Manipur Ukhrul District Violence: मणिपूरमधील हिंसाचाराचे सत्र थांबण्याचे नाव घेत नसून, राज्यातील विविध भागांतून सातत्याने येणाऱ्या हिंसक चकमकी आणि जीवितहानीच्या घटनांनी प्रशासनाची चिंता अधिकच वाढवली. उखरुल जिल्ह्यात शुक्रवारी दुपारी अज्ञात सशस्त्र हल्लेखोरांनी दोन वाहनांना लक्ष्य करत केलेल्या अंधाधुंद गोळीबारात दोन महिलांसह चार नागा नागरिकांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला.
मणिपूर (Manipur) पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 13 नोव्हेंबर रोजी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास इंफाळ-उखरुल राष्ट्रीय महामार्ग-202 वरील न्यू हेवन परिसरात ही भीषण घटना घडली. लिटान पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या या भागात हल्लेखोरांनी मारुती स्विफ्ट कार आणि बोलेरो पिकअप वाहनावर बेछूट गोळीबार केला, ज्यामध्ये दोन्ही वाहनांच्या पुढील काचांवर गोळ्यांच्या खुणा आढळून आल्या.
या रक्तरंजित हल्ल्यात शांगशाक गावातील कपांगखुई आरएस आणि त्यांची आई हाओलीला आरएस या मायलेकांचा मृत्यू झाला, तर ताशर गावातील ऑगस्ट नगालुंग आणि त्यांची बहीण खानमिला यांनाही आपला जीव गमवावा लागला. या घटनेनंतर संपूर्ण परिसरात प्रचंड तणावाचे वातावरण निर्माण झाले असून परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी व हल्लेखोरांचा शोध घेण्यासाठी मणिपूर पोलीस, बीएसएफ, लष्कर आणि आसाम रायफल्सचे अतिरिक्त जवान मोठ्या प्रमाणात तैनात करण्यात आले.
दरम्यान, या घटनेच्या एक दिवस आधी कांगपोकपी जिल्ह्यात संशयित अतिरेक्यांमध्ये झालेल्या गोळीबारात एका कुकी महिलेचा मृत्यू झाला होता आणि दोन पुरुष जखमी झाले होते. या पार्श्वभूमीवर उखरुलमधील कुकी सीएसओ वर्किंग कमिटीने न्यू हेवन येथील हल्ल्यात कुकी-जो समुदायाचा कोणताही सहभाग नसल्याचे स्पष्ट करत सर्व आरोप फेटाळून लावले असून, ठोस पुराव्यांशिवाय कोणत्याही एका समुदायाला जबाबदार धरू नये, अशी भूमिका मांडली आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.