Water stream  Dainik Gomantak
गोंयकाराचें मत

Murdi Khandepar Stream: सरस्वती नदीपात्रात भूकंप झाला, बर्फ कोसळला आणि काठावरील संस्कृती नष्ट झाली; मुर्डी खांडेपारचा ओहळ

Bhutkhamb Plateau Murdi Khandepar Stream: चैत्र, वैशाखातील शीतल पौर्णिमेच्या चांदण्याचा स्पर्श जितका सचेतन जीवनदायिनी वाटतो, तितका शरदातल्या पौर्णिमेचा वाटत नाही.

Sameer Panditrao

मधू य. ना. गावकर

चैत्रात गुंफलेल्या सृष्टीच्या बाह्य सौंदर्याचा सारा साज लगेच दिसतो. दिवस मोठे असल्याने उन्हाने वसुंधरा जास्त तापते. मध्यरात्रीच्या प्रहरी वाऱ्याचा नि:श्वास रोखून ती अगदी स्तब्ध असते तेव्हा नक्षत्रांचे तेज मंदावते. मंगळ, गुरु, शुक्र हे ग्रह तारे हिवाळ्यात सृष्टीला खेचून घेतात तसे उन्हाळ्यातील चैत्राच्या रात्रीत होत नाही.

दिवसा ऊन नकोसे असले तरी सूर्याच्या दिव्य तेजाचा झोत चारही दिशांनी पृथ्वीला वेढून टाकतो. रात्री आपले मन चंद्रदर्शनासाठी आतुर बनते. चैत्र, वैशाखातील शीतल पौर्णिमेच्या चांदण्याचा स्पर्श जितका सचेतन जीवनदायिनी वाटतो, तितका शरदातल्या पौर्णिमेचा वाटत नाही. थंड रात्रीतला तो चंद्रप्रकाश कोठून तरी लांबच्या अज्ञात ठिकाणाकडून आलेला वाटतो. पौर्णिमेच्या चांदण्याची बरसात मोहक असली तरी चैत्र वैशाखातल्या पौर्णिमेची रात्र आल्हाददायक वाटत नाही.

कारण आपले शरीर शीतलतेची प्रतीक्षा करीत असते. त्या शरीराला बाहेरची शीतलता लपेटून टाकत एकजीव होते. दुपारच्या उन्हाने दिपलेले डोळे रात्री येणाऱ्या चांदण्याच्या प्रकाश - खेळाची आतुरतेने वाट पाहत असतात. त्यावेळी उजाड स्थानेसुद्धा कितीतरी रमणीय दिसतात. एखाद्या जागी झाडेझुडपे नाहीत.

तिथे रूक्ष वाटले तरी रात्रीच्या चांदण्यात सुखकर वाटते. रात्रीचे आपण चालताना चंद्र आपल्या साथीला असतो. चालताना एखाद्या झाडाखाली पोहोचून त्याला पाहिल्यास तो झाडाच्या माथ्यावर अडकून पडलेला दिसतो. पौर्णिमेच्या रात्री झोपेतून जाग आली आणि उठून बाहेर आलात तर आकाशात पूर्व अगर पश्चिम दिशेला असलेला चंद्र आपल्याला चटकन दर्शन देतो. आकाशातील चंद्रात सर्व संवेदना तरल करण्याचे अद्भुत सामर्थ्य आहे. वसंत ऋतूत फुलातला सुगंध परम म्हणजे सृष्टीचे गंध पूर्ण वैभव आहे.

वसंतात जे जे फुलते फळते त्याला पूर्णविराम देण्याचे काम सखा वैशाख पूर्ण करतो. सौंदर्याची विकल अवस्था चैत्र सहन करू शकत नाही. ती ज्येष्ठ सहमत करून घेतो. सृष्टीच्या तालाचा नूर सांभाळण्यासाठी तो ते घडवून आणतो. कारण वृक्षवल्लींना आलेली पाने माघात गळून पडतात, शिशिराच्या काळात फुलांचा बहर उतरू लागला की वृक्षांच्या फांद्याच्या अंतरात विलक्षण हिरवी उकळी फुटते आणि चैत्रातला कोवळा पोपटी रंग डोकावण्यास सुरुवात करतो.

