गोव्यात जेव्हा प्रत्यक्ष भासणारे तापमान ४५ अंश होते, तेव्हा आम्ही ६ अंश तापमानात कुडकुडत होतो. तेथे आम्ही एक गाणे गात रिल तयार केले. लोकांनी ते कौतुकाने पाहिले. आम्हांलाच काय, उष्ण प्रदेशात राहणाऱ्या प्रत्येकाला हिमशिखरांचे आकर्षण असतेच. माझे तर काही मित्र सध्या एप्रिल व मे महिना हिमालयाच्या एखाद्या खेड्यात जाऊन राहण्याचे स्वप्न रंगवू लागले आहेत.
हे स्वप्न एकेकाळी केवळ श्रीमंतांच्याच आवाक्यात होते. परंतु भटकंती हा आयुष्य समृद्ध बनविणारा अनुभव आहे. त्यामुळे काबाडकष्ट करून पुढच्या पिढ्यांसाठी सोने खरेदी करणारा, घर बांधणारा माणूस स्वतः चांगले जीवन जगणे हेच आपल्या जीवनाचे उद्दिष्ट मानू लागला आहे. एकूणच भटकंती, ताजेतवाने होणे, स्वच्छ-थंड हवेचे ठिकाण शोधणे हे आपल्या आयुष्याची इतिकर्तव्यता ते मानू लागले.
ज्येष्ठ नागरिकांचे जथ्थेच सध्या सतत फिरतीवर असतात. ते आपले छोटे-छोटे चमू बनवितात, भटकंती करतात. मित्र जमवून जेवणाचा बेत आखतात, गातात-नाचतात. भटकंती हा आता ज्येष्ठांचा छंद बनू लागलाय.
भटकंती, प्रवास करणे हा ज्येष्ठांसाठी जीवनाचा एक नवीन अनुभव आहे. त्यात आरोग्य सुदृढ होण्यास मदत होते. समाजात मिसळण्याची संधी मिळते. तसेच नवनव्या जागांचा अभ्यास होतो...महत्त्वाचे म्हणजे एखाद्या नियोजित ऑर्गनाइज्ड टूरपेक्षा आपणहून एखादे नवे स्थळ शोधून तेथे भटकंती केली, तर अनोखा अनुभव मिळू शकतो. नियोजित टूरवाले त्यांच्या दृष्टीने तुम्हांला जागा दाखवणार. त्यात सकाळी सहा वाजल्यापासून जी धावाधाव होते, त्यात ज्येष्ठ माणूस कावून जातो.
अनेकजण म्हणतात, तुम्ही सतत फिरतात ते तुम्हांला कसे जमते? आमच्या चमूतील सारे सदस्य लेखक नाहीत. पण ते आता लिहू लागलेत. बोलणे त्यांना आवडते. त्यांना प्रवास करण्याचा तर खूप आनंद. निवृत्त होऊन मी भटकंती करणार आहे, हे ठरावीक पठडीतील वाक्य आपण नेहमी ऐकतो.
परंतु कोविडनंतर ही संकल्पनाच बदलली. माणसे पटकन मरून गेली. शिवाय निवृत्त होईपर्यंत शरीराची झीज झालेली असते. नवे व्याप निर्माण होतात. त्यामुळे संधी मिळताच मित्र गोळा करावेत. सध्या तर सोलो प्रवासाची टूम निघाली आहे. एकट्याने प्रवास करण्याचा आनंद वेगळाच. पण मी घोळक्यात रमणारा माणूस आहे, त्यामुळे मित्रांना बरोबर घेऊन फिरले की हसता-खिदळता येते. स्वच्छंद जगता येते, तेथे उगाच सभ्यतेचा बुरखा पांघरावा लागत नाही.
आम्ही आमचा चमू बनविला, तेव्हा सुरुवातीला आम्ही अनेक छोटे-छोटे प्रवास केले. रेल्वेने आणि विमानाने. आता विमान प्रवासाप्रमाणेच हॉटेलांचे आरक्षण करणे सोपे झाले.
