जीवन पृथ्वीच्या प्रत्येक कानाकोपऱ्यात आकाराला येत असते पण आपल्या जीवनाच्या संघर्षात अटीतटीने गुंतलेलो असताना, इतर प्रजातींच्या जीवनाचा विचार करायला फारशी फुरसत आमच्याकडे नसते. फारच झालं तर एखाद्या प्राणी संग्रहालयाला भेट देऊन आश्चर्योद्गार काढत तिथल्या बंदिस्त जीवांना निरखत, आपण एकामागोमाग एक पिंजरे ओलांडत राहतो आणि ‘मी वाघ-सिंह पाहिले’ या कौतुकानंदात काही दिवस गुरफटून राहतो. किंवा शाळेत वगैरे असताना मायक्रोस्कोपच्या काचेखाली श्वास घेणाऱ्या काही सूक्ष्मजीवांनाही आपण मार्कांच्या हिशेबाने जोखलेले असते. पण यापेक्षा आपली अधिक नजर, आपल्या सभोवार जीवनचक्रात गुंतलेल्यांकडे फारशी जात नसते.
पण अशाच एका आपल्या अगदी जवळच असलेल्या वेगळ्या जीवनविश्वाची ओळख करून देणारे उपक्रम ‘गोवा वनखाते’ आणि ‘वाइल्डलाइफ फंड- भारत’ (डब्ल्यूडब्ल्यूएफ- इंडिया) आयोजित करते. हल्ली त्यांनी गोव्यातील (Goa) हणजुणे किनाऱ्यावर ‘टाईडपूल ट्रेल’ आयोजित केला. ‘किनारी सहल’ आणि ‘जागरूकता’ असे या उपक्रमाचे स्वरूप होते. उपक्रमाचे नावही छान होते- ‘शोरलोर 2022’.
या सहलीत सहभागी झालेल्या अनेकांसाठी हा डोळे उघडणारा अनुभव होता. आन्तर भरती-ओहोटी क्षेत्रात असलेल्या संवेदनक्षम जीवाना जवळून जाणून घेणे हे नवीन विश्वात प्रवेश करण्यासारखे होते. ‘टाईड पूल’ म्हणून ओळखली जाणारी जागा, समुद्र आणि जमीन यांच्या सीमारेषेवरची जागा असते जिथे भरतीचे पाणी उतरून गेल्यावर, किनाऱ्यावरच्या सखल भागात किंवा खडकाळ खाचीत पाणी साचून राहते. समुद्राच्या सुकतीची वेळ अशा सहलींसाठी निवडली जाते.
सहलीची सुरुवात, पाण्याची सुकती-भरती आणि किनाऱ्यावरच्या खडकांची माहिती देऊन होते. गोव्याच्या किनारपट्टीवर जांभ्या दगडाचे तसेच पाषाणी खडक आढळतात. उत्तर गोव्याच्या (North Goa) किनारपट्टीवर अधिकांश जांभ्या दगडाचे खडकच पसरून आहेत तर जसजसे आपण दक्षिण गोव्याच्या आगोंदा किंवा तळपणसारख्या किनारपट्टीकडे वळतो तसतसे आपल्याला पाषाणी खडक आढळयला लागतात.
किनाऱ्यावर साठलेल्या पाण्यात असलेला ‘सॅण्ड गोभी’ मासा आपल्या स्मृतीत आंतर ज्वारीय क्षेत्राचा (इंटर टायडल झोन) नकाशा वीस दिवसपर्यंत आपल्या स्मृतीत साठवून ठेवू शकतात. अशा प्रकारची विशेष माहिती आपल्याला अशा सहलीतूनच मिळू शकते. किनाऱ्यावरच्या खडकातल्या खाचीत आपले अंग आक्रसून असलेल्या गोगलगायी, जिरेनियम नेटर, टर्बन शेल, हर्मिट क्रॅब, मरून रॉक क्रॅब, मून क्रॅब, सोलर क्रॅब इत्यादींची ओळख अधिक तपशीलवारपणे होत जाते. किनाऱ्यावर कधीतरी सहज फिरायला आलेलो असताना, वरवर आपल्या दृष्टीस इथले विश्व आलेले असते पण अशा सहलीतून ते आता आपण जाणून घेत असतो. हे सारं आनंदातही भर घालणारे असते.
फक्त दोन तासांच्या या सहलीत किनाऱ्यावरच्या इटुकल्या जीवांबद्दल अनेक गोष्टी शिकता येतात. आपल्या जगण्याच्या लढाया ज्या लवचिकतेने ते लढत असतात ते सारे समजून घेणे विस्मयकारक असते. गोवा राज्याच्या या छोट्याशा किनारपट्टीवर अशी अनेक आश्चर्ये दडलेली आहेत. ज्यावेळी आम्ही समुद्रकिनार्यावर जातो, तेव्हा एका अद्भुत जीवसृष्टीने ही जागा व्यापलेली आहे हे जाणून आम्ही तिथे वावरायला हवे. ‘शोरलोर 2022’ मध्ये आपणही भाग घेऊन या जीवसृष्टीची माहिती करून घेऊ शकता. येथे येत्या 20 मार्च रोजी हा ‘टाइडपूल वॉक’ पुन्हा आहे. ही संधी चुकवू नका. https://docs.google.com/forms/d/1dSktS2b-4amH1cMc2Cg9WKFOo0nv9FseFqhlyfi1yKc/viewform?ts=621f339a&edit_requested=true या संकेत स्थळावर स्वत:ची नोंद करा आणि या जीवसृष्टीशी मैत्री करा.
'पिस्तूल शिंपला’
महाराष्ट्राच्या किनाऱ्यावर (Beach) आढळणाऱ्या गोगलगायी, ‘तंबाखू’ या सहली दरम्यान आढळल्या. त्यांचा स्वाद तंबाखूसारखा असतो म्हणून त्यांना ते नाव पडलं आहे. त्या निसरड्या खडकांमध्ये आढळलेल्या आणखीन एका आश्चर्याची ओळख झाली- ‘पिस्तूल शिंपला’! हा शिंपला आपले भक्ष्य दिसल्यावर आपले दोन्ही शिंपले इतक्या झटकन बंद करून घेतो की त्यामुळे निर्वात पोकळीचा एक फुगा तयार होतो. हा फुगा बंदुकीतून सुटलेल्या गोळीसारखा भक्ष्याच्या दिशेने सुटतो. या फुग्याचे तापमान त्यावेळी सूर्याच्या पृष्ठभागी असलेल्या तापमानाएवढे असते असे म्हणतात. एखादा लहान मासा वा प्राणी या शिंपल्याचे भक्ष्य असते, जे या फुग्याच्या संपर्कात येताच लगेच बळी पडते. एवढासा लहान शिंपला पण त्याच्या या अचाट सामर्थ्याची माहिती हे त्या किनारी सहलीत समजून आलेले आणखीन एक आश्चर्य होते.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.