केवळ समुद्रकिनाऱ्यांसाठी प्रसिद्ध असलेल्या गोव्याचा ३३% पेक्षा जास्त भूभाग शासकीय जंगलांखाली येतो आणि त्यातील मोठा हिस्सा सुरक्षित अभयारण्यांनी वेढलेला आहे. पश्चिम घाट हा ‘युनेस्को’चा जागतिक वारसा दर्जा असलेला प्रदेश गोव्याच्या पूर्व सीमेला लागून असल्याने येथे दुर्मिळ वनस्पती, प्राणी आणि पक्ष्यांचे नैसर्गिक अधिवास पाहायला मिळतात. परंतु वाढते शहरीकरण, अवैध शिकार व नैसर्गिक अधिवासाचा ऱ्हास यामुळे गोव्यातील अनेक प्राणी, पक्षी व जलचरांचे अस्तित्व धोक्यात आले आहे. वन्यजीव सप्ताहास (२ ते ८ ऑक्टोबर) आजपासून प्रारंभ होत आहे. ‘अधिवासांना जोडणे, समृद्ध वन्यजीव ’ ही यंदाची संकल्पना आहे.
वन विभागाने डिजिटल माध्यमे आणि कलेच्या माध्यमातून वन्यजीव संरक्षणाचा संदेश लोकांपर्यंत पोहचवण्यासाठी स्पर्धांचे आयोजन केले आहे.
रील मेकिंग स्पर्धा : या स्पर्धेचा विषय ‘Wildlife in Your Backyard’ (आपल्या अंगणात वन्यजीव)असा ठेवण्यात आला आहे. या स्पर्धेद्वारे राज्यातील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना परिसरातील वन्यजीवांना कॅमऱ्यात कैद करण्याची संधी देण्यात येत आहे.
वन्यजीव फोटोग्राफी स्पर्धा : गोव्यातील रहिवाशांसाठी आयोजित स्पर्धेचा विषय ‘Landscapes of Life: Wild Habitats of Goa’ (सृष्टीचे रंग: गोव्यातील वन्यजीवांचे नैसर्गिक आश्रयस्थान) असा आहे. यातून गोव्याची जैव-विविधता आणि जंगलांचे सौंदर्य अधोरेखित करून ते प्रदर्शित करण्यात येईल.
गोव्यातील वन्यजीव सृष्टी अशी
प्रमुख प्राणी
गोव्याच्या घनदाट जंगलांत विविध प्रकारचे सस्तन प्राणी आढळतात.
गवा : हा गोव्याचा राज्य प्राणी आहे. जंगलांमधील सदाहरित व ओलसर पानझडी भागात हे प्राणी कळपाने राहतात.
मांसाहारी प्राणी : जंगलांच्या दुर्गम भागात बिबट्या, रानमांजर आणि अत्यंत दुर्मिळ मानला जाणारा ब्लॅक पँथर (काळा बिबट्या) आढळतो. तसेच म्हादई आणि नेत्रावली भागात बंगाल टायगर (वाघ) चे अस्तित्व देखील नोंदवले गेले आहे.
इतर प्राणी : सांबर, चितळ , भेकर, रानडुक्कर, शेकरू , आणि स्लॉथ अस्वल (अस्वल) प्रामुख्याने आढळतात.
पक्षीवैविध्य
गोव्यात पक्ष्यांच्या ४०० ते ४५० पेक्षा जास्त प्रजाती आढळतात, ज्यामुळे हे राज्य पक्षीप्रेमींसाठी नंदनवन मानले जाते.
माणिक घारी आणि किंगफिशर: गोव्याच्या नद्यांच्या काठावर आणि किनाऱ्यावर किंगफिशरच्या विविध प्रजाती दिसतात.
दुर्मिळ पक्षी: मलबार पाइड हॉर्नबिल, मलबार क्रेस्टेड ईगल, आणि गोव्याचा राज्य पक्षी ‘फ्लेम-थ्रोटेड बुलबुल’ प्रामुख्याने आढळतात. हिवाळ्यात येथे मोठ्या प्रमाणावर स्थलांतरित पक्षी येतात.
सरपटणारे आणि जलचर प्राणी
साप: गोव्यात किंग कोब्रा, अजगर , रसेल वायपर आणि रॅट स्नेक (धामण) यांसारख्या विषारी आणि बिनविषारी सापांच्या २३ हून अधिक प्रजाती आढळतात.
मगर आणि कासव: गोव्याच्या खाड्यांमध्ये (उदा. कुंभारजुवे खाडी) गोड्या पाण्याचे मगरींचे अस्तित्व आहे. तसेच, गोव्याच्या काही समुद्रकिनाऱ्यांवर (उदा. मोरजी) ऑलिव्ह रिडले ही दुर्मिळ सागरी कासवे अंडी घालण्यासाठी ऑक्टोबर ते डिसेंबर दरम्यान येतात.
