Cyber Fraud Case: देशात वाढत्या सायबर फसवणुकीच्या आणि मनी लाँड्रिंगच्या प्रकरणांमध्ये सक्तवसुली संचालनालयाने (ED) मोठी कारवाई केली. 100 कोटी रुपयांपेक्षा अधिकच्या 'गुन्हेगारी उत्पन्ना'शी संबंधित अनेक सायबर गुन्हेगारी प्रकरणांची चौकशी करत ईडीने चार जणांच्या मुसक्या आवळल्या. ईडीच्या सुरत सब-झोनल कार्यालयाने ही मोठी कारवाई केली. अटक केलेल्यांमध्ये मकबुल अब्दुल रहमान डॉक्टर, काशिफ मकबुल डॉक्टर, महेश मफतलाल देसाई आणि ओम राजेंद्र पंड्या यांचा समावेश आहे.
ईडीने दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी (Accused) अनेक नागरिकांना फसवून 100 कोटींहून अधिक रुपयांची कमाई केली. फसवणूक करण्यासाठी आरोपींनी अनेक पद्धतींचा अवलंब केला. आरोपी लोकांना डिजिटल अटकेची धमकी देऊन पैसे उकळत होते. तसेच, फॉरेक्स ट्रेडिंगच्या नावाखाली बनावट योजनांमध्ये गुंतवणूक करण्याचे आमिष दाखवून फसवणूक करायचे. एवढचं नाहीतर सर्वोच्च न्यायालय आणि ईडीच्या बनावट नोटीस पाठवूनही लोकांना घाबरवून त्यांच्याकडून पैसे उकळायचे. या प्रकारच्या फसवणुकीच्या माध्यमातून आरोपींनी सायबर फसवणुकीचे मोठे जाळे पसरवले होते.
चौकशीत समोर आलेल्या माहितीनुसार, आरोपींनी गुन्ह्याद्वारे मिळालेली रक्कम लपवण्यासाठी तिचे रुपांतर क्रिप्टोकरन्सी (Cryptocurrency) मध्ये केले आणि त्यानंतर ती रक्कम हवाला (Hawala) मार्गाने लाँडर केली. या संपूर्ण मनी लाँड्रिंग प्रक्रियेसाठी आरोपींनी बनावट नावांनी बँक खाती उघडली होती. तसेच, त्यांनी प्री-ॲक्टिव्हेटेड सिम कार्डचा वापर केला, जेणेकरुन त्यांचे लोकेशन आणि ओळख शोधता येणार नाही.
ईडीने या चारही आरोपींना अटक केल्यानंतर त्यांना अहमदाबाद येथील विशेष पीएमएलए न्यायालयात हजर केले. न्यायालयाने आरोपींना अधिक चौकशीसाठी 5 दिवसांची ईडी कोठडी (ED Custody) सुनावली. या कारवाईमुळे सायबर फ्रॉड आणि मनी लाँड्रिंगच्या मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश होण्याची शक्यता आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.