बऱ्याच पठारांवर गव्यांचे पूर्वापार खाद्यान्न असणाऱ्या वृक्षवेलींची सरसकट कत्तल केल्याने, आज गव्यांचे कळप अन्न पाण्याच्या शोधार्थ शेती आणि बागायतींकडे वळत आहेत. त्यामुळेचंं मानव आणि गवे यांच्यातला संघर्ष टोकाला गेला आहे.
चमचमत्या रुपेरी वाळूच्या सागर किनाऱ्याने युक्त गोव्यात जी सह्याद्रीच्या पर्वतरांगांनी युक्त जंगले आहेत, तेथे गवा या जंगली प्राण्याचे फार पूर्वीपासून वास्तव्य आहे. सांगे तालुक्यातील रिवण-कोळंब या गावांच्या शेजारी वसलेल्या फणसायमळ येथील कुशावती नदीकिनारी जांभ्या दगडावर जी शेकडो चित्रे कोरलेली आहेत, त्यात लक्षवेधक असे गव्याचे प्रस्तर चित्र आहे. त्यावरून गोव्यातल्या जंगलांची शान असणाऱ्या गव्याचे इथल्या पर्यावरणीय परिसंस्थेतले महत्त्व स्पष्ट आणि अशा प्राण्याचे चित्र कोरल्याने त्याच्या अस्तित्वाचे ज्ञान इथल्या जंगलनिवासी लोक समूहाला असल्याची जाणीव होते.
पूर्णतः विकसित झालेल्या प्रौढ नर गव्याचे वजन ९०० ते २२०० किलोच्या आसपास आणि त्याच्या मस्तकावर अर्धचंद्राकार आणि भारदस्त शिंगे, असल्याने त्याच्या भव्यतेची कल्पना आल्याशिवाय राहत नाही. जगभरात आढळणाऱ्या समस्त गोवंश कुळातील महाकाय असणाऱ्या या जंगली प्राण्याविषयी गोव्यात पूर्वापार माहिती होती आणि त्यामुळेच त्याचे हे स्थान आणि महत्त्व ओळखून बहुधा त्याला राज्य प्राण्याचा किताब सरकारने बहाल केला आहे. काणकोणला जे ग्रामनाम लाभलेले आहे, त्याचा उद्गम या भूमीला असलेल्या काडकोण नावावरून झाल्याचे मानले जाते. कॅनरा जिल्हा गॅझिटियरमध्ये काडकोण ही संज्ञा गव्यासाठी वापरल्याचे नमूद केल्याने, काडकोणचा अर्थ गवा असा झालेला आहे आणि त्यात असलेले तथ्य इथल्या गावोगावी असलेल्या गव्याच्या वावरामुळे स्पष्ट झालेले आहे.
गवा हा खुरधारी आणि रमंथक तसेच ताकदवान जंगली प्राणी असून, तो माळराने, पठारावर असलेल्या तृणपाती, पालापाचोळा, उपलब्ध मौसमी जंगली फळांचे भक्षण करून जगायचा. गोव्यात सत्तरी, फोंडा आणि काणकोण येथे असलेले गवाणे गाव, बहुधा इथे असलेल्या गव्याच्या नैसर्गिक अधिवासामुळे नावारूपास आले असावे. आज ही या गवाणे गावांत इथल्या शेतकरी आणि बागायतदारांना गव्यांचे वास्तव्य अनुभवायला मिळते. एकेकाळी श्रावण-भाद्रपदात ज्या पठारावरती मौसमी रानफुलांचे वैभव दृष्टीस पडायचे तेथील गवतावर मनसोक्तपणे ताव मारणारे गवे दिसायचे.
ज्या कारवीच्या झुडूपांना जांभळ्या, गुलाबी,निळ्याशार कारवीच्या नाजूक फुलांचे फुलणे दृष्टीस पडते, त्या झुडपाच्या पानांचा आस्वाद घेण्यासाठी गव्यांचे कळप हमखास कारवीची झुडपे जेथे दाटीवाटीने उभी असतात, तेथे सकाळच्या कोवळ्या उन्हात त्यांची पाने खात असतात. बऱ्याच राज्यांतल्या वनाधिकाऱ्यांनी या कारवी झुडपांच्या पर्यावरणीय परिसंस्थेचा काडीमात्र विचार न करता, त्यांना उपद्रवी आणि टाकाऊ वनस्पती घोषित करून, त्यांची सरसकट तोड करण्याचे आदेश दिले होते. त्याविरोधात जागृत वन्यजीव अभ्यासक आणि पर्यावरण कार्यकर्त्यांनी लढा दिल्यावर , हा आदेश मागे घेण्यात आला होता.
