Namdev Dhondo Mahanor
Namdev Dhondo Mahanor Dainik Gomantak
ब्लॉग

Gomantak Editorial: गंध मातीचा हरपला...

गोमन्तक डिजिटल टीम

Gomantak Editorial कास्तकाराच्या घरातला कर्तापुरुष ऐन पावसाळ्यात अज्ञाताकडे निघून जावा आणि अंकुरण्याच्या घाईत असलेले अवघे रान ओकेबोके व्हावे, तशी अवस्था महानोरांच्या जाण्यामुळे झाली आहे. निसर्गकवी नामदेव धोंडो महानोर यांचे जाणे हे केवळ एका मनस्वी कवीचे प्रस्थान नव्हे. त्यांच्या जाण्याने मातीत राबणारे दोन हात गेले.

समाजभान असलेले संवेदनशील मन गेले. शिवाराची हिरवी बोली जाणणारा प्रतिभेचा कंद हरपला. शेतकऱ्याची दु:खिते समजून घेणारा चिंतनशील पिंड गेला. कवी हा मूलत: आत्मकेंद्रितच असतो, असे म्हणतात.

पण महानोरांनी कवितेचे निळे बाजिंदे पाखरु मनगटावर मिरवले, तीच मनगटे शेतकऱ्याच्या जिद्दीने मातीशी खेळवली, आणि शेतकऱ्यांचे प्रश्न कायदेमंडळात पोटतिडकेने मांडताना त्याच मनगटावरची मूठदेखील वळली.

पाणी हा शेतकऱ्याचा जिव्हाळ्याचा विषय. कोरडवाहू शेतकऱ्याच्या वाट्याला काय काय वाढून ठेवलेले असते, हे त्यांनी अनुभवले होतेच. महानोर निसर्गाचे कवी होतेच, पण सर्वप्रथम ते अंतर्बाह्य शेतकरी होते. कृषी आणि कविता या दोहोंची इतकी तादात्म्यभावाने सांगड घालणारा कवी मराठी भाषेत दुसरा नसेल.

त्यांची कविता थेट खानदेशातल्या बहिणाबाई चौधरींच्या ओव्यांशी नाते सांगणारी होती. साठ आणि नंतर, सत्तरीच्या दशकात मराठी साहित्य क्षेत्रात अनेक उलथापालथी झाल्या. साठोत्तरी साहित्य कात टाकत होते. वाङमयाचे नवे प्रवाह मराठी अंगणात खेळू लागले होते. वास्तवाला भिडू पाहणारे नवसाहित्य मध्यमवर्गीय भीडभाड सोडून वेगळेच अनुभव-संचित मांडू लागले होते.

१९६५ नंतर दोन लक्षवेधी घटना घडल्या. डॉ. भालचंद्र नेमाडे यांची ‘कोसला’ ही कादंबरी तडितेसारखी कोसळली, तिने भल्या भल्या प्रस्थापितांच्या झोपा उडवल्या. दुसरीकडे कवितेच्या प्रांतात ‘या नभाने या भुईला दान द्यावे’ असे अवगाहन करत आगळ्याच शब्दकळेच्या ‘रानातल्या कविता’ अवतीर्ण झाल्या.

या कवितेला ओल्या मातीचा गंध होता. भुईमुगाची शेंग भुईतून वर येताना अंगाला मातीचा लेप घेऊनच येते. ही कविता तशीच नाजूक शेंगेच्या चणीची होती. कवितेतली प्रतिमासृष्टी अस्सल मऱ्हाटी शिवारातली होती. ना. धों. महानोर नावाच्या या तरुण कवीने शहरी कथा-कादंबऱ्यांचा, आणि कवितांचा नक्षाच उतरवला.

ज्या अस्सल, देशी वाणाची मराठी साहित्य वाट पाहात होते, ते कवितेच्या रुपाने बाजरीच्या धाटासारखे रसरसून आल्याचा साक्षात्कार झाला. साहित्यक्षेत्रातील शिरस्त्याप्रमाणे लगोलग महानोरांना निसर्गकवी अशी उपाधी मिळाली. पण खरे सांगायचे तर त्यांना केवळ निसर्गकवी म्हणणे अन्यायाचे ठरेल.

