Gandhi Jayanti Dainik Gomantak
गोंयकाराचें मत

Gandhi Jayanti: एका दिवसाची गांधी जयंती अन् 364 दिवस अंधार; झाडू हातात घेण्यापेक्षा गांधीविचार जगण्याची गरज

Mahatma Gandhi Jayanti 2026: महात्मा मोहनदास करमचंद गांधी यांच्यावर ​२ ऑक्टोबरला भाषणे होतात; पण उरलेल्या ३६४ दिवसांत त्यांच्या विचारांशी पुढच्या पिढीचा संवाद किती होतो, हा खरा अस्वस्थ करणारा प्रश्न आहे.

गोमंतक ऑनलाईन टीम

आमोद कुलकर्णी

महात्मा मोहनदास करमचंद गांधी यांच्यावर ​२ ऑक्टोबरला भाषणे होतात; पण उरलेल्या ३६४ दिवसांत त्यांच्या विचारांशी पुढच्या पिढीचा संवाद किती होतो, हा खरा अस्वस्थ करणारा प्रश्न आहे. गांधीजी म्हणजे केवळ गोल चष्मा, काठी, पंचा आणि चलनी नोटेवरील छायाचित्र नाही. ते सत्याशी केलेली अविचल बांधिलकी आहेत.

२ ऑक्टोबर आला, की अचानक देश जागा होतो. शाळांच्या आवारात झाडू फिरतात, रस्त्यांलगत पांढरे टी-शर्ट घालून स्वच्छता मोहिमा सुरू होतात, मुलांच्या हातात झाडू दिले जातात, काही छायाचित्रे टिपली जातात आणि ‘स्वच्छतेचा संदेश’ समाजापर्यंत पोहोचल्याचे समाधान मानले जाते. दुसऱ्या दिवशी तो झाडू पुन्हा एखाद्या कोपऱ्यात टेकवला जातो आणि जीवन नेहमीच्या मळलेल्या वाटेवर परतते. गांधीजींची जयंतीही जणू एका दिवसाच्या कार्यक्रमात आटोपली जाते. पण गांधीजींच्या विचारांना कॅलेंडरवर फक्त एकच तारीख असते का? आणि स्वच्छतेलाही?

​रस्त्यावरचा कचरा डोळ्यांना दिसतो, म्हणून तो झाडणे आणि उचलणे सोपे असते; पण मनात साचलेला कचरा दिसत नाही, म्हणून तो तसाच साचून राहतो. बाहेरची धूळ झाडताना मुलांच्या मनातील असत्याची धूळ झटकण्याची शिकवण आपण देतो का? हातात झाडू देताना त्यांच्या मनात सत्याची जाणीव, श्रमाची प्रतिष्ठा, मतभेदांचा आदर, अन्यायासमोर उभे राहण्याचे धैर्य आणि दुसऱ्याच्या वेदनेबद्दल संवेदनशीलता रुजवतो का? ज्या गांधीजींनी स्वच्छतेला मानवी मूल्यांशी जोडले, त्यांच्या विचारांचा गाभा म्हणजे, सफाई कामगाराला केवळ झाडूवाला न समजता त्याला सन्मान देणे हा होता. एका दिवसासाठी पांढरे कपडे घालून झाडू चालवणारे आपण, वर्षभरातील उरलेले ३६४ दिवस गटारात उतरून कचरा उपसणाऱ्या त्या माणसाला अजूनही माणूस म्हणून पाहायला तयार नाही. मग ही कसली स्वच्छता?

