Goa Dainik Gomantak
गोंयकाराचें मत

Goa Opinion: खराब रस्ते, विस्कळीत वाहतूक व्यवस्था, अमली पदार्थाचे संकट; सुंदर, नितळ गोव्याची 'इमेज' धोक्यात

Goa Tourism: गोव्याचे पर्यटन आणि त्याअनुषंगाने येथील गैरसोय, समस्या, गुन्हे, सरकारचा भ्रष्टाचार अशा गोष्टींवर सध्या सोशल मिडियावर खुमासदार चर्चा सुरु आहेत.

Pramod Yadav

प्रसंग एक:

रात्री अकराची वेळ असेल, चार ते पाच मित्रांसोबत कळंगुटच्या प्रसिद्ध टिटोज लेन परिसरात फेरफटका मारत होतो. छुप्या पद्धतीने चालणारे डान्स बार, ठिकठिकाणी दिसणाऱ्या रंगीत लाईट्स, मोठ्या आवाजातील संगीत आणि क्लबबाहेर अंगप्रदर्शन करत खुणावणाऱ्या देशी- विदेशी महिला असा, चककीत माहौल पाहून आम्ही बाहेर पडलो, गाडी पाहताच काही तरुण ‘लडकी चाहीए क्या म्हणत’? पाठलाग करु लागले. रस्ता संपेपर्यंत जागोजागी अशा प्रकारचे दलाल विचारणा करतच होते.

प्रसंग दोन:

पणजी बसस्थानकावरुन दोना पावलाच्या दिशेने जाणाऱ्या खासगी बसमध्ये सायंकाळी सहाच्या सुमारास मी आणि मित्र बसलो. साडे सहाच्या सुमारास आम्ही दोना पावला सर्कलला उतरलो. तिथून जेट्टीवर जाईपर्यंत जेट्टीवरील प्रवेश बंद झाला होता. थोडा तिथेच समुद्रकिनारी थांबून सभोवतालच्या निसर्गरम्य परिसराचा आस्वाद घेतला.

अंधार पडू लागला तसे आम्ही माघारी फिरलो. साडे सातच्या सुमारास पुन्हा दोना पावला सर्कल परिसरात आलो. थोडावेळ पणजीला जाणाऱ्या बसची वाट पाहिली पण बस आली नाही. आजुबाजूला चौकशी केली तर आता बस येणार नाही असे कळाले. म्हणजे रात्री सातनंतर बस मिळतच नाही, असे स्थानिकांनी सांगितले.

शेजारीच असणाऱ्या रिक्षा चालकाला पणजीसाठी भाडे विचारणा केली तर त्याने चारशे रुपये सांगितले. ओला, उबेर सुविधा नसल्याने तो पर्यायच उपलब्ध नव्हता. गोवा माईल्सची टॅक्सीही उपलब्ध नाही. अखेर रात्री नऊ वाजता दोना पावला ते पणजी अशी पायपीट करावी लागली.

प्रसंग तीन:

पणजीत एक छोटोखानी प्रसिद्ध हॉटेल आहे. सकाळी ऑफिसला जाण्यापूर्वी तिथे भाजीपाव आणि चहा घ्यायची सवय आहे. एकेदिवशी नाश्ता करत असताना हॉटेलच्या बाहेरच लागून एक व्यक्ती छोट्या स्टूलवर चिठ्ठ्यांवर काहितरी लिहून ती चिठ्ठी देत होता.

शेजारी बसलेल्या व्यक्तीला विचारले तर त्याने ते मटक्याचे आकडे देत असल्याचे सांगितले. राज्यात अनेक ठिकाणी असे स्टॉल दिसून येतील. गोव्यात दारूची दुकाने आणि मटक्यांचे स्टॉल यांचे मोजमाप नाही, असेही तो व्यक्ती हसत हसत म्हणाला. 

गोवा म्हणजे भारतीयांसाठी पर्यटनाचे हामखास ठरलेले डेस्टिनेशन! एकदातरी जीवाचा गोवा करण्याची अनेकांची इच्छा असते. गोव्याबाबत ऐकीव चित्र तयार करुन अनेक पर्यटक गोव्यात येतात. पण, येथे आल्यावर अरेच्छा गोवा तर वेगळा आहे! अशी भावना मनातून येते.

