निलांकूर दास
जेव्हा पोर्तुगीजांनी गोव्यावर कब्जा करण्याचे ठरवले, तेव्हा त्यांना तिमोजीच्या रूपाने एक सोबती मिळाला. पण प्रश्न पडतो, तिमोजीने गोव्याच्या भूमीशी विश्वासघात केला होता का? आज पाचशे वर्षांनंतर, इतिहासाला केवळ एका माणसाच्या कृतीपुरते मर्यादित करून पाहणे सोपे वाटते; पण इतिहास अधिक संवेदनशीलतेचा आणि काळजीचा माग जगतो.
‘विश्वासघात’ हा शब्द तसा सोपा नाही, कारण त्याच्या असण्यामागे विश्वासाचा भक्कम म्हणावा तसा पाया असावा लागतो. एखाद्या व्यक्तीचा सत्तेसाठी चाललेला ध्यास, ज्या समाजाने ती सत्ता शक्य केली त्याच समाजाचा कधी आणि कसा विश्वासघात ठरतो? शतके लोटली, काळ बदलला; पण हाच प्रश्न आजही कायम आहे. गोव्यातील सततच्या राजकीय पक्षांतरांनी या प्रश्नाकडे दुर्लक्ष करणे अशक्य केले आहे. राजकीय संधीसाधूपणा एवढा रूढ झाला आहे की, प्रत्येकजण सामाजिक उत्तरदायित्वासमोर स्वतःचा फायदा पाहणार, अशीच नागरिकांची खात्री पटत चालली आहे.
जेव्हा लोकांचा राज्यकर्त्यांवरील विश्वास उडतो, तेव्हा तो अविश्वास त्यांच्या दैनंदिन आयुष्यातही पसरतो. यामुळे समाज बदलत्या परिस्थितीकडे कसा पाहतो, मतांमधील फरक कसा हाताळतो आणि कोणावर विश्वास ठेवावा हे कसा ठरवतो, यावर परिणाम होतो. इथूनच गोव्यातील अधिकाधिक बिकट होत चाललेला ‘स्थानिक विरुद्ध बाहेरील व्यक्ती’ हा संघर्ष सुरू होतो. जमीन, स्थलांतर, रोजगार, घरे, पर्यटन, भाषा आणि सांस्कृतिक अपनाव याबद्दलचे प्रश्न अगदी खरे आहेत आणि त्यावर गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे. पण संरचनात्मक समस्या ओळखणे आणि संपूर्ण गटावरच सामूहिक खापर फोडणे यामध्ये मोठा फरक आहे.
बदलायला लागलेल्या समाजातील स्वतःची भीती बाहेरील व्यक्तीवर लादली जाते. तर स्थानिक व्यक्ती जन्माच्या आधारावर आपली नैतिक श्रेष्ठता सिद्ध करू पाहते. गुंतवणूकदार किंवा सरकारने घेतलेल्या निर्णयांसाठी एखादा परप्रांतीय मजूर किंवा प्रवासी थेट जबाबदार असू शकत नाही. किंवा तो नसावाच! तसेच अनियंत्रित बांधकामे, पर्यावरणाचा विनाश किंवा स्थानिक युवक-युवतींच्या, रहिवाशांच्या रोजगारावर येणारे संकट यावर प्रश्न विचारणाऱ्या गोमंतकीयाला ‘बाहेरच्यांचा द्वेष करणारा’ म्हणून लगेच खारीज करता कामा नये. हे प्रश्न ओळखीचे नसून सुशासनाचे आहेत.
जेव्हा संस्था अपयशी ठरतात, तेव्हा तो अविश्वासाचा रोख एका दिसणाऱ्या लक्ष्याकडे वळतो. जो संताप पारदर्शक नसलेल्या निर्णयांवर आणि अवाजवी सत्तेवर असायला हवा, तो अशा लोकांवर काढला जातो ज्यांचा या निर्णयांवर काहीच ताबा नसतो. परिणामी, ‘स्थानिक विरुद्ध बाहेरला’ हा वाद राजकीय इच्छाशक्तीच्या अभावावर चर्चा करण्यापासून लक्ष विचलित करतो. आणि हे सत्र असेच चालू राहते. लोक स्वतःच्या सुरक्षित वर्तुळात मागे हटतात, इतरांच्या हेतूंवर संशय घेऊ लागतात आणि एकमेकांचे सहकार्य म्हणजे एक धोका वाटू लागतो. स्वतःचा स्वार्थ म्हणजे शहाणपण आणि प्रामाणिकपणा म्हणजे वेडेपणा वाटू लागतो. हे आपल्या सामायिक विश्वाचे अधःपतन आहे.