२ ऑक्टोबरला गांधीजींवर भाषणे होतात; पण उरलेल्या ३६४ दिवसांत त्यांच्या विचारांशी पुढच्या पिढीचा संवाद किती होतो, हा खरा अस्वस्थ करणारा प्रश्न आहे. गांधीजी म्हणजे केवळ गोल चष्मा, काठी, पंचा आणि चलनी नोटेवरील छायाचित्र नाही. ते सत्याशी केलेली अविचल बांधिलकी आहेत. ते अहिंसेचा आग्रह आहेत. ते साधेपणातून उभे राहणारे नैतिक बळ आहेत. ते आपल्या सोयीच्या सत्याऐवजी कठीण सत्य स्वीकारण्याची तयारी आहेत. ही ओळख पाठ्यपुस्तकात दोन परिच्छेदांत शिकवून संपत नाही; ती मुलांच्या अनुभवातून, कृतीतून आणि घर-शाळेच्या वातावरणातून घडवावी लागते.

गांधीजी, लालबहादूर शास्त्री, लोकमान्य टिळक यांची नावे परीक्षेतील काही गुणांसाठी पाठ करण्यापेक्षा त्यांच्या जीवनातून स्वतःला आणि सत्तेला प्रश्न विचारण्याची सवय मुलांना लागली पाहिजे. कारण उद्याचा समाज आजच्या वर्गखोल्यांमध्ये आकार घेत असतो. मुलांच्या हातात झाडू देणे चुकीचे नाही; पण झाडूसोबत विवेक दिला नाही, तर आपण फक्त धूळ हलवतो, घाण संपवत नाही.

आज हा कचरा फक्त रस्त्यांपुरता उरलेला नाही. तो आपल्या मोबाईलच्या स्क्रीनवर आणि व्हॉट्सॲपच्या ग्रुप्समध्ये अधिक वेगाने पसरतो आहे. २ ऑक्टोबरला गांधीजींचे विचार स्टेटसला ठेवायचे आणि उरलेल्या ३६४ दिवसांत डिजिटल माध्यमांवर द्वेषाचा, खोट्या बातम्यांचा आणि संशयाचा कचरा फेकत राहायचा, हा आजच्या पिढीचा नवा विरोधाभास आहे. शब्दांची स्वच्छता, भाषेचा संयम आणि भिन्न विचारांचा आदर हेही स्वच्छतेचेच अंग आहे, याचा आपल्याला विसर पडला आहे.

​कालपर्यंत ज्या पक्षाला, विचारांना किंवा नेत्यांना सार्वजनिक व्यासपीठावरून विरोध केला, त्यांच्याच सोबत आज उभे राहताना कालचे शब्द कुठे जातात? काल ज्यांना भ्रष्ट किंवा चुकीचे ठरवले, ते सत्तेच्या एका हातमिळवणीने अचानक योग्य कसे ठरतात? भूमिका बदलली असेल तर त्याचे कारण जनतेसमोर स्पष्टपणे सांगण्याचे धैर्य दाखवले जाते का? की राजकारणात विचार हे फक्त भाषणापुरते आणि सत्ता हीच अंतिम दिशा झाली आहे?

गांधीजींनी शिकवले होते की, “ध्येय कितीही मोठे असले, तरी ते गाठण्याचा मार्गही तितकाच पवित्र असावा.” आज मात्र सत्ता हेच एकमेव साध्य झाले असून मार्ग कोणताही असला तरी चालतो, ही वृत्ती बळावली आहे. मतदार केवळ ईव्हीएमचे बटन दाबत नाही; तो त्या उमेदवारावर आपला विश्वास सोपवतो. त्यामुळे सोयीस्कर पक्षांतर हा केवळ राजकीय गणिताचा भाग नसतो; तो मतदाराच्या विश्वासाचा झालेला व्यापार असतो.

सत्तेसाठी लागणारी सोयीची गणिते, सोयीचे मौन आणि सोयीची तत्त्वे यांना ‘व्यवहार’ या नावाखाली कायमचे झाकता येणार नाही. राजकारणात समीकरणे बदलतात, चेहरे बदलतात, झेंडे बदलतात; पण लोकशाही टिकवून ठेवणारी खरी ताकद एकच, जनतेचा विश्वास. ​या सगळ्या गदारोळात साहित्याची भूमिका अधिक नाजूक, पण तितकीच महत्त्वाची ठरते. प्रत्येक लेखकाने प्रत्येक राजकीय प्रश्नावर रस्त्यावर उतरावे किंवा सत्ताधाऱ्यांवर आगपाखड करावी, अशी अपेक्षा करणेही गैर आहे.