पण ‘हिमालय’ हाच आमचा आकर्षणाचा विषय राहिला. मला वाटते की, सहा-सात वेळा हिमालयाच्या कुशीत कुठे तरी गेलो आहे. पण आता गर्दीची ठिकाणे नकोशी वाटतात. जेथे निवांतपणा मिळेल, शहरापासून दूर एखादे गेस्ट हाउस, हॉटेल किंवा होम स्टे. त्यांचेच जेवण, तेथील सांस्कृतिक जीवन, स्थानिक लोकसंस्कृतीची ओळख, त्यातही महत्त्वाचे म्हणजे आमच्यासाठी मोकळा वेळ. यावेळी तो आम्हांला मिळाला, हिमाचल प्रदेशचे शेवटचे गाव, तोष! तो आमचा अविस्मरणीय प्रवास ठरला.
वास्तविक गेले तीन महिने आम्ही नियोजन करीत होतो. उझबेकिस्तान. गेल्या वर्षी आम्ही रशियाचा टूर केला होता. मॉस्को आणि सँटपीटर्सबर्ग. लोकांनी आम्हांला युक्रेन युद्धामुळे तेथे न जाण्याचा सल्ला दिला होता.
परंतु माझा मित्र- जो रशियाच्या चार्टर विमानांची व्यवस्था करतो, त्याचा सल्ला आम्ही घेतला. त्यामुळे फायदा असा झाला की, पर्यटकांची गर्दी नसलेले मॉस्को व पीटर्सबर्ग आम्हांला आमच्या लयीत, निवांत पाहता आले. त्यामधूनच स्फूर्ती घेऊन उझबेकिस्तानचा प्रवास करावा, हे निश्चित केले होते.
दोन महिने आधी आम्ही सर्व आरक्षण केले. दुर्दैवाने पहलगाम प्रकरण घडले. भारत व पाक एकमेकांना इशारे, दावे-प्रतिदावे करू लागले. परिणामी पाकने आपली हवाई हद्द बंद केली. रशिया किंवा त्या भागात जाणाऱ्या प्रवासी विमानांना पाकिस्तानवरून जाणे स्वस्त पडते, त्यामुळे विमाने रद्द झाली. त्यावरील आरक्षणाचे पैसे परत मिळविणे हे जिकरीचे काम बनले. त्यात बरेच दिवस वाया गेले. परंतु त्यापेक्षा टूर रद्द झाल्यामुळे आमच्या उत्साहावर विरजण पडले. आम्ही हिरमुसलो. ते दुःख जास्त होते.
आता आमच्यापुढे पर्याय होता, देशांतर्गत प्रवास करायचा. कारण दुसऱ्या देशात कमी अवधीत व्हिसा मळविणे अवघड होते. आधी आरक्षण करून त्यानंतर व्हिसासाठी अर्ज करणे व तो ठरावीक दिवसांत न आल्यास खर्च वाया जाण्याची शक्यता असते. त्यामुळे एकतर उटी किंवा हिमालयातील एखादा गाव, असे पर्याय आमच्यापुढे उभे राहिले.
तो प्रश्न सहज सुटला. कारण पहलगाममुळे उत्तर भारत, विशेषतः काश्मीर व इतर भाग धोक्याचे ठरले. अनेकजण दक्षिणेकडे प्रवास करणार होते, उटीला गर्दी होण्याची शक्यता होती. त्यामुळे आम्ही हिमालयातच पुन्हा प्रवास करण्याची संधी घेतली. मनस्वीनीने तोष गाव शोधून काढले.
तत्पूर्वी या गावाच्या पायथ्याशी असलेले कसौल गावही बघायचे होते. किंबहुना सुरुवातीला आम्हांला सुचले ते कसौलच. कसौली व कसौल ही दोन वेगवेगळी गावे आहेत. कसौली हे गाव इस्राइलींनी आपले दुसरे घर बनविले आहे. एकेकाळी गोव्यात डेरा टाकून असलेल्या इस्राइलींनी आता कसौल शोधून काढले आहे.