प्राचीन वनस्पती त्यांचे परागप्राणी, भूरचना त्याकाळी खूपच अनुकूल होती. आता ते प्रतिकूल झाले. आपल्या पृथ्वीवर नागरी संस्कृतीचा उदय झाला त्या काळात पाऊस भरपूर पडत होता. हे गुरुदीप सिंग या पर्यावरण शास्त्रज्ञाने वनस्पतीच्या पराग विश्लेषणाने सिद्ध केले आहे. ‘एखाद्या वाळवंटी प्रदेशात आज चार, पाच इंच पाऊस पडतो. मात्र पूर्वी तो चोवीस, पंचवीस इंच पडत होता’, असे सिंग यांचे मत आहे.

चैत्र, वैशाख वणव्यात माझा प्रवास ओहोळांच्या काठाने चालला असता काही ओहळ सुके पडल्याचे दृश्य मला पाहावयास मिळाले आणि मला अदृश्य माता सरस्वती नदीचे चित्र डोळ्यांसमोर दिसले. भारतात सर्वांत मोठी लांब आणि आठ ते चौदा किमी रुंद तिचे पात्र होते असे पुराणात म्हटले आहे. तिच्या तटावर शेकड्यांनी व्यापारी नगरे वसली होती. पण ती लुप्त का झाली? हे सांगणे शास्त्रज्ञांना शक्य झाले नाही. काहींच्या मते तिच्या परिसरात भूकंप झाला, काहीजण म्हणतात बर्फ कोसळून महापुराने तिचे पात्र माती दगडांनी भरले आणि तिच्या काठावरील संस्कृती नष्ट झाली. काहीही घडले तरी पाण्यात प्रदूषण झाल्याचे आणि तापमान वाढीने पृथ्वीवर संकटे येतात हे नक्की.

आजचा माझा प्रवास भुतखांब पठाराच्या दक्षिण पूर्व बाजूकडील हिरव्यागार पायथ्याकडील मुर्डी खांडेपार ओहोळाच्या काठाने चालला होता. फोंडा तालुक्यातील सर्वांत मोठे पठार म्हणून ते पठार गणले जाते, त्या पठाराच्या अस्तित्वासाठी पठाराच्या सभोवतालच्या गावांतील शेतकरी बागायतदारांनी प्राण पणाला लावून नायलॉन सहा, सहा थापर ड्यूपॉन्ट कंपनी आणि गोवा सरकार विरोधात लढा देऊन भुतखांब पठारावरून वाहणारे नैसर्गिक झऱ्या ओहोळांचे आणि त्या पठाराचे पर्यावरण राखण्याचे काम करून तिथल्या बागायती, झरे, शेतीचे रक्षण केले.

अन्यथा आज पठाराच्या वर्तुळातील गावांवर पाण्याचे संकट मोठ्या प्रमाणात येऊन पठाराच्या परिसराचे वाळवंटात रूपांतर झाले असते. अरब देशात इंधन स्वस्त मिळते, मात्र पाण्याला पैसे मोजावे लागतात. आपल्या देशात निसर्गाच्या कृपेने पाण्याचा साठा मोठ्या प्रमाणात आहे. पण, त्यामुळेच त्याचे मोल आपल्याला समजत नाही. अरब देश इंधनाची उधळपट्टी करतात. आमचा देश पाण्याची नासाडी करतो, हा आशिया खंडातील दोन भागात फरक दिसतो. मात्र आज जरी आपल्या देशात पाण्याकडे दुर्लक्ष झाले तर त्याचे गंभीर परिणाम आपल्याला भोगावे लागतील. इंधन नसले तर लोक वाहने बंद ठेवतील, पण पाणी नसले तर आपण व जैवसंपदा जगू शकणार नाही.