शेतकऱ्याचा संपूर्ण भवतालच त्यांच्या शब्दलाघवाचा अविभाज्य भाग होता. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या ज्या पळसखेड गावात हा कवी शेतीत रमला होता, ते गाव अजिंठ्याचा अभिजात शेजार लाभलेले. तिथले चिरंतन रंग महानोरांच्या कवितेत शब्दरुप घेऊन अवतरले होते. पु. ल. देशपांडे यांच्यापासून मंगेशकर कुटुंबीयांपर्यंत यच्चयावत अभिजन कलावंतांना महानोरांच्या कवितेने अल्पावधीतच भुरळ घातली, ती त्यातील अस्सल अभिजाततेमुळेच.

पुढे ‘जैत रे जैत’, ‘सर्जा’, ‘एक होता विदूषक’ अशा काही मोजक्या चित्रपटांसाठी महानोरांनी गाणीही लिहून दिली, पण या मनस्वी कवीचे मन त्या शब्दांच्या व्यापारात रमले नसावे! अर्थात, जी काही मोजकी चित्रपटगीते त्यांनी लिहिली, तीदेखील सुगम संगीताच्या दुनियेत अजिंठ्याच्या लेण्यांसारखी कालातीत झाली आहेत.

शेतकरी मनाचा कवी कोरडवाहू शेतकऱ्याच्या नशिबी सालाबाद येणारी विपदांची वादळे पचवत पळसखेडचे आपले शिवार फुलवत होता. शेतकऱ्यांच्या समस्यांना वाचा फोडत होता. विधान परिषदेवर दोनदा ते आमदार म्हणून नियुक्त झाले. त्यांची भाषणे सभागृह मंत्रमुग्ध होऊन ऐकत असे.

त्यांच्या मांडणीत कवीची संवेदना होती, आणि सामाजिक भानही. भूमिका घ्यायची वेळ आली की ते मागे हटत नसत. ‘नर्मदा बचाव आंदोलना’ला त्यांनी दिलेली साथ अशा बांधिलकीच्या भावनेतून आलेली होती. नामनिर्देशित आमदारांच्या यादीवरुन हल्ली रण माजते. प्रतिभावंतांसाठी या नियुक्त्या असणे राज्यघटनेला अभिप्रेत आहे.

त्यादृष्टीने महानोरांची विधान परिषदेवरली निवड आदर्श होती. त्यांचे मन खऱ्या अर्थाने रमत असे ते शेतशिवारात आणि कवितेत. या दोन्ही गोष्टींचे आगळेच अद्वेत त्यांच्या मनीमानसी होते. पाण्याची स्वप्ने बघणारा हा शिवारातला कवी, स्वप्नेही भव्यदिव्य बघत असे.

यमुनेचे पाणी। यावे कावेरीला। तापी नर्मदेला। गंगा यावी॥

तुझी चंद्रभागा। घालून वळसा। अजिंठ्याचा देशा। थांबवावी॥

पाण्या पावसाचे। बांधून वेटोळे। अंथरावे जाळे। पांडुरंगा॥

...अशी अद्भुताची अपेक्षा त्यांच्या ठायी असे. कास्तकाराचे कष्टमय आयुष्य भोगूनही त्यांची कविता निसर्गाशी भांडणारी नव्हती. एखादा गांजलेला शेतकरी चार कचकचीत शिव्या हासडून क्रूर निसर्गाला बोल लावून मोकळा झाला असता. पण महानोरांची कविता मात्र त्याच परिसरात शिवारात डोलणारा पांडुरंग पाहात होती.

महानोर हे देहमनाने सृजनाच्या कार्यात गुंतले होते. कधी ते हात शिवारात राबत होते, कधी कवितेच्या अंगणात. कलावंतांच्या निर्वाणानंतर त्यांची आभाळातली नक्षत्रे होतात, अशी एक कविकल्पना रुढ आहे. या कल्पनेप्रमाणे महानोर नावाचे नक्षत्र आभाळात उगवले तर ते पावसाचेच असेल, हे नक्की.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Todays Live Update: चिखलीत इनडोअर स्टेडियमची भिंत कोसळली

Jammu & Kashmir Terrorist Attack: कठुआमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; भारतीय लष्कराचे 4 जवान ठार, 6 जखमी

Nilesh Cabral: निलेश काब्राल यांचा थेट CM पदावरच डोळा?; मंत्रिमंडळ फेररचनेच्या पार्श्वभूमीवर मोठे विधान

Goa Rain Update: राज्यात पावसाचा हाहाकार! कुशावती नदीची पातळी वाढली; पारोडा रस्ता दुसऱ्या दिवशीही पाण्याखाली

Mumbai Goa Highway: निवारा शेडविना प्रवाशांचे हाल; पेडणे तालुक्याची समस्या

SCROLL FOR NEXT