Ananta Chaturdashi Dainik Gomantak
गोंयची संस्कृताय

Ananta Chaturdashi: अनंताच्या धाग्यात गुंफलेली गोव्याची परंपरा

Goa Culture: अनंत चतुर्दशी म्हणजे गणेश विसर्जनाची सांगता आणि अनंताच्या पूजनाची आध्यात्मिक पर्वणी.

Sameer Amunekar

राजेंद्र पां . केरकर

अनंत चतुर्दशी म्हणजे गणेश विसर्जनाची सांगता आणि अनंताच्या पूजनाची आध्यात्मिक पर्वणी. गोव्यातील विविध समाजघटकांत प्रचलित असलेल्या या व्रताला श्रद्धेबरोबरच सामाजिक सलोखा आणि सांस्कृतिक परंपरेचीही किनार आहे.

गोव्यात भाद्रपद महिन्याच्या चौदाव्या दिवशी सार्वजनिक स्तरावर साजरा केल्या जाणाऱ्या गणपतीचे विसर्जन, तसेच काही कुटुंबांत श्रीविष्णूचे रूप मानल्या जाणाऱ्या अनंताच्या कृपाशीर्वादासाठी व्रत करण्याची परंपरा प्रचलित आहे. त्यामुळे या दिवसाला सांस्कृतिक आणि आध्यात्मिकदृष्ट्या गोव्यात विशेष महत्त्व लाभले आहे. भाद्रपदातील शुक्ल चतुर्थीला गोव्यात घरोघरी मृण्मयी गणपतीची मूर्ती पूजली जाते.

तिचे विसर्जन दीड, पाच, सात किंवा नवव्या दिवशी केले जाते. परंतु सार्वजनिकरीत्या पूजल्या जाणाऱ्या गणपतीच्या मूर्तीचे विसर्जन बँडबाजाच्या वादनाच्या जल्लोषात प्रामुख्याने अनंत चतुर्दशीच्या पवित्र तिथीला करण्याची परंपरा आहे. त्यामुळे गणपती विसर्जनाबरोबर हा दिवस शेषशायी अनंत किंवा संकर्षण व्रताशी संबंधित झाला आहे. अनंत हे श्रीविष्णूचे रूप मानले जाते. त्याला संकर्षण असेही म्हटले जाते. संकर्षण आपल्या सहस्र फण्यांपैकी एका फण्यावर पृथ्वी धारण करतो आणि त्याच्या कपाळातून रुद्र प्रकट झाल्याचे मानले जाते.

अनंताचे पूजन करताना त्याची कांती नूतन आम्रपल्लवांनी युक्त असून, त्याच्या भुवया, मिशा व डोळे पिंगट असून, त्याने पीतांबर धारण केल्याचे मानले जाते. सागराला त्याने भूषविलेले असल्याने त्याला विश्वरूप मानले आहे.

त्याची पूजा करताना भाविक चौदा गाठींचा दोरा हातात आणि गळ्यात बांधतो. हे व्रत चौदा वर्षे केल्यानंतर त्याचे उद्यापन केले जाते. जीवनात येणाऱ्या विविध आपत्तींपासून मुक्तता मिळावी, यासाठी हे व्रत करण्याची परंपरा प्रचलित झाली आहे. गोव्यात काही मोजक्याच कऱ्हाडे ब्राह्मण आणि सारस्वत कुटुंबांत अनंत चतुर्दशीच्या व्रताची परंपरा आहे.

काही संस्कृती अभ्यासकांच्या मते, प्राचीन नागपूजक लोकांचा वैष्णव संप्रदायात समावेश झाल्यानंतर नागपूजा व्रतरूपाने वैष्णव संप्रदायात आली असावी. गोव्यातील काही वैष्णव कुटुंबांत अनंत चतुर्दशीच्या व्रतासाठी परिसरातील मुस्लिम धर्मीयांकडून चौदा गाठींचा दोरा आणून पूजा करण्याची परंपरा आहे. सावईवेरे येथील तळ्यात उभारलेल्या श्री अनंताच्या मंदिरात पूजली जाणारी शेषशायी अनंताची पाषाणी मूर्ती एका मुस्लिम धर्मीय चंदनाच्या लाकडाच्या व्यापाऱ्याच्या नौकेतून आली असल्याचे मानले जाते.

त्यासाठी श्री अनंताच्या परिवारात ‘तांडेल पीर’ म्हणून त्या चंदनाच्या लाकडाच्या व्यापाऱ्याची प्रतीकात्मक पूजा करण्याची परंपरा आहे. या मुस्लिम धर्मीय व्यापाऱ्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी की अन्य कोणत्या कारणासाठी अनंत चतुर्दशीच्या व्रतासाठी चौदा गाठींचा दोरा मुस्लिम धर्मीयांकडून आणला जातो, हे निश्चित सांगता येत नाही.

काश्मीरात अनंतनाग हे तीर्थक्षेत्र मार्तंड पठाराच्या पायथ्याशी आहे. तेथे निरंतर वाहणारा गंधकयुक्त पाण्याचा झरा दोन कुंडांतून वाहतो. या दोन कुंडांच्या मध्ये श्री अनंताचे मंदिर आहे. दरवर्षी अनंत चतुर्दशीला या मंदिरात भरणारी जत्रा पूर्वीपासून विशेष प्रसिद्ध आहे. वैष्णव संप्रदायात श्री अनंताची पूजा करणारा एक पंथ उत्तर प्रदेशाच्या काही भागांत आहे. गोव्यातील वैष्णव संप्रदायात असलेली अनंतपूजनाची परंपरा भारतीयत्वाशी नाते सांगणारी असली पाहिजे.