तेथे त्यांना कोणी हटकत नाही. तेथे ते महिनोन्महिने राहतात. तेथे त्यांच्या अनेक पिढ्या ये-जा करीत राहिल्या. त्यांना तो स्वतःचा गाव वाटू लागला आहे. तेथे फूची वनस्पती झुडपांसारखी उगवते, शिवाय हिमालयात अनेक ठिकाणी अफू-गांजा त्या संस्कृतीचा भाग बनला आहे. अजून तरी अमलीपदार्थविषयक नियम काटेकोर नाहीत. परिणामी इस्राइलींना हा गाव नंदनवन वाटला तर नवल नाही.
परंतु कसौलला जाणार कसे?
कारण मे महिन्यात पहलगामचा परिणाम केवळ काश्मीरवर झाला नाही, तर चंदीगडवरही झाला. विमानतळ महिनाभर बंद होते, एवढेच नव्हे तर विमानतळ हवाई दलाच्या ताब्यात राहिले. भारत-पाकिस्तान यांच्यातील तणाव वाढू लागल्यावर खबरदारीचे उपाय म्हणून चंदीगडसह देशभरातील ३२ विमानतळे बंद ठेवावी लागली. ‘ऑपरेशन सिंदूर’ राबविताना चंदीगडवर ड्रोन हल्ले होण्याची भीती होती. आता हे विमानतळ कधी सुरू होणार याची शाश्वती राहिली नाही. मध्येच ते सुरू होणार असल्याची घोषणा झाली, पण प्रत्यक्षात बंदी वाढत गेली.
आमचा उत्साह मात्र दांडगा होता. गोवा-चंदीगड विमानसेवा बंद झाली. ती चालू राहिली असती तर चंदीगडहून सहा तासांत आम्ही कसौलला पोहोचू शकलो असतो. पण मित्र म्हणाले, दिल्ली विमानतळावरून गाडी करून जाता येईल.
अंदाज घेतला, तेव्हा समजले हा प्रवास आठ-नऊ तासांचा आहे. परंतु प्रत्यक्षात हा प्रवास ठरला तेरा तासांचा. वाटेत आम्हाला सात बोगदे लागले. जे हल्लीच्या वर्षांत तयार झाले आहेत.
गेल्या दहा वर्षांत हिमाचल प्रदेशने रस्ता वाहतूक अधिक सुलभ केली. तेथे आता दहाच्यावर बोगदे आहेत. किरतपूर, मनाली-लेह महामार्गावर अनेक नवे बोगदे बनविले जात आहेत. त्यामुळे हिमाचल, चंदीगड व पंजाबचा हा प्रवास कैकपटीने कमी अंतराचा झाला. शिवाय धोकादायक घाट व वळणे नष्ट झाली. त्यातला ‘अटल बोगदा’ हा जगातील सर्वांत मोठा मानला जातो, जो समुद्रसपाटीपासून तीन हजार मीटरवर आहे.
कालका-सिमला रेल्वेने जायचे असल्यास या ९६ किलोमीटर मार्गावर १०३ बोगदे आहेत. पण बोगद्यात बसून हिमालय काय पाहणार? मोटारीतील प्रवास कष्टप्रद पण सुखकर बनला वाटेत उंचच उंच पर्वतरांगा दिसू लागल्यावर!
हिरवे डोंगर, आल्हाददायक थंड हवा व जवळून वाहणारी नदी, हे एक विलोभनीय दृश्य आहे. आम्हांला वाटेत बियास, सतलज, चिनाब नद्यांचे प्रवाह दिसले. सुरुवातीला बियासची उपनदी पार्वती तुमची संगत करीत तुम्हांला हिमालयाच्या पायथ्याशी आणून सोडते. सतलज तर तिबेटमध्ये उगम पावून राज्यात विसावलीय. कुलू जिल्ह्यातील कसौलमध्ये पार्वती नदीवर धरण आहे. ही नदी वाटेत सतत आमची सांगाती बनली होती. मुळात कसौल गाव पार्वती नदीच्या पायथ्याशीच वसले आहे.
