शिक्षक हा समाजासाठी आदर्श दीपस्तंभ असतो. विद्यार्थ्यांसाठी तो दिशादर्शक असतो. आपल्या गैरवर्तनाने जेव्हा तो समाजासमोर येतो तेव्हा संपूर्ण शिक्षणक्षेत्र हादरून जाते. विवाहित असलेल्या व्यक्तीने आपल्या सहकारी व्यक्तीशी किंवा वर्गातील विद्यार्थिनीशी जवळीक केली तर तो चर्चेचा विषय ठरतो. यात तथ्य किती असते हे न पाहता अफवा पसरवल्या जाण्याचाही धोका असतो.
आपल्याबरोबर त्या दुसऱ्या व्यक्तीचीही अब्रू अकारण चव्हाट्यावर येते. अलीकडे गोवा विद्यापीठात घडलेला असाच काहीसा प्रकार एका कनिष्ठ प्राध्यापकाकडून घडला आणि परागंदा होऊन आत्महत्या करावी असे वाटण्याएवढी नामुष्की त्याच्यावर ओढवली. संबंधित कनिष्ठ प्राध्यापकाची आणि ‘त्या’ मुलीची ओळख - ती मुलगी एका उच्च माध्यमिक विद्यालयात शिकत असतानाची आहे.
ज्यावेळी हे महाशय त्या उच्च माध्यमिक विद्यालयात अध्यापक होते असे कळते. हे महाशय उच्च माध्यमिक विद्यालयातून गोवा विद्यापीठात कनिष्ठ प्राध्यापक पदावर कसे काय पोहोचू शकले याचाही तपास व्हायला पाहिजे.
गेल्या वीस-पंचवीस वर्षात नोकरी मिळवण्यासाठी वशिलेबाजी आणि पैशांची देवाणघेवाण एवढी वाढली की सांगता सोय नाही. मध्यंतरी या संबंधी दैनिकातून या भ्रष्टाचाराचा बॉम्ब फुटला होता. दैनिक ‘गोमन्तक’ने हा विषय लावून धरला आणि संबंधितांना अटक करण्यात आली होती. आता ते प्रकरण बासनात गुंडाळले गेले असतानाच हा गोवा विद्यापीठाच्या गलथानपणाचा दुसरा बॉम्ब फुटला. गोवा विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात याचे पडसाद उमटले आहेत. त्यामुळे प्रकरणातील गंभीरता वाढली आहे.
गेल्या काही वर्षांत केवळ शिक्षण खात्यातच नव्हे तर इतर सर्वच सरकारी आणि निमसरकारी खात्यात वशिलेबाजीने नेमणुका, नियुक्त्या, बढत्या, सेवावाढ होत गेल्या. गोवा पब्लिक सर्व्हिस कमिशन आणि नोकर भरती समिती ही केवळ नाममात्र अस्तित्वात उरली आहे.
निवडीसाठी घेतल्या जाणाऱ्या चाचणी परीक्षा आणि मुलाखती यादेखील दिखावा ठरल्या. ज्याचा वशिला मोठा तो निवडला जाऊ लागला. यामुळे गुणवत्ता दुय्यम ठरली आणि निकृष्ट दर्जाची माणसे सरकारी सेवेत घुसली. बरे या घुसखोरांच्या मागे गॉड फादरचा वरदहस्त असल्याने त्यांच्या वाटेला कोणी जाईनासे झाले. परिणामी प्रशासनात शिथिलता आली आणि प्रशासनाचा बोजवारा उडाला.
पूर्वी गुणवत्ता आणि अनुभव हे पाहूनच सरकारी नोकराची नेमणूक केली जात होती. सेवा ज्येष्ठता, कार्यक्षमता आणि अनुभव पाहून बढत्या दिल्या जात होत्या. आता ही पद्धत बदलली गेली आहे ती केवळ राजकीय नेत्यांच्या सोयीसाठी आणि हितसंबंध जोपासण्यासाठी! हा जो कोणी कनिष्ठ प्राध्यापक उच्च माध्यमिक मधून विद्यापीठात आला तोदेखील अशाच पद्धतीने आला असावा असा दाट संशय वाटतो.
त्याच्या पाठीशी कुणीतरी बडी राजकीय असामी असावी आणि म्हणूनच विद्यापीठाच्या ज्येष्ठांनी या प्रकरणाकडे दुर्लक्ष केले असावे. दैनिक ‘गोमन्तक’ने हे प्रकरण लावून धरले नसते तर हे प्रकरण कधीच प्रकाशात आले नसते. एक दोन वर्षापूर्वी माशेलमधील एका शिक्षण संस्थेत शिकवीत असणाऱ्या प्राध्यापिकेचा, ती ज्या जिममध्ये व्यायाम करण्यासाठी जात होती तिथल्या ट्रेनरने एकतर्फी प्रेमातून तिचा खून केला होता.
तोही विवाहित पुरुष होता. लिंगपिसाट वृत्ती इतकी पराकोटीला गेली आहे की या विषयवासनेला वयाचे बंधन उरलेले नाही. अगदी चार वर्षांच्या अजाण बालिकेपासून ते सत्तर वर्षांच्या वृद्ध महिलेवरदेखील बलात्कार होत असल्याच्या बातम्या वेळोवेळी झळकत असतात.
अगदी काल परवाच महाराष्ट्र राज्याच्या विधानसभेत हनी ट्रॅपचा बॉम्ब फुटला आहे. त्यात आजी माजी मंत्री, आमदार, खासदार आणि वरिष्ठ अधिकारी सापडले आहेत. कलियुग आले आहे कलियुग, दुसरे काय!
विवाहित पुरुषांना आणि त्यातही शिक्षकी पेशात असणाऱ्यांना असली प्रेमप्रकरणे शोभा देत नाहीत. अशावेळी एखाद्या अविवाहित व्यक्तीला विवाहाचा पर्याय तरी उपलब्ध असतो परंतु विवाहित व्यक्तीला पर्याय शोधावा लागतो आणि त्यातून दुसरे अनेक दुर्धर प्रसंग व्यक्तीच्या आयुष्यात उद्भवतात. त्याची सामाजिक पत रसातळाला जाते. त्याचे पूर्ण कुटुंबच निंदेला पात्र ठरते.
अभ्यासू मुले आपल्या मेहनतीने पुढे जातात तर ज्यांना मेहनत न करता पास व्हायचे असते ते आड मार्ग स्वीकारतात. यातून काही विकृत मनोवृत्तीचे लोक फायदा उठवतात. यासाठी सावध राहणे सर्वांच्याच हिताचे आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.