सावईवेरे येथील श्री अनंताच्या मंदिरातील शेषशायी अनंताच्या मूर्तीविषयीचे आकर्षण गोमंतकीय लोकमानसात होते. त्यामुळे काही कुटुंबांत श्री अनंताची सुबक काष्ठशिल्पे कधीकाळी पूजनीय ठरली होती. अनंत चतुर्दशीच्या व्रतावेळी त्यांचे भजन-पूजन केले जायचे. आज ही काष्ठशिल्पे ब्राह्मणेत्तर कष्टकरी कुटुंबांतही पाहायला मिळतात. त्यावरून शेषशायी अनंताच्या पूजनाच्या परंपरेचे महत्त्व उमजते. सावईवेरेचा श्री अनंत हा देव गेल्या काही शेकडो वर्षांपासून जसा उच्चवर्णीय समाजाने भजला आहे, तसाच तो कष्टकरी समाजातील जाती-जमातींनीही आपलासा मानला आहे. त्याला आपल्या लोकजीवनात आणि लोकसंस्कृतीत आदराचे व भक्तीचे स्थान दिले आहे. हिरव्यागार कुळागरांच्या पार्श्वभूमीवर तळ्यात वसलेले त्याचे मंदिर पिढ्यान्‌पिढ्या भाविकांना दिव्यत्वाची प्रचिती देत आले आहे.

पणजीत जुन्या सचिवालयाच्या मागे म्हामाय कामती यांचे असंख्य खोल्या आणि राजांगण असलेले प्रासादतुल्य ऐतिहासिक घर आहे. येथील म्हामाय कामती कुटुंबातील होतकरू मंडळी व्यापार-उद्योगाशी निगडित होती. त्यांच्या या घरात दरवर्षी संपन्न होणारे अनंत चतुर्दशीचे व्रत केवळ खासगी स्वरूपाचे राहिलेले नाही. त्याला उत्सवाची पर्वणी मानून या घराण्यातील मंडळी या दिवशी येणाऱ्या प्रत्येकाला पारंपरिक भाज्या आणि चवदार पक्वान्नांनी युक्त सुग्रास भोजन देतात. या दिवशी ताटातील शाकाहारी अन्न श्री अनंताचा प्रसाद म्हणून सेवन करण्यासाठी हमखास येथे येतात आणि प्रसन्न चित्ताने अन्न सेवन करून जातात.

कधीकाळी घरात चुकून नाग सापाचा जळून मृत्यू झाला. त्यामुळे आपल्या वंशवृद्धीवर अवकृपा होऊ नये, म्हणून त्यांच्या कुटुंबात अनंत चतुर्दशीच्या व्रताचा प्रारंभ झाला. कालांतराने अनंत चतुर्दशीच्या दिवशी त्यांच्या घरी शतकोत्तर पवित्र व मौल्यवान गणला जाणाऱ्या शंखाचे विधिवत पूजन करण्याची परंपरा सुरू झाली. आजतागायत हा वैशिष्ट्यपूर्ण शंख पवित्र आणि अलौकिक मानून पूजला जातो.

डिचोलीतील सुर्ल गावातील नाटेकर, साधले आणि धोंड कुटुंबीयांत अनंत चतुर्दशीचे व्रत साजरे केले जाते. कुळागरात राहणाऱ्या पद्ये नाटेकर यांच्या कुटुंबात साखळीतील रहिमतुल्ला यांच्याकडून आणलेल्या चौदा गाठींच्या दोऱ्याबरोबर दर्भापासून तयार केलेल्या नागाची पूजा केली जाते. परिसरातील मोसमी फुले व पाने यांची पत्री अर्पण केली जाते. केळीच्या गाभ्यापासून अलंकृत केलेल्या मखरात अनंताचे पूजन केले जाते. त्यानंतर चौदा प्रकारच्या पक्वान्नांचा आस्वाद घेतला जातो. अनंत चतुर्दशीच्या व्रताची गोव्यातील ही परंपरा इथल्या सामाजिक, धार्मिक आणि सांस्कृतिक पैलूंचे दर्शन घडवते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

"पीओके तात्काळ खाली करा!" UN च्या मंचावरुन भारताचा पाकिस्तानला सज्जड दम; मानवाधिकार परिषदेत दहशतवाद्यांना पोसणाऱ्यांचे धुडकावले दावे

सॉफ्टवेअरच सर्वेसर्वा?- संपादकीय

Goa Politics: 'मत चोरी'द्वारे जिंकण्याचा डाव, 1.27 लाख मतदार वगळले; सरदेसाईंचा भाजपवर आरोप

VIDEO: 'सुपरमॅन' मार्को जॅन्सनचा मैदानावर थरार! 6 फूट 8 इंचाच्या गोलंदाजाचा अद्भुत झेल, फलंदाजही शॉक; व्हिडिओ तूफान व्हायरल

Arpora Nightclub Fire: 'बर्च' पीडितांना भरपाई देण्यास लुथरा बंधू तयार; प्रस्‍ताव देणार, वकिलांनी दिली माहिती

SCROLL FOR NEXT