Thinkers and rulers
Thinkers and rulers Dainik Gomantak
ब्लॉग

Portuguese Thinker: उदारमतवादी पोर्तुगीज विचारवंत आणि राज्यकर्ते

गोमन्तक डिजिटल टीम

सुशीला सावंत- मेंडीस

वसाहतोत्तर काळातील आमच्या पिढीसाठी पोर्तुगीज वसाहतवाद्यांचे काहीही चांगले पाहणे किंवा लिहिणे दुधारी तलवारीसारखे आहे. माझे वडील स्वातंत्र्यसैनिक असल्याने माझ्या कुटुंबावर अनेक अत्याचार झाले.

तथापि, इतिहासलेखन पक्षपाती नसणे आणि भले-बुरे ज्याचे श्रेय त्याच्या पदरात टाकणारे असणे आवश्यक आहे. तेथे अनेक पोर्तुगीज उदारमतवादी होते ज्यांना गोव्याच्या बुद्धिजीवींनी अगदी वसाहती काळातही मान दिला होता.

बौद्धिक आणि उदारमतवादी मन कधीही पक्षपाती नसते. लुईस द मिनेझिस ब्रागांझा यांच्या विचारांचे वाचन केल्यावर मला समजले की ते लोकशाहीवादी, पुरोगामी विचारवंतांबद्दल सहानुभूती बाळगून का होते!

त्यांनी त्यांचे राष्ट्रीयत्व किंवा रंग विचारात न घेता त्यांना स्वीकारले. पोर्तुगीज वसाहत प्रशासनातील काहींचे कार्य आणि त्यामागील सकारात्मक पैलू केवळ मुक्त विचारवंत पाहू शकतो. पोर्तुगीज राजकारण्यांमधील प्रगतिशील विचारवंतांचे कौतुक करण्यात काहीच गैर नाही.

कौसेरो दा कोस्ता, आंतोनियो जुझे द आल्मेदा, रोचा दिनीझ, अल्वारो झेवियर द कास्त्रो, ब्रिटो कॅमाचो आणि अफोन्सो कोस्तासारख्या राज्यकर्त्यांसह अनेक पोर्तुगीज अधिकारी आणि उदारमतवादी विचारवंत त्या काळात होते, जे पोर्तुगीज असूनही त्यांचे कौतुक करावेसे वाटते.

निःसंशयपणे आणखी बरेच होते. टी. बी. कुन्हा यांनी आपल्या लिखाणात म्हटले आहे की, पेनिचे तुरुंगातील त्यांचा तुरुंगवास हा एखाद्या विद्यापीठासारखा होता. हुकूमशहा सालाझारच्या विरोधात असलेल्या पोर्तुगीज कैद्यांशी चर्चा करून त्यांना खूप काही शिकायला मिळाले.

पोर्तुगीज राज्यकर्त्यांमधील मतवादी गव्हर्नर कौसेरो दा कोस्ता : जानेवारी 1910 मध्ये आलेले हे पहिले रिपब्लिकन गव्हर्नर होते. ते लिबरल रिपब्लिकन होते आणि त्यांनी इल्हासची जुनी म्युनिसिपल कमिटी बरखास्त करून नवीन समितीचे अध्यक्ष म्हणून मिनेझिस ब्रागांझा यांची नियुक्ती केली होती.

वस्तुतः ब्रागांझा यांच्यावर गव्हर्नरशी जवळीक ठेवल्याबद्दल खासगीत आणि जाहीर टीकाही झाली. केवळ ‘उदारमतवादी विचारां’चे आदानप्रदान झाले, असे या टीकेला त्यांनी उत्तर दिले.

अध्यक्ष आंतोनियो जुझे द आल्मेदा : प्रजासत्ताकचे अध्यक्ष असलेल्या आल्मेदा यांनी कोइंब्रा विद्यापीठाचा एक तरुण विद्यार्थी म्हणून राज्याच्या जुलूमशाहीचा निषेध केला होता आणि विचारस्वातंत्र्यासाठी लढा दिला होता.

त्यांच्या लोकशाही मूल्यांवरील विश्वासाबद्दल त्यांचे कौतुक झाले. वैयक्तिक, राजकीय शत्रू - मित्र आणि सार्वजनिक जीवनात स्वत:साठी उच्च मानके स्थापित केलेल्या व्यक्तींमध्ये असलेला फरक गोव्यातील लेखक ओळखू शकतात. उम होमन किंवा ‘ए मॅन’ नावाच्या लेखात ब्रागांझा यांनी आल्मेदा यांच्या बुद्धीचे आणि मनाचे उत्कृष्ट गुण सांगितले आहेत.

