वॉशिंग्टन : अमेरिकेत बर्फवृष्टी, चक्रीवादळांच्या काळात लोकांना घरामध्येच राहावे लागते. या काळात जन्मदरात लक्षणीय वाढ होते. मात्र, तुम्हाला कोरोनामुळेही अमेरिकेत अनेक घरांमध्ये पाळणा हलला असल्याचे वाटत असेल तर चूक आहे. याऊलट, कोरोना काळात अमेरिकेतील जन्मदर ०.१३ ने घटला आहे. १९७० पासून जन्मदरात एका वर्षातील सर्वाधिक घट झाली आहे. सामाजिक सुरक्षा प्रशासन या संस्थेने यासंदर्भात अभ्यास केला आहे.
जन्मदरातील हा बदल किती काळ टिकेल, हा प्रश्न आहे. मात्र, सामाजिक सुरक्षा प्रशासन याबाबत आशावादी आहे. स्थलांतर, जन्मदर व मृत्यूदर कोरोना साथीपूर्व अंदाजानुसार पूर्ववत होईल, असे संस्थेचे मत आहे. मात्र, अमेरिकेत कोरोनाचे थैमान पाहता ब्रुकिंग इन्स्टिट्यूटच्या लोकसंख्याशास्त्रज्ञांना निदान जन्मदराबाबत तरी तसे वाटत नाही. मेलिसा केअर्नी म्हणाल्या, की अमेरिकी अर्थव्यवस्थेत कोरोनाने मोठे संरचनात्मक बदल घडविले आहेत. त्याचप्रमाणे, कोरोनापूर्वीच्या अनेक प्रकारच्या नोकऱ्या आता पुन्हा निर्माण होणार नाहीत. त्यामुळे, उत्पन्नातील घट जितकी दीर्घकाळ असेल, तेवढा काळ मुले होऊ देण्याचा निर्णय लांबणीवर टाकला जाऊ शकतो. अर्थव्यवस्था सुधारली तर घसरता जन्मदरही सुधारता येऊ शकतो.
लोकसंख्यावाढीचा नीचांक
अमेरिकेत १ जून २०१९ ते १ जुलै २०२० या वर्षभरात लोकसंख्यावाढीचा १९००पासूनचा नीचांक नोदवला गेला. जनगणनेच्या आकडेवारीनुसार या वर्षांत लोकसंख्या केवळ ०.३५% वेगाने वाढली. १९१८ मधील स्पॅनिश फ्लूच्या साथीतील लोकसंख्यावाढीपेक्षाही हा वेग कमी आहे.
बेबी बस्ट म्हणजे काय?
अमेरिकेतील लोकसंख्याशास्त्रज्ञांच्या मते, सांख्यिकीयदृष्टा ‘बेबी बस्ट’ म्हणजे २०२१ मध्ये जन्मण्याची शक्यता असणारी तीन लाख २० हजार मुले होय. मात्र, आता कोरोनाच्या साथीमुळे ती जन्मू शकणार नाहीत. अमेरिकी नागरिकांच्या जीवनावर कोरोनाने मोठा परिणाम घडवला. परदेशातून होणाऱ्या स्थलांतरात घट व मृत्यूदरात वाढही झाली आहे.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.