या नदीचे वैशिष्ट्य म्हणजे संपूर्ण पार्वती खोऱ्याचे रक्षण करणारी माता म्हणून तिची ख्याती आहे. वास्तविक पार्वतीला आपल्या पुराणात हिमालयाची मुलगी मानली आहे. ‘कुमारसंभव’ हे संस्कृतातल्या आद्य काव्यांपैकी एक.
त्यात हिमालयाची कन्या पार्वती व शंकराची कथा सांगितली आहे. हे विश्व तयार करणारे आणि त्याचा नाश करणारे भगवान शंकर कैलास पर्वतावर ध्यानमग्न होऊन बसलेले असतात. हे एक समकालीन स्पंदनं असलेलं कालातीत कथन वाटते...या पार्वती नदीचा उगम होतो मानतलाई हिमपर्वतावर व ती वळसा घालून गुरु नानकांनी भेट दिलेल्या-शिखांचे धर्मस्थान बनलेल्या मणिकरणला येते.
या नदीशी एक दंतकथाही जोडली आहे, ऋषी सांगतात की पार्वती आपल्या दागिन्यांशी खेळत असता तिचा मौल्यवान हिरा गहाळ होतो. शिव क्रोधीत होतो व हा राग गरम पाण्याच्या फवाऱ्यातून उद्भवतो. दुसरी कथा सांगते की पार्वती स्नान करीत असता सर्पराज तिचा मौल्यवान हिरा लंपास करतो, तेव्हा शिवाचा क्रोध अनावर होतो व त्यातून उष्ण झरे निर्माण होतात. आणखी एका कथेनुसार पार्वतीने जिथून औषधी वनस्पती गोळा केल्या, तेथे मानतलाईचे झरे निर्माण झाले. या अशा दंतकथांनी हा परिसर पुनीत झाला आहे.
कसौलमध्ये आम्ही कळंगुट-कांदोळीसारखीच दुकानांची गर्दी पाहिली. हे सर्व दुकानदार अधूनमधून गोव्यात येतात. गोव्यातही त्यांची दुकाने आहेत. त्यामुळेच त्यांचा संबंध ड्रग्जशी जोडला जात असावा. इस्राइलींनाही अफू-गांजा पुरवण्याचे काम ते करीत असावेत.
आम्ही तेथे इस्राइलींनी दणक्यात काढलेली मिरवणूकही पाहिली. गाढवावर बसून वाजत-गाजत ते आपल्या एका सुपरिचित पाहुण्यांचे स्वागत करायला चालले होते. येथेही इस्राइली बदनाम आहेत. परंतु मिरवणूक काढण्याबाबत आत्मविश्वास त्यांना आला आहे. स्थानिक व्यापाऱ्यांचा त्यांना पाठिंबा.
कारण ही बाजारपेठ याच पर्यटकांच्या आश्रयावर चालली आहे. स्थानिक कुटुंबीय मात्र इस्राइलींबद्दल नाके मुरडतात. कारण त्यांना आपली मुलेही त्यांच्या नादाला लागण्याची भीती वाटते. स्थानिक तरुण इस्राइलींबरोबर फिरताना आम्हाला दिसत होते. परंतु कसौलची वाट लागली आहे. मिळेल तेथे हॉटेले आणि गेस्ट हाउसेस. नदीवरही आक्रमण झाले आहे. हिमालयात सर्वत्रच ही अनागोंदी झाली. त्यामुळे पर्यटनस्थळ बीभत्स बनले, शिवाय डोंगर कडे धोकादायक बनले आहेत.
