Goa Liberation Struggle Dainik Gomatak
ब्लॉग

कहाणी गोमंतकीय मुक्त झालेल्या गोवापुरीची

जय, पराजय कुणाचाही झाला तरी येथील सामान्य प्रजा कायम भरडलेलीच राहिली.

दैनिक गोमन्तक

आटपाट नगर होते. पण तेथे राजा नव्हता, ना आवडती- नावडती राणी, ना दरिद्री ब्राह्मण, तेथील प्रजा सुखी होती का? असावी. कारण, ती आनंदी, समाधानी वाटायची. प्रत्येकाच्या हातांना काम होते. राजदरबारी चाकरी मागे धावणे नव्हतेच त्या तिथे. ''उत्तम शेती, मध्यम व्यापार, कनिष्ठ नोकरी'' हा बीजमंत्र घोळवणारे, सांस्कृतिक पर्यावरण दक्ष प्रजाजन नगरीला लाभलेले. अज्ञात कालापासून अनेक आक्रमक सत्तापिपासू राजवंश झेपावले या स्वर्णनगरीवर. पार साता समुद्रापलीकडूनही विविध धर्म, कैक जाती, कित्येक जमाती, असंख्य पंथ, अगणित संप्रदाय आणि तरीही हा अपरांत राहिला एकसंघ, मंत्र जपत विविधतेतून एकतेचा, साधत सांस्कृतिक पर्यावरण संतुलन. शतक-सहस्रकांचा इतिहास बोलून राहिलाय, म्हणूनच इये गोवापुरी नगरी, कधी न झाला सांप्रदायिक कलह, धर्मसंघर्ष, टोळ्यांमधील परस्पर लढे, द्वेष, मत्सर यातले काहीही... सूतसंहिता नामक प्राचीन ग्रंथातील संदर्भ सांगतो, सप्त वरून दश-दश योजन विस्तृत, पापनाशिनी नगरी गोवापुरी, देवभू, पितृभू, पुण्यभू, ती हीच. उतले नाहीत, मातले नाहीत, घेतला वसा टाकला नाही असे सदाहरित गोवापुरीतील जागृत नागरिक. सुरापानानंतर, - गांवठी ढोसल्यानंतर असंबध्द बडबडला, पण ना कधी मार्गी पडला, ना त्याने पत्नी- पुत्र बडविला. ना राजपथीं थुंकला, शेजाऱ्यांशी भांडला, तंडला, गालिप्रदानी रमला पण प्रहार- शस्त्राघातापासून दूर राहिला. पिढ्यानुपिढ्यांचे वैर जपणे, सूड घेणे ही विकृती मानत. शत्रुवत शेजारी, भाईबंद, याना सुख-दुःख प्रसंगी आधार देतच राहिला, (story of liberated Goa)

आक्रमणमुक्त आर्यावर्तात अखेरी सामील झालेली नगरी गोवापुरी, राजा नसला तरी राज्यशकट हाकायला हवे. म्हणून निर्वाचन व्यवस्थेचा अवलंब क्रमप्राप्त होता. गोवाप्रांत काबीज करण्याचे उद्दिष्ट ठेवून, तसे मनसुबे रचत आलेल्या अनेकानी मुक्ती उपरांत या प्रदेशावर आक्रमण केले. यात विळा-कोयतासम शस्त्रे होती तद्वत अख्ख्या आर्यावर्ती धुमाकूळ घालणाऱ्या दोन मस्तवाल वृषभ विशेषांचाही समावेश होता. मागाहून हेच दोन बैल वेष बदलून गाय वासरू बनून आले, तुंबळ युद्द झाले, पण स्थानिक टोळ्यांनी हे आक्रमण थोपवून धरले, अखेर या परस्थांचा संपूर्ण पाडाव झाला. सीमापार व्हावे लागले त्याना. नावातच गोवा मिरविणाऱ्या दोन जनसमूहानी, थोडथोडकी नव्हे, किमान दहा वर्षे झुंज दिली, नगरी अजिंक्य राहिली.

कालचक्र सुरू राहिले. नर सिंह'' स्वर्गी गेले. हात गोठून गेला. आक्रमक येत राहिले, टोळी युध्दे होतच राहिली. कधी याची सरशी तर कधी त्याची वरशी. कधी खाशा स्वाऱ्यांचा विजय, तर कधी सामान्यांचा. नगरी यातूनही सांवरली. दर पाच वर्षांनी लढाया, जय-पराजय होत पण सांस्कृतिक पर्यावरणाचा समतोल कधी ढळू दिला नाही नगरजनानी. ''शांत प्रदेश'' बिरुद अखंड मिरवत, नगरीय काम-काज सुरूच राहिले.शतकाने एकविशी पार केली आणि गोवेकराच्या या संतुलन व्यवस्थेला कुणा काळतोंड्याची दृष्ट लागली.

