Village In Goa
Village In Goa Dainik Gomantak
ब्लॉग

A Scenic Village In Goa: भ्रांत विकासाचा बळी ठरलेले आगशीचे वैभव

गोमन्तक डिजिटल टीम

राजेंद्र पां.केरकर

A scenic Village In Goa आगशी हा गोव्यातला शेकडो वर्षांपासून अस्तित्वात असलेला कृषिप्रधान गाव इथल्या आगळ्यावेगळ्या अशा जांभळ्या रंगाच्या आणि रुचकर, लांबट वांग्यासाठी त्याचप्रमाणे रताळी आणि मुळा, तांबडी भाजी यांसाठी नावारूपास आलेला आहे. तिसवाडी तालुक्यातला हा गाव जुन्या काबिजादीच्या अखत्यारीत येत होता.

सेंट लॉरेन्स - आगशी या नावाने १९६३पासून स्वतंत्र ग्रामपंचायत इथे अस्तित्वात असताना, उत्तर गोव्याच्या जनगणनेच्या नोंदीत आणि सरकारच्या महसुली दप्तरात आगशी गावाच्या क्षेत्रफळाची माहिती उपलब्ध नाही.

सेंट लॉरेन्स - आगशी ग्रामपंचायत क्षेत्रात ग्रँड मेरकूरी, पिकेन मेरकूरी या २५६.१८ या पूर्ण क्षेत्रफळाचा आणि गोवा वेल्हातील १०१२.९६ हेक्टर क्षेत्रफळापैकी काही वाड्यांचा समावेश होत आहे.

जेझुईट पंथप्रसारकांनी सोळाव्या शतकात येथील मंदिरे, ग्रामसंस्था यांचे समूळ उच्चाटन करून टाकले. त्यामुळे आगशी स्वतंत्र भौगोलिक, सांस्कृतिक गाव म्हणून नामोनिशाण सापडणे कठीण झालेले आहे.

मांडवी आणि झुआरी या दोन्ही नद्यांच्या संगमस्थळावर वसलेल्या आगशीत फादर बालटा झार यांच्या ४ डिसेंबर १५६२ रोजी लिहिलेल्या पत्रानुसार दोन हजार ख्रिस्ती आणि उर्वरित हिंदू. रेंदेर असल्याची माहिती मिळते.

आगशी गावाचे खरे वैभव म्हणजे इथले आतिथ्यशील माड. कल्पद्रुमाच्या हिरवाईने नटलेल्या गावात माडाची सूर काढण्यात निष्णात असलेले रेंदेर मोठ्या प्रमाणात होते. कधी काळी हा गाव सहजपणे कांतारे गात सरसर माडावर चढणाऱ्यांचा हो रेंदेरांनी गजबजला होता. आज कालौघात इथले रेंदेर कधीच इतिहासजमा होण्याच्या वाटेवर आहेत.

सोमनाथ आणि क्षेत्रपाल ही ग्रामदैवते असल्याचा उल्लेख आढळत असला तरी इन्क्विझिशनच्या काळात या देवतांचे स्थलांतर कुठे करण्यात आले याची माहिती आढळत नाही. मेरकूरी हा गावड्यांनी वसवलेला गाव होता. सातेरी, महादेव, म्हालकूमी, रवळनाथ, सती आदी दैवते इथे असल्याची इतिहासात नोंद आहे.

जेझुईट पंथीयांनी निर्दयपणे आगशी, मेरकुरी आणि परिसरातील हिंदू धर्मीयांची धार्मिक आणि सांस्कृतिक संचिते उद्ध्वस्त करून टाकली. हा सारा परिसर झुवारीकाठी नावारूपास आलेल्या गोपकपट्टणम किंवा गोवापुरीत समाविष्ट होत असल्याने सर्वप्रथम मुस्लीम आणि त्यानंतर पोर्तुगिजांनी आरंभलेल्या जाळपोळीत तेथील संचिते नष्ट झाली.