गोव्याचे पर्यटन आणि त्याअनुषंगाने येथील गैरसोय, समस्या, गुन्हे, सरकारचा भ्रष्टाचार अशा गोष्टींवर सध्या सोशल मिडियावर खुमासदार चर्चा सुरु आहेत. कोरोनानंतर गोव्यात येणाऱ्या परदेशी पर्यटकांची संख्या घटली अशी एक पोस्ट कुठल्याशा एक्स युझरने केली. त्यानंतर राज्यातील नकारात्मक गोष्टींवर आणि आलेल्या अनुभवांवर नेटकऱ्यांनी भाष्य करण्यास सुरुवात केली.

प्रत्येक नाण्याला दोन बाजू असतात असे म्हटले तरी कोणती बाजू प्रकर्षाणे समोर येते हा देखील तितकाच महत्वाचा मुद्दा आहे. गोव्यात आल्यावर राजधानी पणजीतील खराब रस्ते तुमचे स्वागत करतात. त्यानंतर विस्कळीत वाहतूक व्यवस्था तुमच्या त्रास, त्रागा यात भर घालते. कोलमडलेली सरकारी कदंब महामंडळाची बस सेवा एकीकडे आणि दुसरीकडे अरेरावी, मनमानी पद्धतीने सुरु असणारी खासगी बससेवा यांचा सामना करावा लागतो.

दुचाकी पायलट सेवा घ्यायची म्हटले तर ती खिशाला परवडत नाही आणि ओला, उबेर सारखी कॅब सेवा राज्यात उपलब्ध नाही. गोवा माईल्सचा स्थानिक टॅक्सीवाले निभाव लागू देत नाहीत तर स्थानिक टॅक्सीवाले मनमानी पद्धतीने भाडे अकारणी करतात. असून अडचण नसून खोळंबा, असे राज्यातील वाहतूक व्यवस्थेचे चित्र आहे.

गोव्यात स्वस्त दारु, डान्स कल्ब, छोकरी आणि मस्ती - मौज मज्जा असे चित्र घेऊन अनेक पर्यटक येतात. अशा पर्यटकांची फसवणूक होण्याचे प्रमाण अधिक आहे. काही मोठ्या घटना उजेडात येतात काही बदनामी आणि नको ती पोलिस आणि चौकशीचे लफडे म्हणून कधी समोर येतच नाहीत.

कळंगुट - बागा परिसरात असणाऱ्या अनेक डान्स बार, कल्बमध्ये अशा घटना दररोज घडतात पण त्याची वाच्यता अगदीच क्वचित पाहायला मिळते. याच परिसरात लडकी चाहीए क्या? च्या नावाखाली रोज हजारो तरुणांची लाखो रुपयांची लुबाडणूक होते. बीच परिसरात सावज शोधत फिरणारे अनेक दलाल फिरतात.

उत्तर गोव्यात कळंगुट- बागा, हणजूण, वागातोर, केरी या भागात तसेच दक्षिण गोव्यातील ठराविक भागात छुप्या पद्धतीने चालणाऱ्या पार्ट्या आणि तिथे होणारे ड्रग्ज व्यवहार कधी प्रकाशात येत नाहीत.

हैदराबाद पोलिसांनी गोव्यातून अमली पदार्थाचे रॅकेट चालतात त्यात स्थानिक, परदेशी नागरिकांचा समावेश असून, त्यांना पोलिसांचे संरक्षण असल्याचा दावा केला. हैदराबादमध्ये अटक केलेले अनेक पेडलर्सचा गोव्याशी थेट किंवा अप्रत्यक्ष संबंध असल्याचे समोर आले आहे. गोवा पोलिसांनी मात्र हे आरोप फेटाळून लावल्याचे दिसून आले.

अलिकडेच गोव्याच्या पोलिस महासंचालकांची बदली झाली नव्या आलेल्या डिजीपींनी येताच राज्यातील पोलिसांना सतर्क राहण्याचे आवाहन करत कर्तव्यावर असताना अमली पदार्थ किंवा मद्य न घेण्याची सूचना केली. तसेच, याची तपासणी करण्याची जबाबदारी वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांवर सोपवली. दरम्यान, पोलिस देखील अमली पदार्थाच्या आहारी गेल्याचे यातून समोर आले.

