क्रिकेटच्या मैदानात रंगतदार लढतीसोबतच खेळाडूंमधील वादही अनेकदा चर्चेचा विषय ठरतात. असाच काहीसा प्रकार ४ जानेवारी रोजी दुबई इंटरनॅशनल स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या आयएलटी२० (ILT20) च्या अंतिम सामन्यात पाहायला मिळाला. डेझर्ट व्हायपर्सचा वेगवान गोलंदाज नसीम शाह आणि एमआय एमिरेट्सचा अनुभवी फलंदाज कायरन पोलार्ड यांच्यात भरमैदानात जोरदार बाचाबाची झाली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असून क्रिकेट वर्तुळात याचीच चर्चा रंगली आहे.
एमआय एमिरेट्सच्या डावातील ११ व्या षटकात ही घटना घडली. नसीम शाहने टाकलेला एक चेंडू पोलार्डच्या पॅडला लागला. चेंडू टाकल्यानंतर नसीमने रागाने पोलार्डकडे बघायला सुरुवात केली. पोलार्डनेही त्याला प्रत्युत्तर दिले आणि दोघेही एकमेकांच्या समोर आले.
दोन्ही खेळाडूंमध्ये शाब्दिक चकमक सुरू झाली आणि प्रकरण अंगावर येण्यापर्यंत पोहोचले. अखेर अंपायरने मध्यस्थी करून दोन्ही खेळाडूंना बाजूला केले. पोलार्डसारख्या आक्रमक खेळाडूला नसीमने दिलेले हे आव्हान प्रेक्षकांसाठी धक्कादायक होते.
मैदानातील या वादानंतर नसीम शाहने आपल्या गोलंदाजीने पोलार्डला चोख प्रत्युत्तर दिले. त्याने पोलार्डला २८ धावांवर बाद करून पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. नसीमने या सामन्यात केवळ पोलार्डच नव्हे, तर आंद्रे फ्लेचर आणि टॉम बँटन यांसारख्या दिग्गज फलंदाजांनाही बाद केले.
त्याने आपल्या ४ षटकांच्या कोट्यात केवळ १८ धावा देऊन ३ महत्त्वपूर्ण विकेट्स घेतल्या. नसीमच्या या भेदक माऱ्यामुळे डेझर्ट व्हायपर्सने हा सामना ४६ धावांनी जिंकत विजेतेपदावर नाव कोरले.
सामना संपल्यानंतर आपल्या कामगिरीबद्दल बोलताना नसीम शाह म्हणाला की, "फायनलमध्ये नेहमीच एक वेगळा दबाव असतो. आमच्या संघाने फलंदाजी आणि गोलंदाजी दोन्ही विभागात १०० टक्के योगदान दिले. व्यवस्थापनाने खेळाडूंचा योग्य वापर केला आणि त्याचे फळ आज आम्हाला मिळाले आहे." पोलार्डसोबतच्या वादावर त्याने फारसे भाष्य केले नाही, परंतु त्याच्या आक्रमक गोलंदाजीनेच सर्व प्रश्नांची उत्तरे दिली आहेत.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.