Pakistan Political Crisis: पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या सुटकेसाठी त्यांच्या पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफ पक्षाने पुन्हा एकदा सरकारविरोधात आंदोलनाचा पवित्रा घेतला. सरकार आणि पीटीआय नेत्यांमधील चर्चेच्या दोन फेऱ्या निष्फळ ठरल्यानंतर खैबर पख्तूनख्वा येथून हजारो समर्थकांचा 'लॉन्ग मार्च' इस्लामाबादच्या दिशेने रवाना झाला. या परिस्थितीमुळे शाहबाज शरीफ सरकार आणि लष्करप्रमुख असीम मुनीर यांची चिंता चांगलीच वाढली.
शनिवारी दोन्ही बाजूंमध्ये चर्चेची दुसरी फेरी पार पडली, जी रविवारी पहाटेपर्यंत चालली. मात्र, यावर कोणताही तोडगा निघू शकला नाही. यानंतर संतप्त झालेल्या पीटीआय समर्थकांनी रविवारी (4 ऑक्टोबर) लक्की मारवत येथून सुमारे 275 किलोमीटर अंतरावर असलेल्या इस्लामाबादकडे कूच करण्यास सुरुवात केली.
आंदोलन रोखण्यासाठी प्रशासनाने आतापर्यंत पीटीआयच्या सुमारे 2000 कार्यकर्त्यांना अटक केली. प्रदर्शनकारी इस्लामाबादमध्ये (Islamabad) घुसू नयेत यासाठी प्रशासनाने राजधानीत कलम 144 लागू केले. संसद भवन आणि प्रमुख महामार्गांवर मोठे कंटेनर्स लावून रस्ते पूर्णपणे बंद करण्यात आले. लष्कर आणि पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला.
पीटीआय नेत्यांच्या मुख्य दोन मागण्या आहेत. पहिली म्हणजे तुरुंगात बंद असलेल्या इम्रान खान यांची त्यांच्या सहकाऱ्यांना भेट घेऊ दिली जावी आणि दुसरी म्हणजे इम्रान खान यांच्या आरोग्य तपासणीसाठी खाजगी डॉक्टरांना परवानगी मिळावी. 73 वर्षीय इम्रान खान ऑगस्ट 2023 पासून रावळपिंडीच्या अदियाला जेलमध्ये बंद आहेत.
त्यांच्यावर भ्रष्टाचार आणि हिंसाचार भडकवण्यासह 100 हून अधिक गुन्हे दाखल आहेत. सर्वोच्च न्यायालयाने त्यांच्या डोळ्यांच्या उपचारासाठी खाजगी रुग्णालयात हलवण्याचे आदेश दिले होते, परंतु सरकारने या आदेशाला आव्हान दिले. आता हा मोर्चा इस्लामाबादमध्ये पोहोचणार की सरकार त्याला मध्येच रोखणार, याकडे जगाचे लक्ष लागले आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.