प्रत्येक लेखकाने प्रत्येक राजकीय प्रश्नावर रस्त्यावर उतरावे किंवा सत्ताधाऱ्यांवर आगपाखड करावी, अशी अपेक्षा करणेही गैर आहे. साहित्याला स्वतःचे स्वातंत्र्य आहे; लेखकाला आपल्या संवेदनेचा आणि अभिव्यक्तीचा मार्ग निवडण्याचा पूर्ण अधिकार आहे. पण साहित्य जर समाजाच्या विवेकाला स्पर्श करणार नसेल, तर व्यवस्थेची अस्वस्थता कुठे उमटणार? ज्यांना आवाज नाही, त्यांच्या अनुभवांना शब्द कोण देणार? व्यवस्थेतील विसंगती दिसत असूनही त्याकडे दुर्लक्ष करण्याची सवय लेखणीला लागली, तर साहित्य केवळ बैठकीत सजवण्याची शोभेची वस्तू बनेल.

साहित्यिकाचे काम केवळ टाळ्या मिळवणारे शब्द रचणे नसते, तर काळाच्या छातीवर अस्वस्थ करणारे प्रश्न कोरून ठेवणे हे असते. २ ऑक्टोबर हा केवळ कॅलेंडरवरील स्वच्छतेचा देखावा न राहता, उरलेल्या ३६४ दिवसांत स्वतःला आतून-बाहेरून स्वच्छ ठेवण्याची प्रेरणा देणारा दिवस ठरावा, कारण गांधीजींना एका दिवसापुरते पुजणे फार सोपे आहे; पण त्यांच्या विचारांना आपल्या जगण्यात सामावून घेणे, हीच खरी गांधी जयंती!

​सडलेला हा मनातला कचरा

कधी झाडणार आपण?

हातातल्या झाडूने स्वतःलाच

किती फसवणार आपण?

एका दिवसाच्या जयंतीने

का उजळेल उरलेले आयुष्य,

३६४ दिवस हा अंधार

असाच का सोसणार आपण?

​प्रतिमेला हार घालून तत्त्वे

मात्र विसरत गेलो,

स्वार्थाच्या राजकारणात

सत्यालाच विकत गेलो;

गांधी कुठे हरवले

या फोटोतल्या सोहळ्यांमध्ये?

आपण फक्त उजेडाचा

निव्वळ देखावा करत गेलो!

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Colvale Jail Threat: कैद्याकडून व्हिडिओ कॉलवर सुरा दाखवून धमकी? कोलवाळ कारागृहात खळबळ; हाय-सिक्युरिटी ब्लॉकची झडती

Shukra Gochar 2026: शरद पौर्णिमेचा चमत्कार! धनदाता शुक्र करणार नक्षत्र परिवर्तन, 5 राशींचे पालटणार नशीब; होणार पैशांचा वर्षाव

Teachers Digital Toolkit: गोव्यात शिक्षकांना मिळणार डिजिटल टूलकिट; 5,100 टॅब्लेटसाठी 'इन्फोटेक'कडून निविदा

Plastic Waste Management: बहुपदरी प्लास्टिक पॅकेजिंगवर आता 'डिपॉझिट रिफंड' अनिवार्य करा; गोवा सरकारची 'सीपीसीबी'कडे शिफारस

Asian Games 2026: हॅप्पी बर्थडे चॅम्पियन! लव्हलिना बोर्गोहेनने वाढदिवसाच्या दिवशी जिंकले ‘गोल्ड’; महिला बॉक्सिंगमध्ये भारताला 12 वर्षांनंतर सुवर्ण यश

SCROLL FOR NEXT