कसौल हे एकट्या-दुकट्या प्रवाशासाठी नंदनवनच आहे. विशेषतः ट्रॅकिंगसाठी हे एक जागतिक केंद्र बनले आहे. इस्राइलींनी तेथेच डेरा टाकल्यामुळे त्याला मिनी इस्राईल म्हणून ओळखले जाते. कसौलमध्ये आम्ही पोहोचलो तेव्हा तेथे २४ अंश तापमान होते. डिसेंबर-फेब्रुवारीपर्यंत तेथे हिमवर्षाव होतो.
कसौलच्या इस्राइली अस्तित्वाबद्दल सांगायचे झाल्यास तेथे ऐन हंगामात हजारभर तरी इस्राइली असतील. एक गट परत गेल्यावर दुसरा गट त्यांची जागा घेतो. गेल्या कित्येक वर्षांत त्यांच्या अनेक पिढ्यांनी कसौलचा आश्रय घेतला आहे. मला एक दुकानदार सांगत होता, या लोकांचे आजोबा येथे येऊन गेले. ते आपल्या महिनाभराच्या वास्तव्यात संपूर्ण मौज करतात.
त्यांच्या ड्रग्स पार्ट्यांचे फलक खुलेआम लागले होते. सर्वसाधारणपणे लष्करी सेवेतून मुक्त झाल्यावर जीवनाचा संपूर्ण उपभोग घेण्यासाठी शोधलेला हा मार्ग आहे. येथे ते बेधुंद जगतात. त्यांनी कालिदासाची अद्भुत साहित्यकृती वाचलीही नसेल. कालिदास प्रत्यक्षात हिमालयात गेला नाही, पण तो लिहितो, हिमालयाची लावण्यवती मुलगी जेव्हा कौतुकाने आणि अभिलाषेने त्या दैवी विश्वनिर्मात्याला सामोरी जाते तेव्हा उत्कटता आणि भक्तीचा मिलाफ होतो.
कालिदासाच्या अद्भुत कल्पनेनुसार कामपीडित युगुल तेथील गुंफांमधून प्रणयाराधन करतात...त्याच काव्याची भुरळ पडून इस्रायली येथे आकृष्ट झालेले नसतील? त्यावर युद्धखोर इस्राइललाही सामाजिक उपाय शोधता आलेला नाही. परंतु भारताबरोबर त्यांचे चांगले जमते. विशेषतः मोदी राजवटीत. त्यामुळे जेव्हा आम्ही कसौलला गेलो, तेव्हा भारत-पाक संघर्षात भारताने इस्राइली युद्धनीतीचा अवलंब केला, असा तेथील इस्राइली तरुणांचा दावा होता. पाकिस्तानवर हल्ला करताना भारताने इस्राइली बनावटीचे तीक्ष्ण ड्रोन वापरले. त्यामुळे भारत-इस्राइल संबंधाकडे हे तरुण आस्थेने पाहतात.
तोष हा कसौलहून दोन तासांचा रस्ता. हा भाग पहाडी आहे, फार सोपा नाही. तोषवर निसर्गाने जादू केली आहे. सोलो प्रवाशांसाठी हे तर नंदनवनच. गर्दीच्या कुलू गावातून सुटका करून घेण्यासाठी येथे जरूर यावे. लोक मैत्रीपूर्ण आहेत. तोषला घेऊन जाणारा रस्ता गेल्यावर्षी वादळात वाहून गेला, नदीवरचा एकमेव लोखंडी पूलही तुटला. त्यामुळे महिला पायथ्याशी येऊन थांबल्या होत्या. सामान वाहून नेण्याचे काम करतानाच त्यांच्या चेहऱ्यावर आस्थेचे हसू होते. पर्यटकांना त्या परकी भासू देत नाहीत.
तोष गावाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे ते पार्वतीच्या डोंगरदरीत वसलेले आहेच. शिवाय चारीही बाजूने हिमपर्वतांनी वेढलेले आहे. त्यामुळे स्वाभाविकपणे तेथील हवामानही क्षणाक्षणाला बदलते. आमच्या जाण्याच्या दिवशी अचानक आभाळ भरून आले, तापमान सहा अंशाच्या खाली गेले, आम्ही कुडकुडू लागलो.