मुर्डी खांडेपार ओहोळाचा उगम घाट्यामळ परिसरात पठाराच्या घळीत होऊन तो झऱ्याच्या रूपाने वाहत खालच्या भागातील क्षेत्रपाल कुळागराच्या भागाला पाणी पुरवतो. तिथून त्याचा प्रवास खालच्या भागातील राजोळ कुळागर परिसरात पोहोचतो. त्या ठिकाणी त्याला तिथला दुसरा ओहळ मिळून त्याचा प्रवाह मोठा होतो. दुसऱ्या ओहोळाचा उगम पाजेमळ भागात होतो. तिथून प्रवासाने तो वानाकडे पोहोचत तिथल्या बागायत परिसराला पाणी पुरवतो.

खालच्या भागातील राजोळ या ठिकाणी मुख्य ओहोळाशी आपले मीलन घडवतो. राजोळकडून खालच्या भागाला पाणी पुरवत तो नमशी शेतीकडे पोहोचून तिथल्या शेती परिसराला पाणी पुरवत उबिर, मालशेत, नानेर्क अशा सरद वायंगण शेतीला पाणी पुरवत खालच्या भागातील खांडेपार नदीत ओहोळाच्या मुखातून मीलन घडवतो.

शिवाय खांडेपार तळये भागात उगम पावलेला दुसरा ओहळ सुरंगी खळी, फिरंगीणी भाट, कडून वाहत येत खालच्या शेताला पाणी पुरवत तिथून पुढे नदीस मिळतो. त्याच मुर्डी भागात तिसरा ओहळ खांडेपार आणि वाघुर्मे सीमाभाग परिसरात पठाकाच्या घळीत घोळशीरे ठिकाणी उगम पावून खालच्या भागातील पाषाण परिसराला पाणी पुरवत पुढे सकले घोळशीरे शेती आणि बागायतीला पाणी पुरवत धाकटे जुवे नदीतील बेटाच्या परिसरात खांडेपार नदीस मिळतो. तळये ओहळ आणि घोळशीरे ओहळ जरी रुंदीने लहान असले तरी ते ओहळ सदोदित पाणी देणारे आहेत.

त्या तीन ओहोळाच्या पात्रात टप्प्याटप्प्यावर बंधारे घालून तिथल्या पूर्वजांनी मुर्डी परिसर सुजलम बनवला. शेतात भात पिकवून भात भाकरी आणि ओहळ, तळी शेतातील खेकडे, गोडी मासळी, कोंगे खाल्ले. दुधसागर, म्हादई, आणि मांडवी नदीच्या संगमातील गोड्या आणि खाऱ्या पाण्यातील शेवटा, चोणकूल, काळुंद्र, तामसा, खरचाणी पालू, शेतुक, झिंगे, खेकडे पकडून भाताबरोबर भोजनात खाऊन जगले. तो परिसर जैवविविधतेचे आगर बनवून सुरुवात राहिले. हिंस्र प्राणी सरपटणारे प्राणी, तृणभक्षक, कृमी कीटकांच्या संगतीत राहून पर्यावरणाचे रक्षण केले होते. आज त्या भागात पावसाळ्यात तीन नद्या पुराच्या पाण्याने थैमान घालतात आणि तिथल्या लोकांचे संसार उद्ध्वस्त करतात.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Water Taxi: गोव्यात लवकरच धावणार पाण्यावरची टॅक्सी! कोचीचे पथक करणार पाहणी; प्रवाशांना मिळणार नवा पर्याय

Goa News Live: ओपा पाणी प्रक्रिया प्लांटमध्ये विद्युत बिघाड, तिसवाडी, फोंड्यात मर्यादीत पाणी पुरवठा

Goa Politics: खरी कुजबुज; पैशांसाठी भारतीय स्त्रिया बनल्या विधवा?

Goa Rain: गोव्यात अतिवृष्टीने दाणादाण! शाळांना सुट्टी, अनेक ठिकाणी पडझड; पुन्हा ऑरेंज अलर्ट जारी

Women Workers Goa: महिला कामगारांबाबत महत्वाचा निर्णय! वेळ निश्चिती, सुरक्षितेबाबत अधिसूचना जारी

SCROLL FOR NEXT