Pakistan Army Attack: पाकिस्तानच्या बलोचिस्तान प्रांतात बलोच बंडखोर आणि पाकिस्तानी लष्कर यांच्यातील संघर्ष आता टोकाला पोहोचला. 'बलोचिस्तान लिबरेशन फ्रंट' (बीएलएफ) या सशस्त्र संघटनेने सोमवारी (29 डिसेंबर) एक खळबळजनक दावा केला असून त्यांच्या सैनिकांनी केलेल्या विविध हल्ल्यांमध्ये पाकिस्तानचे 10 जवान ठार झाले आहेत.
जाहो, बरकान, टंप आणि तुर्बत यांसारख्या मोक्याच्या ठिकाणी हे हल्ले करण्यात आले. विशेष म्हणजे, आदल्या दिवशीच बलोच सशस्त्र गटांनी 15 पाकिस्तानी सैनिकांना ठार केल्याची जबाबदारी स्वीकारली होती. आता त्यापाठोपाठ झालेल्या या नवीन हल्ल्यांमुळे पाकिस्तानी लष्कराचे मोठे नुकसान झाले, असे वृत्त 'द बलोचिस्तान पोस्ट'ने दिले.
दरम्यान, या भीषण संघर्षाची सुरुवात 28 डिसेंबर रोजी दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास अवरान जिल्ह्यातील जाहो भागात झाली. बीएलएफचे प्रवक्ते मेजर ग्वाहराम बलोच यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांच्या लढाऊ सैनिकांनी पाकिस्तानी लष्कराच्या एका मोठ्या ताफ्यावर अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने घात लावून हल्ला केला.
या ताफ्यामध्ये लष्कराचे पायदळ गस्त पथक, बॉम्ब शोधक पथक आणि एक पिकअप वाहन यांचा समावेश होता. हे सर्व एकाच ठिकाणी जमा झाले असताना बंडखोरांनी अचानक गोळीबार सुरु केला. या अनपेक्षित हल्ल्यात 8 पाकिस्तानी सैनिक जागीच ठार झाले, तर तीन जण गंभीर जखमी झाले. धक्कादायक बाब म्हणजे, लष्कराचे एक बख्तरबंद वाहन जे ताफ्याच्या रक्षणासाठी हजर होते, ते या हल्ल्याचा प्रतिकार करण्याऐवजी आपल्याच सैनिकांचे मृतदेह आणि जखमींना घटनास्थळावर सोडून मागे हटले.
त्याच रात्री बंडखोरांनी आपला मोर्चा बरकान जिल्ह्यातील रखनी जवळील सराती-टिक भागाकडे वळवला. येथे असलेल्या एका लष्करी तळाला (कॅम्प) लक्ष्य करण्यात आले. या हल्ल्यात बंडखोरांनी रॉकेट-प्रोपेल्ड ग्रेनेड (RPG) सारख्या जड शस्त्रास्त्रांचा वापर केला. तळाच्या आत आरपीजी गोळे पडल्याने दोन सैनिकांचा मृत्यू झाला, तर एक जण जखमी झाला. बीएलएफने केवळ 24 तासांच्या आत एकूण चार मोठे हल्ले करुन पाकिस्तानी सैन्याची झोप उडवली. 28 डिसेंबरलाच तिसरा हल्ला टंपमधील गोमाजी परिसरात करण्यात आला, जिथे लष्कराच्या चेकपोस्टवर एएल गोळ्यांचा भडिमार करुन लष्करी सामग्रीचे प्रचंड नुकसान करण्यात आले.
या मालिका हल्ल्यांमधील चौथा हल्ला तुर्बत शहराच्या केंद्रस्थानी असलेल्या नौदल तळाच्या (Naval Camp) मुख्य प्रवेशद्वारावर करण्यात आला. 27 डिसेंबर रोजी रात्री 8:20 च्या सुमारास बंडखोरांनी येथे तैनात असलेल्या नौदल कर्मचाऱ्यांवर हँड ग्रेनेडने हल्ला केला. या स्फोटात अनेक जवान हताहत झाल्याचा दावा बीएलएफने केला. या हल्ल्यानंतर संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण असून पाकिस्तानी सैन्याने गस्त वाढवली. बलोचिस्तानमधील (Balochistan) हा वाढता हिंसाचार पाकिस्तानच्या अंतर्गत सुरक्षेसमोर मोठे आव्हान निर्माण करत असून लष्कराच्या वाढत्या मृतांच्या संख्येमुळे पाकिस्तान सरकारची मोठी कोंडी झाली आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.