कोणी, कसे गौडबंगाल केले सामान्याना कळलेच नाही.पण वावटळ यावी तशा बाहेरील टोळ्या येतच राहिल्या. कधी पूर्वाचल तर कधी उत्तरीय, स्थानिकांशी जमवून घेत, त्यांच्या कल्याणाचे आमिष दाखवत यानी पहिला सुरुंग लावला तो नगरीच्या सांस्कृतिक पर्यावरणीय संरचनेला, अमका वंश श्रेष्ठ, तमका संप्रदाय ज्येष्ठ, याची पुष्टी, त्याची तुष्टी, अशा सुष्ट-दुष्ट मार्गानी मुखियालाच टोळीपासून तोडणे, गनिमी कावा, फितुरी; जनमनाला अपरिचित शब्दांची पेरणी, दबून राहिलेल्या बंडखोरीला शिरणी, खतपाणी, जमातीपासून फोडणे, कोठे गाजरे पेरत तोडणे, कोठे मध चाखवत मोडणे, कधी भांडारे रिती करत, तर कोठे स्वर्णमुद्रा उधळत; परिणामी आप-आपतः नगरीची प्राचीन संस्कृती, शांती, अर्वाचीन समन्वय कायमचे नष्ट व्हावे अशा कारवाया आखल्या गेल्या. सोमवंशी सूर्यवंशात, सुरांचे असुर, परत निजवंशी, अद्वैतवादी द्वैत मतात, टोळीचा, आचार्य, मुखिया, कधी त्याचे सहकारी, सहचारी, प्रभारी, संभारी, भरिभारी. समरांगणी एवढा धुरळा उडालेला, की कोण कोणासाठी, कोणाकडून लढतो आहे, समजण्यापलीकडे पोचलेले.. कळत नव्हतेच, वळतही नव्हते, दिसत, समजत नव्हते. ''दूरगामी परिणामकर्ती'' बावीसची रणधुमाळी म्हणून इतिहासाने याची नोंद घेतली. जखमींची विचारपूस, देखभाल होण्याच्या दृष्टीने एक महिन्याची युध्दबंदी लागू झालीय, परस्पर टोळ्यामधे पुढील परिणामांची चिंता करत, आपापल्या गोटातील नफा-नुकसानीचा अंदाज घेत, आप-आपल्या राहुटीत टोळ्या विसावल्यात. समेट, तहाची बोलणीही सुरू झालीय पण हे सारे वरवरचे. आपलाच वंश शुद्ध श्रेष्ठ म्हणत, जनजीवन हळू-हळू पूर्वपदावर येत आहे, नगरी पुनः मार्गक्रमण करू लागलीय पर्यावरणीय संरक्षण दिशेने.

''टोळी युध्दांचे समरांगण म्हणून दुष्कीर्त गोवापुरी भयमुक्त झाली. राज्यात सर्वत्र आनंदी-आनंद पसरला. प्रजाजन पूर्ववत सुखा-समाधानात नांदू लागले'', सामान्यतः ''आटपाट नगर'' पध्दतीने सुरू झालेली, ''ही साठां उत्तरांची कहाणी पाचां उत्तरी अशी सुफळ संपूर्ण'' व्हायला हवी. पण ही एकविसाव्या शतकातील बाविसाव्या संवत्सराची कलियुगीन कहाणी आहे. ती अशी नेमस्तपणे कधीच संपणारी नाही. तिचा शेवट असा असेल... ''ही युद्धभूमीच राहिली. दूर-दूरच्या मुलुखातून आक्रमक, युध्द पिपासू टोळ्या नगरीत येतच राहिल्या. यादव प्रदेशातून सजद, राजद सम, प्रभू राम-कृष्णांची माया नगरी उत्तरेतील बसप, प्रसप, दक्षिणेतून द्रमुक,पश्चिमेकडून धनुर्बाणधारी,, सपा, रिपा, रावाका, अशा अनेक आपसातील हेवे-दावे, द्वेष, इर्षा, मत्सर यासाठी याच भूप्रदेशावर परस्परात लढू लागल्या. प्रस्थापिताना, नवागताना, सर्वानाच येथे युध्द खेळणे आवडू लागले. जय, पराजय कुणाचाही झाला तरी येथील सामान्य प्रजा कायम भरडलेलीच राहिली. नगरजनांसह ग्रामनिवासी, वनवासी भयभीत झाला. जिणे असह्य झाले तेव्हा येथील अस्वस्थ भूमीपुत्र परागंदा झाला. वाट फुटेल तिकडे, जिवाच्या आकांताने, सैरा-वैरा धावू लागला. हे चालूच राहिले आणि एक दिवस गोवापुरी गोमंतकीयमुक्त झाली.

विनायक विष्णू खेडेकर

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Live News: कामुर्लीच्या उपसरपंच्यांना मारहाण केल्याप्रकरणी एकाला अटक

Saint Francis Xavier Exposition: शब्द नाही भाव महत्वाचा, सेंट झेवियर यांनी ऐकली हावभावांची प्रार्थना; गोव्यात पहिल्यांदाच माससाठी सांकेतिक भाषेचा वापर

IFFI 2024: मराठी कलाकारांची 'शोलेला' मानवंदना! अभिनेत्री प्राजक्ता दातारने म्हणला Iconic Dialogue; ‘बसंती, इन कुत्तों के सामने..'

Pooja Naik Case: '..भाजप नेत्यांना केलेल्या कॉलचा संदर्भ सापडेल'; Cash For Job प्रकरणी पालेकर यांनी केली सीडीआर रिपोर्टची मागणी

Ranbir Kapoor At IFFI: 'मला चित्रपट दिग्दर्शक व्हायचंय पण..'; रणबीरने व्यक्त केली महत्वाकांक्षा; प्रेक्षकांना दिली खूशखबर

SCROLL FOR NEXT