आगशीचा परिसर कदंब राजा षष्ठदेव तृतीय याच्या आधिपत्याखाली होता. गोवेश्वर अधिष्ठाता देव असलेल्या गोवापुरीच्या उत्तरेस असलेल्या सुली भाट्टी येथील किंजालंगे या शेतजमिनीच्या दानाचा उल्लेख इसवी सन १२५५सालच्या दानपत्रात आढळतो. इतिहासकार फादर कॉस्मे कॉस्ता यांनी दानपत्रात उल्लेख झालेले सुली भाट्टी आज पिलार - नेवरा रस्त्यावरचे सुलाभाट असल्याचे नोंद केलेले आहे.

पिलार-नेवरा रस्त्याच्या बाजूला असलेले सुलाभाटचे तळे हे आगशी आणि परिसरात घडलेल्या घडामोडींचे साक्षीदार आहे. पर्शियन, सोमालियन, इजिप्तशियन, सिंहली, अरब यांच्याबरोबर जुन्या ख्रिस्ती, ज्यू, मुस्लीम अरब, जैन व्यापाऱ्यांची इथे वर्दळ होती, पिलार येथील वस्तुसंग्रहालयात पिलार टेकडी आणि परिसरात आढळलेल्या ऐतिहासिक मूर्ती, संचिते प्रदर्शनास ठेवलेली असून त्यावरून भद्रकाठी भैरव, गणपती, चामुंडा या दैवतांशी निगडीत असलेला शाक्त संप्रदाय इथे असला पाहिजे, असे डॉ. नंदकुमार कामत यांनी म्हटलेले आहे.

सुलाभाटच्या तळ्यातल्या बारमाही उपलब्ध असलेल्या पाण्याचा उपयोग व्यापक प्रमाणात येथील भातशेतीच्या जलसिंचनास केला जायचा. मूळ आफ्रिकेतल्या मादागास्कर या देशातून भारतात आलेल्या गोरखचिंच म्हणजे बाओबाबची एकाच सुलाभाटच्या तळ्याच्या किनारी मोठ्या प्रमाणात वृक्षसंपदा आहे.

२०१०मध्ये गोव्याच्या जलसंसाधन खात्याने सौंदर्यीकरणाच्या नावाखाली या तळ्याला सिमेंट-कॉंक्रीटने बंदिस्त करण्यापूर्वी इथे चिनी मातीच्या भांड्यांचे अवशेष आढळत होते. त्यावेळी तळ्याचा चिखल वर काढताना शेकडो वर्षाच्या इतिहासाशी निगडीत असलेली चामुंडेश्वरीची मूर्ती आढळली होती.

आज ही मूर्ती सातेरी - रवळनाथ मंदिराशेजारी ठेवण्यात आलेली आहे. तळ्याभोवती आज ही फेरफटका मारला तर जुन्या मूर्ती आढळतात. तळ्यापासून काही अंतरावर शिव-पार्वती, गणपती यांची शिल्पे आढळलेली आहेत गतवैभवाच्या खाणाखुणा मिरवणारे एक पवित्र तळे, स्वराज्यातल्या सांडपाणी केरकचरा यांच्या गैरव्यवस्थेपायी विस्मृतीत जाण्याच्या वाटेवर आहे.

देश-विदेशातील व्यापारी, यात्रेकरू यांनी गजबजलेल्या या तळ्याच्या परिसरात हिवाळ्यातच नव्हे तर उन्हाळ्यातही वैविध्यपूर्ण पक्ष्यांचे वैभव अनुभवायला मिळते. उघड्यावरती शौचास जाणे, मूर्ती विसर्जन, प्लास्टिक - थर्माकोलयुक्त कचरा फेकणे आणि अनियोजनपूर्वक सिमेंट-कॉंक्रीटीकरणाने तळ्याच्या अस्तित्वालाही आव्हान दिलेले आहे.

जेझुइट पंथाच्या फादर गोंस्लो कार्व्हालो यांना आगशीच्या ग्रामनामाशी जोडलेल्या सेंट लॉरेन्सच्या चर्चची उभारणी केली! ख्रिस्ती पंथ परंपरेत स्वयंपाकी आणि गरिबांचा आश्रयदाता म्हणून सेंट लॉरेन्सला महत्त्वाचे स्थान आहे. आपल्याजवळ देण्यात आलेली चर्चची धनदौलत त्यांनी गरजूंना वाटून टाकली आणि त्यासाठी त्यांनी पायतळी आनंदाने अंगार सोेसल्याची कथा भाविकांत रूढ आहे.