बऱ्याच पठारांवर गव्यांचे पूर्वापार खाद्यान्न असणाऱ्या वृक्षवेलींची सरसकट कत्तल केल्याने, आज अन्न पाण्याच्या शोधार्थ गव्यांचे कळप शेती आणि बागायतींकडे वळत असल्यानेच मानव आणि गवे यांच्यातला संघर्ष टोकाला गेलेला आहे. यापूर्वी धारबांदोड्याच्या महावीर अभयारण्य आणि राष्ट्रीय उद्यानाशी संलग्न गवतांनी समृद्ध माळरानावर जाळपोळ करून अननसाची लागवड केली आणि त्यावर वारंवार गवे ताव मारण्यास येऊ लागल्याने, बागायतदाराने विद्युत भारीत कुंपण घातले. त्यामुळे त्यात विजेचा धक्का लागून आठ गव्यांचा मृत्यू झाला होता. हळर्णच्या जंगलात आणि तिळारीच्या खोऱ्यात यापूर्वी गव्यांच्या निर्घृण शिकारींची प्रकरणे, मांसाच्या वाढत्या मागणीची पूर्तता करण्यासाठी उद्भवलेली आहेत.
गोव्यातल्या सह्याद्रीच्या जंगलांत एकेकाळी गव्यांचा नैसर्गिक अधिवास सुरक्षित होता. त्यांना नानाविध वृक्षवेलींची पाने, बांबूच्या विविध प्रजातींचे कोवळे कोंब, त्याचप्रमाणे जंगलात मौसमी कंदमुळे खाद्यान्न म्हणून उपलब्ध असायची. त्यातून आणि मातीतून उपलब्ध क्षारामुळे त्यांना आवश्यक लवणाची प्राप्ती व्हायची. परंतु त्याजागी आज काजूच्या बागायतींचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात विस्तारल्याने आणि गव्यांनी खाद्यान्न म्हणून काजूचे बोंडू यांचा आस्वाद आवडीने घेण्यास प्रारंभ केल्याने. तसेच अल्कोहोलची लक्षणीय मात्रा असणाऱ्या या फळाची त्यांना चटकच लागल्याने, गव्यांचे कळप काजू बागायतींकडे प्रामुख्याने दिसू लागलेले आहेत. त्यामुळे पिण्याचे पाणी आणि काजू बोंडूचा आस्वाद घेण्याच्या हेतूने गवे गावाच्या परिसरात आढळू लागलेले आहे आणि त्यामुळे गवे आणि मानव यांच्यातला संघर्ष उन्हाळ्यात तीव्र झालेला दिसत आहे.
प्रौढ नर गव्याच्या माथ्यावरती अर्ध चंद्राकृतीची असणारी शिंगे, खरंतर त्यांच्यावर अन्य जंगली श्वापदाने केलेला हल्ला परतवून लावण्यासाठी किंवा दुसऱ्या नराविरुद्ध लढताना आपले सामर्थ्य प्रदर्शित करण्यासाठी व्हायचा. परंतु या शिंगाचा घरात प्रवेशद्वारावर लावण्यासाठी पूर्वी वन्यजीव संरक्षण कायद्याची अंमलबजावणी विशेषत्वाने जेव्हा होत नव्हती, तेव्हा ती वापरली जायची. गोव्यातील जंगल निवासी आदिवासी जमातीला या शिंगाची भुरळ पडली होती आणि त्यासाठी मृत गव्याच्या डोक्यावरची ही शिंगे अलग करून त्यांचा वापर फुंक लोकवाद्य तयार करण्यासाठी व्हायचा.
कैरी नावाचे फुंकवाद्य एखाद्या बैठकीसाठी आमंत्रित करण्याच्या वेळी वाजवण्याची त्यांच्यात प्रथा होती. त्यांच्या शिंगाचा वापर मुकूटासारखा व्हायचा तसेच काही जमाती दारूगोळा साठवण्यासाठी त्यांच्या शिंगातल्या पोकळीचा वापर करायचे. अफाट स्नायूंची बांधणी व भरदार शरीररचना यामुळे गव्याला पट्टेरी वाघ वगळता अन्य शत्रू सहसा नसल्याने, त्याच्या वाटेला कोणी जात नाही. गोव्यातल्या जंगलाचे वैभव असणारा गवा, त्याचमुळे इथल्या राज्य प्राण्याच्या लौकिकास सर्वार्थाने पात्र ठरला आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.