क्षणात काळोख दूर करून ढग उतरून खाली आले. आम्हांला लपेटून दुसऱ्या डोंगरावर क्षणात निघून गेले, त्यानंतर त्यांनी देवदार वृक्षांना कवेत घेतलेले दृश्य पाहता आले. दुसऱ्या बाजूला आता सर्व पर्वतांवर पांढऱ्या शुभ्र हिमवर्षावाची दुलई पांघरली गेली होती. पहिल्या रात्री अवघ्याच शिखरांवर बर्फ दिसत होता.
आता सर्व पर्वत पांढरेशुभ्र बनले होते. हा हिमाचल म्हणजे हिरव्यागार जंगलांवर छत्रकृपा धरून असलेली उंच बर्फाच्छादित शिखरे आणि आसमंतात पसरलेली तिची जादूई भव्यता... हे एक विलक्षण दृश्य आम्ही पाहिले व निसर्गाची किमया वाखाणताना आम्हांला शब्द सापडत नव्हते. हिमालयात थरारक सौंदर्य, तीव्र उंचीचे प्रदेश आणि हिमनगाची इतकी टोके बघायला मिळतात की त्यातून आश्चर्य आणि भीती या दोन्ही भावना जन्म घेतात.
हिमालयाची भव्यता बघून तो अनंतकाळापासून येथेच आहे असे वाटले तरी वास्तविक तो पृथ्वीवरच्या सर्वांत अर्वाचीन पर्वतरांगांपैकी एक आहे.
गावच्या माणसांनी, विशेषतः महिलांनी, येथील अर्थकारण सांभाळले आहे. थोडीशी शेती व आटोपशीर पर्यटन. पर्यावरणाच्या संघर्षात सफरचंदाच्या बागा कमी झाल्या आहेत. काहीजण मेंढ्याही पाळतात. उंच पर्वतावर या मेंढ्या चरायला घेऊन जातात. काहीजण महिनोन्महिने डोंगरावर मुक्काम करतात. उत्सवाच्या दिवशी प्रत्येक घरात मेंढरी कापली जाते. त्यांची शिंगे घरावर लटकावली जातात. ते एक शुभचिन्ह मानले जाते.
उपाशीपोटी राहिले तरी तेथे जगण्याची जिद्द आहे. सप्तऋषींपैकी जमदग्नी हा त्यांचा देव. परशुरामांचा पिता. तो आध्यात्मिक होता, परंतु शीघ्रकोपी होता. त्यातूनच त्याने आपल्या पुत्राकरवी धर्मपत्नी रेणुकेचा बळी घेतला. परंतु येथील पर्वत बाहेरून शांत वाटले तरी त्यांच्यातही जमदग्नीचा अंश असावा. येथे आता मधूनच पूर येतात, वादळामुळे नासधूस होते. सतत दरडी कोसळतात. त्यामुळे जीवनात आक्रोश, आर्तता आहे.
गेल्या मोसमात पूल वाहून गेला, तो अजून व्यवस्थित झालेला नाही. लोक निसर्गाच्या सान्निध्यात राहण्याचा प्रयत्न करतात. या जीवनाच्या लढाईत हजार घाव सोसत मान उभी करून जगले पाहिजे, ही त्यांना सृष्टीचीच शिकवण आहे. हिमालयाचे गुणगान करायला हजारो देवपुत्रदेखील पुरणार नाहीत, असे उद्गार वैदिक काळातील एका ऋषींनी काढले आहेत.
आणखी एक ऋषी म्हणतो, सूर्य जसा पहाटेचे दव शोषून घेतो तसेच हिमालयाकडे नुसती नजर टाकली तरी माणसाची पापे वाहून जातात. विदेशी कवींनीच हिमालयावर लिहिले आहे ः
समोर दृग्गोचर होणारे हे अतुलनीय पर्वत
म्हणजे जणू समांतर दुनियेतले
त्यातून खळाळणारे थंडगार जलपात्र
केवळ स्वप्नगरीतच आस्वादावेत...
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.