील होते. त्यांच्या वस्तीत अठरापगड कष्टकरी जातींचा समावेश होता. यात जसे साळी, माळी, कोळी होते. तसेच भोई, कळाळ, मुसलमान, महार, चांभार, कुंभार, ढोर, मांग आदी दाट वस्तीने राहत असत. दिवसभर काबाडकष्ट करणारी, छोटा व्यापार करणारी आज कमवले, आज खाल्ले, उद्या कमवू, उद्या खाऊ असे हातावर पोट भरणारी अशी ही सारी लोकवस्ती होती.
१८१८साली पेशवाईची अखेर झाली व इंग्रजी राज्याची सुरुवात झाली. पण पेशवाईच्या काळात बेबंदशाही व मनमानी कारभारामुळे अत्याचार शिगेला पोचले होते. त्यांचे वर्णन करताना लोकहितवादी गोपाळराव देशमुख आणि न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे या समाजसुधारकांनी म्हटले होते, कितीतरी माता-भगिनींना बेअब्रूच्या भीतीने आत्महत्या करावी लागली होती.
करवसुलीच्या पद्धती तर भयावह होत्या. दुष्काळामुळे शेतसारा थकला की घरादारांवर गाढवांचा नांगर फिरवला जाई. दुष्काळाबाबत कोणतीही सहानुभूती न बाळगता शेतकऱ्यांना उन्हात ओढावे, उभे करून, उघड्या पाटीवर फटके मारणे, अवघड व नाजूक भागांवर चटके देणे, असे अघोरी उपाय योजले जात. अस्पृश्य मानलेल्या जातीतील माणसांना तर भर उन्हात किंवा रात्रीच्या अंधाराचा फायदा घेऊनच बाहेर पडता येई. कारण त्यांची सावली लांबवर पडता कामा नये, तर मग विटाळ होई. मग त्या विचाऱ्यांना गुराढोरांसारखे बडवण्यात येई. कारण तर धर्म बुडाला, पाप झाले, मग दोन अक्षरे शिकण्याची तर मुळीच सोय नव्हती.
हे सारे क्लिष्ट, अनिष्ट व अन्यायी ज्योतिराव फुलेंनी ‘याची देही याची डोळा’ प्रत्यक्ष पाहिले होते आणि म्हणून यासाठी समर्थपणे उभे राहण्याची त्यांनी प्रथम सावित्रीबाईना पाठविले. त्यांच्या शिक्षणविषयक कार्याची महत्त्व जाणणारे व यासाठी सर्वतोपरी मदतीचा हात देणारे जसे बहुजन समाजातील मित्र होते.
त्याप्रमाणे ख्रिश्चन, मुसलमान आणि सवर्णही होते. या सर्वांच्या सहकार्याने त्यांनी शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली आणि दीन-दलित, शोषित पीडित समाजाच्या सर्वांगीण उन्नतीसाठी तन, मन, धनाने झोकून दिले. विशेष म्हणजे शाळा सुरू करण्यासाठी पुण्यातील भिडे वाड्यातील सवर्ण व्यक्तीने प्रथम पुढाकार घेऊन आपल्या वाड्यात शाळा सुरू करण्यास जागा तर दिलीच, शिवाय आर्थिक मदतीचा हातही पुढे केला.
याचा परिणाम असा झाला की पुण्यात जिथे -जिथे शाळा सुरू होत त्या ठिकाणी बहुजन समाजातील मुलींबरोबरच दलित समाजातीलम् मुसलमान समाजातील मुलांबरोबर सवर्ण मुलीही शाळेत प्रवेश घेऊ लागल्या. प्रथम काही धर्मांधांनी याला विरोध केला. पण फुलेंनी आपल्या संयमी, विवेकी, भूमिकेने सर्व समाजातील नेते मंडळींना घेऊन हे कार्य तडीस नेले. त्यामुळे सावित्रीबाई शाळेत येता-जाता त्यांना टोमणे मारणे, अंगावर शेण फेकणे आदी प्रकार हळूहळू कमी झाले व मग पुढे हे शिक्षणाचे सहकार्य सुरळीतपणे चालू राहिले.
ज्योतिराव फुले यांनी आपल्या सर्व प्रकारच्या कार्याला व चळवळीला १८७३साली संघटित रूप दिले. त्यासाठी त्यांनी ‘सत्यशोधक समाजा’ची स्थापना केली व हे कार्यपद्धतशीरपणे पुढे नेण्यासाठी या समाजाचे ‘दीनबंधू’ नावाचे वृत्तपत्र १८७७साली सुरू केले व मग पुढे कोणत्याही प्रकारचा धार्मिक विधी सत्यशोधक पद्धतीने पुरोहिताला न बोलावता होऊ लागला. हळूहळू मग आपल्या कार्याला गती देऊन त्यांनी कामगार शेतकरी, अपंग, अनाथ इत्यादी घटकांसाठीही अहर्निशपणे काम करण्याचा सपाटा लावला व यासाठी पत्नी सावित्रीबाई बरोबरच अनेक कार्यकर्ते तयार झाले व हे काम सर्वतोमुखी होऊन त्या साऱ्यांचे फळ त्यांना ‘महात्मा’ बनविण्यास झाले.
शंभू भाऊ बांदेकर
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.