गोवा आणि सिंधुदुर्गच्या सीमेवर असणारे सासेली गावातून अमली पदार्थ तस्करीचे मोठे रॅकेट चालते असे काही महिन्यापूर्वी झालेल्या केंद्रीय गृहमंत्र्यांच्या बैठकीत माहिती पोलिसांनी दिली होती. या बैठकीत गोवा, महाराष्ट्र, गुजरात आणि कर्नाटकचे पोलिस अधिकारी आणि मंत्री हजर होते.

राज्यात दररोज अमली पदार्थ विरोधी कारवाई केली जाते. यात कधी स्थानिक, परप्रांतीय तर कधी परदेशी नागरिकांना देखील अटक केली जाते. ३१ डिसेंबर, सनबर्न किंवा अन्य उत्सवाच्या काळात तस्करीचे प्रमाण अधिक पटीने वाढते.

सनबर्नच्या काळात राज्यात अमली पदार्थ, दारु आणि विविध गैरप्रकारांचा सुळसुळाट वाढतो. यामुळे या महोत्सवाला सर्व स्तरातून कडाडून विरोध होतोय मात्र, सरकार याबाबत ठोस निर्णय घेण्याचे धाडस दाखवत नाही.

सरकारमधील घोटाळ्यांची यादी तर मोठी आहे. अनेक मंत्र्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप होत आलेत. कला अकादमी नुतनीकरण घोटाळा, जमीन रुपांतरण, राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा, जमीन घोटाळा यासारख्या भ्रष्टाचाराच्या घटनांमुळे सावंत सरकार अडचणीत सापडले आहे. पण, सरकार यावर सोईस्करपणे भाष्य करण्यास टाळत आहे.

अलिकडेच उजेडात आलेल्या सरकारी नोकरी घोटाळ्यात अनेक सरकारी नोकर आणि राजकीय नेत्यांचा समावेश असल्याचा अंदाज आहे. यामुळे देखील सावंत सरकारची गोची झाली आहे.

गैरसोई आणि समस्यांनी गुरफटलेल्या राज्यात सरकार पर्यटन सुलभ करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचा दावा करते पण पर्यटकांना भेडसावणाऱ्या अनेक समस्या जैसे थे असल्याचे दिसून येते.

सामान्य गोष्टींच्या तक्रारी राज्याला भेट देणारे पर्यटक सोशल मिडियाच्या माध्यामातून मांडत असतील तर सरकारने त्याचा गांभीर्याने विचार करुन त्या सोडविण्यासाठी प्रयत्न करायला हवा. गोवा आणि येथील पर्यटन निरंतर टीकावे असा विचार करणाऱ्या प्रत्येक सुज्ञ व्यक्ती, नेता आणि मंत्र्याने हे चित्र बदलण्यासाठी प्रयत्न करायला हवा.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Recruitment: तरुणांसाठी खुशखबर! निवड आयोगामार्फत 285 रिक्त जागांसाठी जाहिरात; 'या' पदांसाठी मागवले अर्ज

Vedanta Mining Dispute: पिळगावात दुसऱ्या दिवशीही खनिज वाहतूक बंद; शेतकरी मागणीवर ठाम

IFFI 2024: 'भूमी'चे गोमंतकीयांबद्दल गौरवोद्गार! म्हणाली की, लैंगिक भेदाकडे पाहण्याची दृष्टी...

Goa Crime: पुत्रविरहामुळे व्यथित होऊन 'त्याने' संपवले जीवन! सुसाईड नोटमध्ये केला पत्नी आणि तिच्या प्रियकरावर आरोप; Video मध्ये म्हणाला की...

Goa BJP: भाजप नेत्‍यांना पक्षशिस्‍त पाळण्याच्या सूचना! Cash For Job वर जाहीर वाच्‍यता नको; गाभा समितीच्या बैठकीत घमासान

SCROLL FOR NEXT