Sharda Bhawani temple kashmir  Dainik Gomantak
देश

Kashmir Temple: 35 वर्षानंतर उघडले पुरातन मंदिर! 1990 साली दहशतवादामुळे केले होते बंद; मुस्लिम समुदायाने घेतला सहभाग

Sharda Bhawani temple kashmir: तीन दशकांपेक्षा अधिक काळ बंद असलेले शारदा भवानी मंदिर काश्मिरी पंडितांच्या समुदायाने पुन्हा उघडले. या कार्यक्रमात स्थानिक मुस्लिम समुदायाचा सहभागही मोठ्या प्रमाणावर होता.

Sameer Panditrao

श्रीनगर : तीन दशकांपेक्षा अधिक काळ बंद असलेले बडगाम जिल्ह्यातील शारदा भवानी मंदिर काश्मिरी पंडितांच्या समुदायाने रविवारी पुन्हा उघडले. या कार्यक्रमात स्थानिक मुस्लिम समुदायाचा सहभागही मोठ्या प्रमाणावर होता.

मध्य काश्मीरमधील इच्कूट गावातील या मंदिरात मुहूर्तावर प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडला. १९९० च्या दशकाच्या सुरुवातीला काश्मीर खोऱ्यात दहशतवाद आणि कट्टरतावादाचे थैमान सुरू झाल्यापासून पहिल्यांदाच काश्मिरी पंडित कुटुंबांचा एक गट त्यांच्या पूर्वजांच्या गावी परतला. रविवारी झालेला समारंभ काश्मिरी पंडितांसाठी कटू स्मृती विसरून पुन्हा नव्याने आशावाद निर्माण करणारा ठरला.

बडगामच्या शारदा कम्युनिटीचे अध्यक्ष सुनीलकुमार भट म्हणाले, ‘‘आपण असे म्हणू शकतो की पाकिस्तानमधील शारदा माता मंदिराची ही एक शाखा आहे. आम्ही बऱ्याच काळापासून हे मंदिर पुन्हा उघडू इच्छित होतो. स्थानिक मुस्लिम समुदायाचीही इच्छा होती. ते नियमितपणे आम्हाला सांगत की येथे या आणि मंदिराची पुनर्स्थापना करा.’’

काश्मिरी पंडितांनी ३५ वर्षांनंतर हे मंदिर पुन्हा उघडले आहे, असेही ते म्हणाले. ते पुढे म्हणाले, ‘‘आम्हाला आशा आहे की येथे वार्षिक कार्यक्रम होईल. समुदायातील सदस्य लवकरच काश्मीरला परततील, अशी आम्ही प्रार्थना करतो.’’

भट यांनी सांगितले, ‘‘काश्मिरी पंडितांचा एक छोटासा गट, बहुतेक पंतप्रधानांच्या विशेष योजनेंतर्गत काम करीत आहे. हे मंदिर जुने असून, ते पुन्हा बांधण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडे संपर्क केला आहे. आम्ही बांधकामाची योजना आखत आहोत.

सफाई आणि जीर्णोद्धार करताना आम्हाला एक शिवलिंग सापडले आहे. या शिवलिंगाची आम्ही प्रतिष्ठापना केली आहे. स्थानिक मुस्लिम समुदायाने उत्सवात सहभाग नोंदवला आहे. त्यातूनच काश्मीर खोऱ्यातील संमिश्र संस्कृतीचे प्रतिबिंब दिसते.’’

भट पुढे म्हणाले, ‘‘स्थानिक समुदायाशिवाय हे शक्य झाले नसते. आम्हाला मिळालेला पाठिंबाही उत्साह वाढविणारा होता. जेव्हा आम्ही इकडे आलो, तेव्हा आम्ही फक्त चार जण होतो. आज संपूर्ण गाव आमच्यासोबत आहे. हे स्थानिक समुदायाच्या पाठिंब्याचे द्योतक आहे.’’

‘काश्मीर ही पंडितांची जन्मभूमी’

एक वृद्ध स्थानिक मुस्लिम व्यक्तीच्या मतानुसार, काश्मिरी पंडितांचे त्यांच्या मूळ भागांत परतण्याबद्दल स्वागत करायला हवे. ‘‘हे लोक या गावाचे रहिवासी आहेत. परिस्थिती बिघडण्यापूर्वी आम्ही एकत्र नांदत होतो. जर त्यांना कशाचीही गरज असेल, तर आम्ही त्यांना पाठिंबा देण्यासाठी सज्ज आहोत. काळा इतिहास आता बाजूला पडला आहे. नवी सुरुवात होत आहे. काश्मीर खोरे ही पंडितांची जन्मभूमी आहे. येथे हिंदू आणि मुस्लिम अशा दोन्ही समुदायांचे सदस्य एकत्र वाढले आहेत,’’ असेही ते म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Opinion: पोर्तुगीजांनी 'तिठे' उभारून बाजार भरवला, पण आज करोडो खर्चूनही विक्रेते रस्त्यावर का बसतात?

Opinion: गोव्यात 'भिवपाची गरज ना', असं गुंडांना वाटतंय; सामान्यांच्या मनात मात्र भीती!

गोव्यातील तरुणीवर उत्तरप्रदेशमध्ये सामूहिक लैंगिक अत्याचार? तरुणीने व्हिडिओतून केले गंभीर आरोप

AI Image trends: 'फोटो ट्रेंड्स'च्या मायाजाळात हरवू नका; वैयक्तिक स्वातंत्र्याचा विचार करा!

Cabinet Decision: स्थानिकांना 1000 सरकारी नोकऱ्या मिळणार, गोव्यात युनिटी मॉलसह 7 मोठे प्रकल्प उभे राहणार; मंत्रिमंडळात CM सावंतांचा मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT