पूर्वी केपे भागात गेल्यावर बाहेर जेवायला फार चांगले पर्याय नव्हते. कामाच्या निमित्ताने त्याभागात फिरताना जेवणाचे हाल व्हायचे. पण अलीकडच्या काळात असंख्य पर्याय उपलब्ध झाले आहेत. मडगाव - केपेरस्ता, केपे - कुडचडे रस्ता, तिळामळ - शेलडे रस्ता अशा केपेला जोडणाऱ्या सर्व रस्त्यांवर वेगवेगळ्या प्रकारचे रेस्टोरंट, खाद्यपदार्थांचे वेगवेगळे गाडे, 'टेक अवे' सेवा पुरवणाऱ्या घरगुती खाणावळींचे बोर्ड नजरेस पडू लागले आहेत. तिळामळ - शेलडे रस्ता हा त्यातलाच एक आहे. या रस्त्यावर पूर्वी एकही रेस्टोरंट नव्हतं आज मात्र असंख्य चांगले पर्याय उपलब्ध झाले आहेत. याभागातून वारंवार कोणा ना कोणाकडून 'अण्णा' चं नाव ऐकायला मिळायचं. कोण आहे आण्णा? कसे आहे त्याचं हे रेस्टोरंट? याबद्दल उत्सुकता होती. पुण्यात डेक्कन भागात असाच एक आप्पा आहे. त्याची एकदम आठवण आली. या आप्पाची खिचडी फार प्रसिद्ध आहे. पुण्याचा आणि शेलडेचा आप्पा - अण्णा यात बराच फरक असला तरी त्यांचं साधंसं दिसणारं नाव आता 'ब्रँड' सारखं झालंय हे त्यांच्या प्रसिद्धीवरून दिसून येतंय. त्यामुळे शेलडे भागात कधी गेलेच तर अवश्य तिथं जेवायला जायचं असं ठरवून टाकलं होतं.(Restaurant in Goa: Know about the famous Anna)
नुकतीच केपे भागात फिल्डवर्कला गेले होते. दुपारची वेळ होती. केपेमध्ये मुख्य चौकात 'मुनलाईट' नावाच्या छोट्याशा शाकाहारी रेस्टोरंटचा बेस्ट पर्याय होता. पण यावेळी आण्णाकडे जायचं असं ठरवून आल्यामुळे आम्ही सगळे आण्णाकडेच गेलो. अण्णाचे रेस्टोरंट म्हणून जरी ओळखलं जात असले तरी 'हिल व्ह्यू बार अण्ड रेस्टोरंट' हे त्याचे खरे नाव. गुगलवर शोध घेतल्यास या नावाने दिशादर्शक सूचना मिळतात. दहा वर्षांपूर्वी 'सर्वशिक्षा अभियान' अंतर्गत गोव्यातल्या सगळ्या पंचायती आणि त्यातील सर्व गावांचा सर्व्हे करत असताना शेलडे पंचायतमध्ये काम केलं होतं. त्यावेळी गावात एकही रेस्टोरंट नव्हतं कि छोटासा चहा गाडा नव्हता. आता शेलडे चांदोर रस्त्यावर किमान पाच सहा रेस्टोरंट आहेत. याच रस्त्यावर आण्णचे 'हिल व्ह्यू बार अण्ड रेस्टोरंट' आहे. रेस्टोरंटमध्ये गेले तेव्हा प्रत्यक्ष अण्णा नव्हतेच त्यांचा मुलगा होता. तर या अण्णांचे नाव सत्यवान व्ही नाईक पण आज ते अण्णा नावानेच प्रसिद्ध आहेत. रस्त्याच्या कडेला ढाबा, पटकन जेवून निघत येईल या प्रकारात मोडणारी जशी रेस्टोरंट असतात तसं हे 'हिल व्ह्यू बार अण्ड रेस्टोरंट' आहे.
बिर्याणी - फिशकरी राइस आणि मटण
आण्णाचे नाव घेतले जाते ते प्रामुख्याने 'बिर्याणी'साठी. 'अण्णाची बिर्याणी' या भागात प्रसिद्ध आणि त्यातही 'चिकन बिर्याणी' जास्त प्रसिद्ध. मी चिकन खात नाही त्यामुळे त्याची चव, त्याचा दर्जा याबाबत सांगू शकणार नाही. पण अनेक खवय्यांनी त्याचं रसभरीत वर्णन केलंय त्यावरून तरी चिकन बिर्याणी चांगलीच असणार असं वाटतं. शिवाय एखादा पदार्थ त्या व्यक्तीच्या नवानिशी ओळखला जातो तेव्हा तो पदार्थ नक्कीच चांगला बनवला जात असणार याची खात्री बाळगावी. तसंच या 'अण्णची बिर्याणी' बाबत म्हणावं लागेल. बिर्याणीमध्ये व्हेज बिर्याणी, चिकन - मटण बिर्याणी, प्रॉन्स बिर्याणी मिळते. बिर्याणीची किंमत देखील बाकीच्या रेस्टोरंटपेक्षा माफक आहे.
इथे पदार्थ 'सर्व्ह' करण्याची पद्धत इतर रेस्टोरंटपेक्षा थोडी वेगळी आहे. त्यातही 'फिशकरी राइस' देण्याची पद्धत वेगळी आहे. दक्षिण भारतीय रेस्टोरंटमध्ये ज्या पद्धतीने ताटात वाढलं जातं अगदी तशीच पद्धत आहे. फक्त म्हणजे फक्त 'फिशकरी राइस'च मिळतो. यापलीकडे ताटात दुसरा कोणताच पदार्थ नसतो आणि जो फिश तुम्ही थाळीसाठी निवडता तो छान चरचरीत तळून, थोड्याशा सलाडबरोबर दिला जातो. आपल्यासमोर भरगच्चं अशी थाळी येत नाही. तुम्ही कितीजण आहात हे बघून एका मोठ्या भांड्यात गरम गरम वाफाळलेला भात आणि दुसऱ्या भांड्यात गरम हुमण (फिशकरी) सर्वजण खाऊ शकतील या अंदाजाने आणून ठेवतात. तुम्ही तुमच्या हाताने हवी तितकी घ्यायची. आपण खाऊ शकतो त्यापेक्षा भाताचं आणि करीचं प्रमाण खूपच जास्त वाटलं. पुढ्यात आलेला गरम गरम वाफाळलेला भात, त्यावर हुमण आणि चरचरीत तळलेला फिश एवढ्याच मोजक्या पदार्थांवर ताव मारायचा. एरवी रेस्टोरन्टमधली थाळी भरगच्चं बघण्याची सवय झाली आहे. दोन प्रकारच्या भाज्या, दोन प्रकारची मासळी, किसमूर, गोडशे, तळलेली मासळी आणि शीत -कढी -हुमण अशी एकदम भरलेली थाळी बघून अनेकांना तृप्त वाटतं. पण खूपदा असंही होतं कि सगळ्या पदार्थाना न्याय देता येत नाही. ताटातलं अन्न वाया देखील जातं. त्यापेक्षा अण्णाकडची पद्धत छान वाटली. घरी जेवतो तशी हि पद्धत वाटली. घरात जसं आपण जेवायला बसल्यावर आपल्यासमोर वेगवेगळ्या पदार्थांनी भरलेली भांडी असतात आणि आपल्याला हवे तेवढेच घेतो तसाच प्रकार इथे दिसला. किंग फिशकरी राइस थाळी १८० रुपयेला आहे. पण नॉर्मल फिशकरी राईस थाळीची सुरुवात १५० रु पासून होते. तुम्ही कोणती मासळी निवडता त्यावर थाळीची किंमत ठरली जाते.
अण्णाकडचे मटण देखील प्रसिद्ध आहे. खूपजण इथे फक्त मटण खाण्यासाठी येतात. इथं वेगवेगळ्या प्रकारचं मटण मिळतं. मटण शाकुती, मटण सुखा, मटण कढई, मटण कोल्हापुरी, मटण हैद्राबादी आणि मटण वाटी अशा वेगवेगळ्या प्रकारांमध्ये मटण बनवलं जातं. यातल्या प्रत्येक प्रकारच्या मटणाचे मसाले वेगवेगळे असतात. एकच मसाला सगळ्या प्रकारांसाठी वापरला जात नाही. त्यामुळे एकावेळी तुम्ही वेगवेगळ्या चवींचा आनंद घेऊ शकता.
अण्णा म्हणजेच सत्यवान व्ही नाईक हे शेलडेमधील रहिवासी. याभागात एकही चांगलं रेस्टोरंट नव्हतं. मडगाव - चांदोर मार्गे केपे, जांबवली, रिवोण जाणाऱ्यांना या मार्गावर एकही चांगला पर्याय नव्हता. काही वर्षांपूर्वी अण्णांनी छोट्याशा प्रमाणात या रेस्टोरंन्टची सुरुवात केली होती. त्यांच्या पदार्थाना उत्तम चव असल्यामुळे खवय्या मंडळींनी देखील त्यांना उत्तम प्रतिसाद दिला. आज अण्णांच्या नावावरच हे रेस्टोरंट चालतं.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.