Wagro Konkani Film : गेल्या वर्षी ‘मडगाव रविंद्र भवन’ने आयोजित केलेल्या लघुपट स्पर्धेत भाग घेऊन उत्कृष्ट लघुपट हा पुरस्कार मिळवलेल्या साईनाथ उसकईकर यांच्या 'वाग्रो' या लघुपटाने इफ्फीच्या 'इंडियन पॅनोरमा’तल्य, नॉन-फिचर विभागात स्थान मिळवून आपल्या दैदिप्यमान प्रवासाचे जणू एक वर्तूळ पूर्ण केले आहे.
साठ तासात बनलेल्या या लघुपटाने आतापर्यंतया प्रवासात जगातल्या अनेक प्रतिष्ठेच्या महोत्सवात स्थान मिळवले व काही महत्वाचे पुरस्कारही जिंकले. 'वागरो' ही एका खेडयातल्या प्रेमी युगुलाची गोष्ट आहे. त्याचे प्रेम छुपे असले तरी त्याच प्रेमासाठी ती जगतात. या आपल्या लघुपटाबद्दल सांगताना साईनाथ त्यावेळी म्हणाला होता, ‘कथा - कथन करणाऱ्याला प्रेम हा विषय नेहमीच खुणावत असतो – प्रत्येकजण हा विषय आपल्या कथेतून मंडण्यासाठी संधी शोधत असतो!’
रविंद्र भवनच्या 'साठ तासात लघुपट 'या स्पर्धेत हा सिनेमा विजेता बनल्यानंतर राजेश पेडणेकर यांच्या 'द गोवन स्टूडीओ 'या संस्थेने या लघुपटाची सूत्रे आपल्या हातात घेतली. राजेश पेडणेकर यांनी सर्व प्रथम हा लघुपट विश्वद्वीप चटर्जी यांना दाखवला. विश्वद्वीप अनेक ब्लॉकबस्टर सिनेमांचे साऊंड डिझायनर आहेत. मुन्नाभाई एमबीबीएस, बाजीराव मस्तानी, थ्री इंडियट्स, ब्रम्हास्त्र सारख्या सिनेमांची ध्वनीरचना त्यांनी केली आहे. ध्वनीरचनेसाठी त्यांना चारवेळा राष्ट्रीय पुरस्कारही लाभला आहे. विश्वद्वीप यांना हा लघुपट आवडला व व्यस्त असूनही त्यांनी केवळ त्यांना आवडल्यामुळे या लघुपटाची ध्वनीरचना पुन्हा नव्याने करण्याचे मान्य केले. साईनाथ म्हणतो, 'ध्वनीरचनेत त्यांनी केलेल्या बदलामुळे लघुपटाच्या परिणामात प्रभावी असा बदल घडला. मी पुण्याच्या फिल्म इन्स्टिट्यूच्या दिग्दर्शन विभागाचा विद्यार्थी आहे. ध्वनी हा सिनेमाच्या आशयाचा महत्वाचा भाग कसा असू शकतो या दाखला विश्वद्वीप सरांमुळे मिळाला. तो नुसता `आवाज`नसतो तर कथा-कथनाचा तो एक आयाम असतो. हा आयाम `वाग्रो`ला सरांच्या ध्वनीरचनेतून लाभला.’
साईनाथने विश्वद्वीप चटर्जीनी ध्वनीरचनेत केलेल्या बदलाची काही उदाहरणे दिली. खाटीक ज्या जाग्यावर मांस कापत असतो, तिथे सूऱ्याच्या आघाताबरोबर होणाऱ्या आवाजात त्यांनी माझी त्या जागी उडणाऱ्या माशीच्या आवाजाची भर टाकली. या माशीच्या आवाजाने त्या जागेला काळाचे नवीन परिमाण लाभले. ती जागा पूर्वापार तिथे आहे याची तो आवाज खुण बनला. विश्वद्वीप यांनी ध्वनीत केलेल्या अशात-हेच्या बदलांनी लघुपटला अधिक अर्थपूर्णता लाभली. हा लघुपट सर्वप्रथम कान महोत्सवाच्या `शॉर्ट फिल्म कॉर्नर`मध्ये निवडला गेला व त्यानंतर अनेक देशी व विदेशी सिनेमा महोत्सवांमधून झळकत राहिला. गोव्यात होणाऱ्या अशाच एका प्रतिष्ठित सिनेमा महोत्सवात आता हा लघुपट आपल्याला पाहायला मिळण्याची संधी लाभते आहे.
गोव्यात निर्माण होणा-या सिनेमांना जेव्हा राज्यशासनाचे अनुदान लाभत होते. तेव्हा गोव्याच्या अनेक दर्जेदार चित्रपटांनी महोत्सवाच्या `इंडियन पॅनोरामा` विभागात स्थान मिळवले होते. मात्र अनुदानाचा भरवसा नसतानाही काही पूर्ण लांबीचे सिनेमा तर काही लघुपट अजूनही गोमंतकीय निर्माते आपल्या जबाबदारीवर निर्माण करत आहेत. त्यातील एका लघुपटाने आपल्या गुणवत्तेवर या महोत्सवात दिमाखाने स्थान मिळवले आहे. या सिनेमाचा दिग्दर्शन साईनाथ उसकईकर आणि निर्माता राजेश पेडणेकर हे दाेघेही त्यासाठी अभिनंदनास पात्र आहेत.
महोत्सव आणि पुरस्कार
साउथ एशियन शॉर्ट फिल्म फेस्टिवल (ॠत्विक घटक सुवर्णपदक पुरस्कार)
शॉर्ट फिल्म कॉर्नर (कान फिल्म फेस्टिवल)
सिलिगुरी डॉक्युमेंटरी आणि लघुपट महोत्सव (उत्कृष्ट लघुपट पुरस्कार)
इंटरनॅशनल डॉक्युमेंटरी अँड शॉर्ट फिल्म फेस्टिवल ऑफ केरला
शिकागो साउथ इंडियन फिल्म फेस्टिवल
औटावा इंडियन फिल्म फेस्टिवल अवॉर्ड, कॅनडा
7 इंडियन फिल्म फेस्टिवल मेलबर्न, ऑस्ट्रेलिया
बेंगलुरु इंटरनॅशनल शॉर्ट फिल्म फेस्टिवल
रेनडान्स फिल्म फेस्टिवल, लंडन
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.