सेंट लॉरेन्स चर्चची मुख्य पवित्र वेदी ही रंगकाम, कोरीव काम यांचा सुरेख नमुना असून, चर्चचे छप्पर, भिंती आणि अन्य वेदी लक्षवेधक आहेत. रोकोको शैलीत या चर्चच्या मुख्य वेदीचे जे काम केलेले आहे, त्यामुळे ही वास्तू अभ्यासकांसाठी आकर्षण ठरलेली आहे.

अवर लेडी ऑफ कार्मेलचे कपेल त्याचप्रमाणे चर्चशी संलग्न असलेले हायस्कूल यांनी चर्चचा परिसर सतत गजबजलेला ठेवलेला आहे. दरवर्षी १० ऑगस्टला सेंट लॉरेन्स चर्चचे जेव्हा फेस्त साजरे होते तेव्हा या गावातले देशविदेशात असलेले भाविक आवर्जून फेस्ताला उपस्थित राहतात.

ख्रिस्ती पंथ आणि संस्कृतीच्या जागतिक इतिहासात आगशी गावाचे नाव आदराने घेतले जात आहे त्याला गोवापुरीच्या परिसरात सातव्या शतकातला आणि पहलवी या प्राचीन लिपीतला संदेश कोरलेला पवित्र क्रॉस आढळला होता, हे महत्त्वाचे कारण आहे.

या क्रॉसमुळे पश्चिम किनारपट्टीवर ख्रिस्ती पंथ गोव्यात पोर्तुगीज येण्यापूर्वी पोहोचला होता असे प्रतिपादन फादर कॉस्मे कॉस्ता यांनी केले आहे. सुलाभाट, पाद्रीभाट, देकशीभाट, म्हालवाडा, दांडी, मोयता, दुगरे, घोरली मेरकूरी, धाकटी मेरकूरी अशा वाड्यांत हा गाव वसलेला आहे.

कधीकाळी गोवापुरी राजधानी आणि बंदरामुळे देशविदेशातून येणाऱ्या व्यापारी, यात्रेकरू यांनी गजबजलेला हा गाव बिगर गोमंतकीयांच्या वाढत्या लोकसंख्येच्या ताणाखाली घुसमटत चाललेला आहे. एकेकाळी इथल्या नारळाची परदेशात निर्यात व्हायची.

लांबट आणि गुबगुबीत वांगी, मुळा, तांबडी भाजी, रताळी यांच्यासाठी ख्यातनाम असलेल्या शेतमळ्यातूनच महामार्ग बांधल्याने आणि मोठ्या प्रमाणात सिमेंट-कॉंक्रीटची बांधकामे वाढत चालल्याने आगशी हळूहळू आपले गतवैभव हरवत चालली आहे.

जहाजबांधणी- दुरुस्ती करण्याचे प्रकल्प इथे आणण्याचे प्रस्ताव पुढे ढकललेला आहे. गोवा कदंब राजवटीत बंदर आणि राजधानीचे हे शहर आज वाढती बांधकामे, लोकसंख्या, विकासाची भ्रांती निर्माण करणाऱ्या प्रकल्पांपायी अस्तित्वासाठी झगडत आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Panaji News : विरोधकांनी स्वप्नेच पहावी! बाबूश मोन्सेरात

Congress News : काँग्रेसच्या दिग्गजांची पाठ; विराट सभांना फाटा

Panaji News : पणजीत पोर्तुगीजकालीन नाल्यांची सफाई

Goa Dam : पावसाळ्यापर्यंत राज्यात पाणीटंचाईची शक्यता नाही; धरणांमध्ये पुरेसा जलसाठा

Crime News : फोंड्यातील घटना डोक्यात दगड घालून मामाकडून भाच्याचा खून

SCROLL FOR NEXT