परंतु, पोर्तुगीज प्रजासत्ताकच्या राष्ट्राध्यक्षांच्या चांगल्या गुणांची प्रशंसा करण्यासोबतच पोर्तुगीज सरकारच्या प्रेस सेन्सॉरशिप धोरणावर कडाडून हल्ला चढवला. ब्रागांझा यांनी मुद्दे आणि मते भिन्न असूनही वैयक्तिक हल्ले केले नाहीत आणि प्रजासत्ताक राष्ट्राध्यक्ष म्हणून त्यांचे खुले कौतुक केले.

प्रिन्स लिचनोव्स्कीने जेव्हा महान संगीतकार बीथोव्हेन यांचे आदरातिथ्य करण्यास नकार दिला तेव्हा बीथोव्हेन यांनी लिहिलेल्या ‘जन्मामुळे तुला जे मिळाले, ते मी कर्माने मिळवले आहे. हजारो राजपुत्र असतील पण एकच बीथोव्हेन आहे.’ या ओळींचा संदर्भ देत ब्रागांझा यांनी म्हटले आहे की, ‘प्रजासत्ताकाचे अनेक राष्ट्रपती होते, परंतु आल्मेदांसारखा एकही नाही’.

पोर्तुगीज प्रजासत्ताकाच्या या राष्ट्राध्यक्षाने कुलीन पार्श्‍वभूमी नसताना सर्वोच्च न्यायदंडाधिकारी म्हणून उच्च पदांवर अधिकार गाजवला. कठोर परिश्रम आणि बुद्धिमत्ता ही कुठल्याही विशिष्ट जातीची किंवा वर्गाची मक्तेदारी नाही व होऊ शकत नाही.

आल्मेदा यांनी अत्यंत प्रामाणिकपणे काम केले आणि मूलभूत कायदे मंजूर करण्यात मदत केली, ज्यांच्याविना प्रजासत्ताकाची भरभराट होऊ शकली नसती.

गव्हर्नर रोचा दिनीझ : १९२६मध्ये गव्हर्नर रोचा दिनीझ गोवा सोडून पोर्तुगालला जाताना मिनेझिस ब्रागांझा यांना त्यांचा गोव्यातील कार्यकाळ आठवला. ‘पाल्वारास दा जस्टिस’ या लेखात त्यांनी गव्हर्नर मितभाषी आणि प्रसिद्धी परान्ग़्मुख असल्याचे म्हटले आहे.

दिनीझने आपल्या कार्यकाळात उत्तम प्रकारे काम केले, स्थानिकांशी मिळूनमिसळून राहिले आणि ते लोकांच्या भावनांविषयी संवेदनशीलही होते. गव्हर्नर दिनीझ उच्च पदस्थ असूनही नम्र होते व त्या पदाच्या बडेजावाला ते कधी भुलले नाहीत.

असे मानले जाते की, आठ वर्षांच्या दीर्घ कालावधीनंतर त्यांना पोर्तुगालला परत बोलावण्यामागे स्थानिक लोकांशी असलेली जवळीक हे मुख्य कारण होते. रोचा दिनीझ खरोखरच एक चारित्र्यसंपन्न माणूस होते आणि त्यांचे जाणे गोमंतकीयांसाठीही धक्कादायक होते!

अल्वारो झेवियर द कास्त्रो : पोर्तुगालचे दोनदा राष्ट्राध्यक्ष होते - पहिल्या खेपेस १९२०मध्ये फक्त दहा दिवसांच्या कालावधीसाठी, जेव्हा त्यांनी रिपब्लिकन पक्षाची सह-स्थापना केली आणि दुसऱ्या खेपेस १८ डिसेंबर ते ६ जुलै १९२४पर्यंत सात महिन्यांपेक्षा कमी कालावधीसाठी.

ते राष्ट्रवादी रिपब्लिकन पक्षात सामील झाले. त्यांनी १९१५ ते १९१८ दरम्यान मोझांबिकचे गव्हर्नर-जनरल म्हणूनही काम केले. सोडोनियो पेसच्या हत्येनंतर झालेल्या, ११ जानेवारी १९१९च्या सत्तापालटाच्या प्रयत्नात ते प्रमुख सहभागी होते.

पोर्तुगीज इतिहासातील अशांत कालखंडात प्रामाणिकपणा आणि सचोटी असलेल्या व्यक्ती आपल्या पदावर फार काळ टिकल्या नाहीत. त्यांच्या जीवनातील संघर्षांमुळे वयाच्या ४९व्या वर्षी कोइंब्रा येथे त्यांचा अकाली मृत्यू झाला.