डॉल्फिन : गोव्याच्या समुद्रात पर्यटकांना लाँग-बीड डॉल्फिन सहज पाहायला मिळतात.
गोव्यात आजच्या घडीस पट्टेरी वाघ, भूजंग, लाजवंती....आदी प्राण्यांचे अस्तित्व धोक्यात आले आहे. त्यांचे नैसर्गिक अधिवास संरक्षित ठेवण्यात गोवा सरकार अपयशी ठरले आहे. २००९ ते २०२६ या काळात जे सहा वाघ दगावले, त्यांच्या मृत्यूची कारणमिमांसा अद्याप झालेली नाही.
राजेंद्र केरकर, पर्यावरणप्रेमी
सस्तन प्राणी
रॉयल बंगाल टायगर : गोव्यातील म्हादयी वन्यजीव अभयारण्य हा वाघांचा एक महत्त्वाचा कॉरिडॉर मानला जातो. जंगलातील मानवी हस्तक्षेपामुळे वाघांचे अस्तित्व येथे धोक्यात आले आहे.
बिबट्या आणि ब्लॅक पँथर: गोव्याच्या घनदाट जंगलात आढळणाऱ्या बिबट्यांच्या शिकारीमुळे आणि मानवासोबतच्या संघर्षामुळे त्यांची संख्या मर्यादित होत चालली आहे.
मलबार सिव्हेट : हा अतिशय दुर्मिळ आणि ‘गंभीरपणे धोक्यात असलेला’ प्राणी असून गोव्याच्या काही उप-डोंगराळ भागांत त्याच्या अस्तित्वाचे संकेत मिळतात.
भारतीय खवलेमांजर : बेकायदेशीर तस्करी आणि त्यांच्या खवल्यांसाठी होणाऱ्या शिकारीमुळे हा प्राणी धोक्यात आला आहे.
जंगली कुत्रा किंवा ढोले : गोव्याच्या जंगलात शिकार करणारे हे जंगली कुत्रे आता अन्न आणि अधिवासाच्या कमतरतेमुळे संकटग्रस्त बनले आहेत.
जलचर आणि सरपटणारे प्राणी
ऑलिव्ह रिडले समुद्र कासव : गोव्यातील मोरजी, अगोंदा , आणि गालजीबाग किनाऱ्यांवर हे कासव अंडी घालण्यासाठी येतात. पर्यटन, समुद्रकिनाऱ्यांवरील प्रकाश प्रदूषण आणि प्लास्टिक कचऱ्यामुळे यांच्या अस्तित्वाला मोठा धोका निर्माण झाला आहे.
गिटारफिश : गोव्याच्या समुद्रकिनाऱ्यावर आढळणारी ही माशांची प्रजाती सध्या ‘गंभीरपणे धोक्यात आलेली’ म्हणून वर्गीकृत आहे.
विंडोपेन ऑयस्टर : गोव्यातील ‘चिखली खाडी’ भागात आढळणारे हे कालवे प्रदूषण आणि बेसुमार उत्खननामुळे धोक्यात आले आहेत.
उभयचर, कीटक आणि इतर
मलबार पाईड हॉर्नबिल : गोव्यातील सदाहरित जंगलांमध्ये आढळणारा हा मोठा पक्षी उंच झाडांच्या कटाईमुळे आपले घरटे गमावत आहे.
मारबल्ड रामानिला : हा पश्चिम घाटातच आढळणारा एक दुर्मिळ बेडूक असून गोव्यातील भातशेती आणि पाणथळ जागा कमी झाल्यामुळे संकटात सापडला आहे.
मलबार ट्री निम्फ : हे पश्चिम घाटाचे वैशिष्ट्य असलेले एक मोठे फुलपाखरू असून जंगलांच्या ऱ्हासामुळे धोक्यात आले आहे.
गोव्यातील वन्यजीवांचे संरक्षण करण्यात स्थानिकांचे सहकार्य मोलाचे असते. वन्यजीव व्यवस्थापनात गोवा अग्रेसर आहे. प्रत्येक महिन्यात ८०० सापांना वन खात्याचे कर्मचारी जीवदान देतात. वन्यजीवांना पाणी व खाण्याचा तुटवडा भासू नये यासाठी जंगलांत पाणवठ्यांची निर्मिती व फळे देणारी झाडे लावण्यात आली आहेत. शिकारीच्या व तस्करीच्या घटना येथे घडत नाहीत. यावरून वन्यजीव व्यवस्थापन किती उत्तम आहे, याचा प्रत्यय येतो.
-कमल दत्ता, प्रधान मुख्य वनसंरक्षक
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.