गोवा नेहमीच सहकार्यावर उभा राहिला आहे, शेजाऱ्यांनी एकमेकांचे दुःख आणि श्रम वाटून घेणे, मच्छिमार तथा मासळी पकडणाऱ्या समुदायांनी ज्ञान देणे, शेतकऱ्यांनी एकमेकांना मदत करणे आणि सांस्कृतिक परंपरा पिढ्यान्पिढ्या पुढे नेणे. मग या विश्वासाच्या लांब पडछायेपासून गोव्याने पुढे कसे जायचे? स्मृती आणि आरोप यातील फरक ओळखला पाहिजे: आपला इतिहास पुराव्यांच्या आणि संवादाच्या आधारे अभ्यासला गेला पाहिजे. भूतकाळातील क्लिष्ट गोष्टींचा वापर आजच्या समाजाविरुद्ध हथिारासारखा करण्याऐवजी, विद्यापीठे, संग्रहालये आणि सांस्कृतिक संस्थांनी तिथे संवादाची केंद्रे उभी केली पाहिजेत. इतिहासामुळे आपली समज वाढली पाहिजे, पूर्वग्रह नव्हे. इतिहासाचे आकलन योग्य पद्धतीने प्रत्येकाने करून घेणे किंवा तसे प्रयत्न होणे गरजेचे आहे.
राजकीय उत्तरदायित्व अपरिहार्य केले पाहिजे : नागरिकांना राजकीय निर्णयांमध्ये पारदर्शकता, उपलब्ध कायदेशीर नोंदी, राजकीय निधीची छाननी आणि अर्थपूर्ण सहभाग मिळायला हवा. आपल्या कृतींसाठी लोकप्रतिनिधींनी उत्तरदायी असले पाहिजे. राजकीय सोयीचे राजकारण जनतेच्या सेवेच्या बुरख्याखाली लपले जाऊ नये. स्थानिक आणि बाहेरचा यांच्यातील स्पर्धेच्या पलीकडे जाणे : गोव्याची भाषा, पर्यावरण, वारसा, जमीन आणि इथले जीवन सुरक्षित ठेवणे आणि येथे राहणाऱ्या व काम करणाऱ्या प्रत्येकास न्याय देणे, या दोन्ही गोष्टी हाताशी हात घालून चालल्या पाहिजेत. जमिनीचा पारदर्शक वापर, जबाबदार विकास, पर्यावरणविषयक कायदे, परवडणारी घरे आणि स्थानिकांचे रोजगार टिकवणे यामुळे असुरक्षिततेचे मूळ कारण संपेल, केवळ आपली ‘ओळख’ पुढे करून सुटका करून घेता येणार नाही.
सहकार्य पुन्हा दृश्यमान करणे : सांस्कृतिक संस्था आणि सामुदायिक उपक्रम लोकांना समान मुद्यांवर एकत्र आणू शकतात. पाण्याचा स्त्रोत वाचवणे, लोप पावणारी परंपरा कागदभांडारात जतन करणे किंवा स्थानिक प्रशासनाला जाब विचारणे हे बदलाच्या वेगापुढे लहान वाटू शकतात, पण विश्वासाचा पाया घट्ट करणारी हीच खरी ठिकाणे आहेत. जेव्हा लोक एकमेकांना दिलेली वचने पूर्ण होताना आणि जबाबदाऱ्या वाटून घेताना पाहतात, तेव्हा त्यांचा परस्परविश्वास दृढ होतो.
शेवटी, जे जे वाईट घडले आहे त्या प्रत्येकामागचे कारण ‘विश्वासघात’ आहे, या समजुतीपासून आपण दूर राहिले पाहिजे. विश्वासघाताचे स्मरण आपल्याला त्याचे धोके ओळखण्यास आणि पुन्हा तसे होऊ न देण्यास मदत करू शकते. आपल्यासमोर प्रश्न हा आहे की, भूतकाळ ज्या विश्वासाघातांवर उभा राहिला आहे, त्यांना आपण ओळखण्यास तयार आहोत का? खासगी फायद्यासाठी सार्वजनिक वचने मोडणे, शेजाऱ्याला ‘बाहेरचा’ ठरवणे, विरोध करणे गैरसोयीचे वाटते म्हणून सामायिक संसाधने विकून टाकणे, आणि सोयीचे सत्य म्हणून खोटे स्वीकारणे—हे सर्व टाळले पाहिजे.
पुढचा रस्ता तेव्हाच सापडेल जेव्हा आपण ‘कोणावर विश्वास ठेवावा’ हे विचारण्याचे थांबवून, ‘आपण स्वतः विश्वास ठेवण्यालायक होण्यासाठी काय तयारी केली पाहिजे’ हे विचारायला लागू तेव्हाच. भूतकाळाने आपल्यात ज्या दारी निर्माण केल्या, त्या आपल्याला इथवर घेऊन आल्या आहेत; पण भविष्यात आपण कसा समाज घडवतो हे ठरवण्याची ताकद भूतकाळाला देऊ नका. ती जबाबदारी पूर्णपणे आपलीच आहे. ही जबाबदारी सर्वार्थाने स्वीकारण्याची गरज आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.