ब्रिटो कॅमाचो : पोर्तुगीज राजकारणी आणि ‘ए लुता’ वृत्तपत्राचे महान पत्रकार. त्यांच्या निधनाच्या निमित्ताने, त्या काळातील अनेक नामवंत पत्रकारांनी त्यांच्या सन्मानार्थ श्रद्धासुमने लिहिली. कॅमाचो यांनी आपल्या लेखनात पोर्तुगालमधील ढासळलेल्या स्थितीचे विश्लेषण केले होते आणि राजेशाही स्वरूपाच्या सरकारच्या विरोधात लढा दिला होता.

त्या काळातील एक महान विचारवंत म्हणून कॅमाचो यांचा आदर केला जात असे. कॅमाचो हे एक प्रामाणिक राजकारणी होते आणि संधिसाधू नव्हते. त्यांचे तेजस्वी शब्द आणि ओजस्वी विनोदबुद्धीने त्यांना सर्वोच्च शिखरावर पोहोचवले होते.

त्यांनी ‘आश फारपास’(लहान बाण) हा प्रसिद्ध स्तंभ लिहिला. या लहान बाणांचा वापर त्यांनी त्यांच्या आसपासच्या समाजावर टीका करण्यासाठी केला गेला. आपले विचार मांडण्यासाठी त्यांनी व्यंग आणि बुद्धीचा वापर केला. आपल्या पेपरमध्ये त्यांनी तार्किक दृष्टिकोनातून रिपब्लिकन सिद्धांताचा प्रसार केला.

ब्रिटो यांनी मोझांबिकच्या मूळ रहिवाशांबद्दल त्यांना वाटत असलेली सहानुभूती त्यांच्या वृत्तपत्रीय लेखनातून प्रकट केली. पोर्तुगीज नागरिक असले तरी पोर्तुगिजांनी केलेल्या वसाहतवादी छळवादाविरुद्ध त्यांनी लिहिले. त्यांनी अलिप्ततेने प्रजासत्ताकाची सेवा केली आणि त्याबद्दल हालअपेष्टाही भोगल्या.

अफोंसो कोस्ता आणि मारियानो दा कार्व्हालो : हे दोघे पोर्तुगीज संसदेचे प्रतिनिधी किंवा संसद सदस्य होते, ज्यांनी आंतोनियो जुझे द आल्मेदा यांना पाठिंबा दिला होता. सार्वजनिक जीवनात लोकशाहीचे महत्त्व याविषयी पोर्तुगीज संसदेत प्रतिनियुक्त असलेल्या या दोघांनी खूप विचार मांडले, वादविवाद केले.

हे दोन पोर्तुगीज राज्यकर्ते विचारांनी पुरोगामी आणि उदारमतवादी होते. वसाहतवादी व्यवस्थेत उच्च पदांवर असलेल्या लोकांसाठी दुर्मीळ असणारे हे गुण त्यांच्यात होते. चारित्र्य आणि स्वतंत्र राहण्याच्या क्षमतेसाठी ते दोघेही आदरणीय आणि कौतुकास पात्र होते.

इतिहासलेखनात पूर्वग्रहरहित असण्याची गरज आज पूर्वीपेक्षा जास्त आहे. सालाझारच्या कठोर सेन्सॉरशिपला न जुमानता वसाहत काळातील लेखकांनी मुक्तपणे आणि न घाबरता लिखाण केले.

पोर्तुगीज उदारमतवादी विचारवंतांचे, मग ते राष्ट्राध्यक्ष असोत, गव्हर्नर-जनरल असोत किंवा पत्रकार असोत, ‘व्यक्ती, विचारधारा किंवा राष्ट्रीयत्व यापेक्षाही विचार महत्त्वाचे’ मानल्यामुळे त्यांचे कौतुक केले गेले. सध्याच्या लोकशाही समाजाला इतिहासातून खूप काही शिकण्यासारखे आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Kanguva: 'कंगुवा'चा टीझर घालतोय धूमाकूळ; गोव्यासह ‘या’ खास ठिकाणी झालं बीग बजेट चित्रपटाचं शूटिंग

Goa Congress: सार्दिन घरात बसून विरियातोंचा प्रचार करतात; पाटकरांनी टोचले MP फ्रान्सिस यांचे कान

Prajwal Revanna: आम्ही व्हिसा दिला नाही… प्रज्वल रेवन्ना जर्मनीला पळून गेल्याच्या प्रश्नावर परराष्ट्र मंत्रालयाची प्रतिक्रिया

Shashi Tharoor In Goa: भाजपला धक्का बसणार, 400 नव्हे 200 पार करने देखील जड जाणार - थरुर

Goa Police : २४ वर्षांपासून अजूनही ‘ते’ न्यायाच्या प्रतिक्षेत; बडतर्फ पोलिसाची व्यथा

SCROLL FOR NEXT